चंद्रपूर -शहराच्या सौंदर्यात भर टाकणाºया रामाळा तलावातील इकोर्नियाच्या समस्येसह, शहरातील रस्ते, वाहतूक व इतर विषयांवर राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी बुधवारी चर्चा केली. या चर्चेदरम्यान ना. मुनगंटीवारांनी इकोर्नियाच्या समूळ नायनाटासह रामाळा तलावाचे सौंदर्यीकरण व इतर समस्या सोडविण्याचे ठोस आश्वासन दिले.
यावेळी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या सुरू असलेल्या कार्याची स्तुती केली. शहरातील रामाळा तलावाला सध्या इकोर्नियाने गिळंकृत केल्याचे चित्र आहे. त्यामुळे इकोर्निया नष्ट करून रामाळा तलावाला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीने इकोर्नियाची होळी केली होती. त्यानंतर प्रशासनाने दखल घेतली. दरम्यान, चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी २९ एप्रिल रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन शहरातील विविध समस्यांचे निवेदन त्यांना सादर केले. यावेळी इकोर्निया पूर्णपणे नष्ट करून रामाळा तलावाचे चहुबाजूने सौंदर्यीकरण केले जाणार असल्याचे आश्वासन ना. मुनगंटीवार यांनी देत गंज मार्केटकडून रामाळा तलावातील बगिच्यात जाण्यासाठी रस्ता तयार करण्याचेही प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच सर्वांगिण दृष्टीने रामाळा तलावाच्या सौंदर्यात भर कशी टाकता येईल, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. सोबतच शहरातील ओपन स्पेसचे सुशोभिकरण करून त्या ठिकाणी वृक्षारोपण ट्रॅक तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरातील वाहतुकीची कोंडी लक्षात घेता येत्या काही महिन्यात अंतर्गत रस्ते रूंद करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासोबतच ऐतिहासिक जटपुरा गेटमधील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठीसुद्धा प्रयत्न सुरू असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले. शहरातील रस्ते दुरुस्तीसह मोठे नाले तयार करण्याचेही काम हाती घेतले जाणार आहे. त्यासोबतच बल्लारपुरातील बॉटनीकल गार्डन व चंद्रपुरात होणाºया वनस्पती उद्यानाबाबतही चर्चा करण्यात आली. या गार्डनमधील औषधी वनस्पती असाव्या, असा मुद्दा संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी मांडला. त्यावरही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. चंद्रपूर शहरातील बायपास, बाबुपेठ येथील उड्डाणपूल व प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासह सीटीपीएसमधील युनिट क्रमांक २ बंद करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. बाबूपेठ उड्डाणपुलासाठी राज्य शासनाकडून ५ कोटींचा निधी देण्यात आला असून केंद्राकडे राज्य सरकारने निधीची मागणी केली असल्याचे यावेळी ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. चंद्रपुरातील समस्या सोडविण्यासाठी केंद्राच्या अखत्यारीत येणाºया विभागाकडेही निधीची मागणी करून पाठपुरावा केला जाणार असल्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिले. यावेळी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा, कोषाध्यक्ष दत्तप्रसन्न महादानी, अॅड. मलक शाकीर, सुबोध कासुलकर, सुहास अलमस्त, साजीद कुरेशी, शिषीर हलदर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.