সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, April 29, 2015

केंद्र सरकारच्या माजी सैनिकांना आता राज्याचेही पेन्शन

- सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : केंद्र सरकारच्या माजी सैनिकांना राज्यात सेवा केल्यानंतर आतापर्यंत फक्त केंद्र सरकारचेच निवृत्ती वेतन मिळत होते. यापुढे राज्यात सेवा करणाऱ्या माजी सैनिकांना केंद्रासह राज्याचेही निवृत्ती वेतन देण्यात येणार आहे. यासंबंधीचा शासन आदेश 27 एप्रिल रोजी निर्गमीत केल्याचे अर्थ, नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित माजी सैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

कार्यक्रमाला महाराष्ट्र, गोवा व गुजरात क्षेत्राचे ले. जनरल आर.आर.निंभोरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, आमदार ॲड. संजय धोटे, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, बिग्रेडियर डी.व्ही.सिंग, कर्नल दलबिरसिंगआदी उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले, सैनिकांमुळे राष्ट्राचा सन्मान असून सिमेवर लढणाऱ्या सैनिकामुळेच आपण निश्चिंत झोपू शकतो. सैनिक आपली शक्ती असून सैनिकांच्या कल्याणासाठी शासन सदैव प्रयत्न करणार आहे. राज्यात सेवा देणाऱ्या माजी सैनिकांना राज्य सरकारचे निवृत्ती वेतन लागू करण्याचा शासन आदेश निर्गमीत केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

सैनिक विभागाच्या वतीने चंद्रपूर येथे मुलांचे वसतीगृह, मुलींचे वसतीगृह व विश्रामगृह बांधण्याचा विचार आहे. यासाठी जिल्हा नियोजनच्या निधीमधून निधी देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री यांनी दिली. परमवीर चक्र प्राप्त सैनिकांचे स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

ले.जनरल आर.आर.निंभोरकर म्हणाले, माजी सैनिकांसाठी शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना असून या योजनांचा माजी सैनिकांनी पुरेपूर लाभ घ्यावा. सैनिकांच्या कल्याणासाठी आपण सदैव पुढे असून माजी सैनिकांना काही अडचणी असल्यास त्या प्राध्यान्याने सोडविण्यात येतील.

मेळाव्यात वीर पत्नी व वीर मातांचा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यानंतर पाहुण्यांनी सैनिक विभागाने आयोजित केलेल्या प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात युद्ध काळात वापरले जाणारे शस्त्र सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनले होते. पालकमंत्री व ले.जनरल यांनी माजी सैनिकांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. या मेळाव्यात ऐरोमॉडेलिंग शो करण्यात आला. मिल्ट्रीच्या पाईप बँडने उपस्थितांचे मने जिंकली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.