সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, April 26, 2015

महापूरग्रस्त भानेगाव

महापूरग्रस्त
भानेगाव

भानेगाव हे गाव खापरखेडा वीज केंद्रालगत कन्हान व कोलार नदीच्या मधोमध वसले आहे. त्यामुळे हे गाव महापुराने बाधित होत असते. सावनेर तालुक्‍याअंतर्गत ग्रामपंचायतीचा कारभार चालतो. याच गावापासून कामठी आणि पारशिवनी तालुक्‍यांच्या सीमारेषा सुरू होतात. त्यामुळे या दोन्ही शहरांचे अंतर येथून जवळ आहे. पूर्वी येथील नागरिक शेती करायचे. मात्र, औद्योगिकीकरणामुळे या शेती वीज केंद्र आणि वेकोलिने भूसंपादित केल्या. त्यामुळे शेतमालाचे उत्पन्न घटले. तरुणवर्ग कंत्राटी पद्धतीने वीज केंद्रात नोकरी करतो. वेकोलिने अद्याप नोकरी न दिल्याने अनेक तरुण रोजगारापासून वंचित आहेत. येथून आठ किलोमीटरवर कामठी येथे सैनिक प्रशिक्षण केंद्र आहे. येथे प्रशिक्षण घेणारे सैनिक फायरिंगच्या सरावासाठी भानेगाव परिसरात यायचे. भानेगाव ग्रामपंचायतीअंतर्गत नवीन भानेगाव आणि नवीन बिना या पुनर्वसित वस्त्या जोडल्या आहेत.


महापुराने गाव उद्‌ध्वस्त
या परिसरात बिना नावाचे गाव होते. 1942मध्ये कन्हान नदीला पूर आला. त्यात गावकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे येथील गावकरी भानेगावच्या परिसरात स्थलांतरित झाले. त्या गावाला नवीन बिना असे नाव देण्यात आले. त्यानंतर 1962 मध्ये आलेल्या महापुरात भानेगाव ही वस्ती वाहून गेली. त्यामुळे शासनाने त्याच परिसरात सुरक्षित जागी नवीन भानेगाव नामक वस्ती तयार केली. ही दोन्ही गावे आता भानेगाव ग्रामपंचायतीत अंतर्भूत आहेत.

दृष्टिक्षेपात
ग्रामपंचायत स्थापना : 1962
लोकसंख्या : 6,728
महिला : 3,217
पुरुष : 3,511
एकूण वॉर्ड : पाच
ग्रामपंचायत सदस्य : 15
पहिले सरपंच : चिरकूटराव महाजन
विद्यालय : 1
प्राथमिक उपकेंद्र : 1
प्राथमिक शाळा : 2
अंगणवाडी : 7
आरोग्य उपकेंद्र : 1
इंग्रजी प्राथमिक शाळा : 4
महिला मंडळ : 2
पतसंस्था : 3
बचतगट : 2
क्रीडा मंडळ : 1
सेवा सहकारी संस्था : 1
गृहनिर्माण संस्था : 2
आयटीआय : 1
समाजभवन : 2
बुद्धविहार : 2
मंदिरे : 4
-------------
काय हवे...
व्यायामशाळा, बगीचा, ग्रंथालय, माध्यमिक शाळा, पशुवैद्यकीय दवाखाना, पेट्रोलपंप, मंगल कार्यालय, बसस्थानक, पोलिस ठाणे.
--------------
आर्थिकदृष्ट्या सक्षम
भानेगावचे पाच वॉर्डांमध्ये विभाजन आहे. 17 निर्वाचित सदस्य सहा हजार 728 (2011 च्या जनगणनेनुसार) लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. गावाच्या पूर्वेस नव्याने सुरू होत असलेल्या कोळसा खाणीचा काही भाग तर पश्‍चिमेस खापरखेडा वीज केंद्राचा काही भाग ग्रामपंचायत हद्दीत येतो. त्यामुळे महसुलात भर पडतो. गावात विविध माध्यमांनी प्राप्त होणारे उत्पन्न 13 लाख 17 हजार 622 रुपये आहे. दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने सावनेर तालुक्‍यात आर्थिकदृष्ट्या सक्षम ग्रामपंचायत अशी ओळख आहे.

पाणीपुरवठा
भानेगाव ग्रामपंचायत हद्दीतील 123 हेक्‍टर जागेत 500 मेगावॉटचे औष्णिक वीज केंद्र उभारण्यात आले. हा विस्तारित वीज प्रकल्प उभारण्यापूर्वी 2005 मध्ये नागपूर येथे जनसुनावणी घेण्यात आली. या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी भानेगाव परिसरात बगीचा व औष्णिक वीज केंद्रातील जलशुद्धीकरण केंद्रातून स्थानिकांना शुद्ध पाणीपुरवठा पेयजल उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. लोकसुनावणीत महानिर्मितीकडून उपस्थित असलेले महाव्यवस्थापक बापट यांनी मागणी मान्य केली. यादरम्यान नीरीकडून कन्हान, कोलार नद्यांसह परिसरातील गावांच्या विहिरींच्या पाण्याचे नमुने घेतले. पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल नीरीतर्फे देण्यात आला. असे असताना आजही भानेगाववासींना राखमिश्रित पाणी प्यावे लागते. आरोग्य चांगले राखण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

साईमंदिर
भानेगावच्या नरेंद्रनगरातील साईमंदिरात 17 एप्रिल 2008 ला साईबाबांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिराचे बांधकाम 2500 हजार स्वेअर फूट परिसरात आहे. बांधकामावर आतापर्यंत 25 लाख रुपये खर्च करण्यात आले. दरवर्षी रामनवमीच्या काळात मंदिराचा वर्धापनदिन साजरा केला जातो. या वेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते. मंदिराचे काही काम अद्याप रखडलेले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार सुनील केदार यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून मंदिरास शासनाकडून पर्यटनाचा "क' दर्जा मिळवून देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.
............................
बुद्धविहार
भानेगाव ग्रामपंचायत हद्दीत नवीन बिना भानेगाव परिसरात बुद्धविहार साकारण्यात आले. या ठिकाणी वाचनालय, सामूहिक बुद्धवंदना घेण्यासाठी भवन उभारण्यात आले. येथे लग्नसमारंभासह लहानमोठे कार्यक्रमही नि:शुल्क पार पडतात. ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणामुळे बुद्धविहार परिसराचा विकास रखडला आहे. भानेगाव परिसरात जिल्हा परिषदेचे पटांगण सोडले तर सर्वांत मोठी जागा नवीन बिना बुद्धविहार परिसराची आहे. विहाराचा सर्वांगीण विकास करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

प्राचीन शिवमंदिर
भानेगावजवळील बिना येथे 300 वर्षे पुरातन शिवमंदिर आहे. कन्हान, कोलार व पेंच या नद्यांच्या त्रिवेणी संगमावरील या मंदिराला शासनाकडून "क' दर्जा मिळालेला आहे. सव्वादोन एकर जागेतील या शिवमंदिरात 1981 पासून शिवरात्री उत्सवाला सुरुवात झाली. या ठिकाणी पर्यटनाला वाव आहे. परंतु, राजकीय उदासीनतेमुळे या ठिकाणी दिवसेंदिवस असामाजिक तत्त्वांचा वावर वाढत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला. मंदिर परिसर कामठी विधानसभा मतदारसंघात येतो. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा मतदारसंघ आहे. मंदिराला शासनाचा "क' दर्जा प्राप्त असल्याने पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

मातामाय मंदिर
शासकीय जागेवर पुरातन मातामाय मंदिर आहे. मुलांना माता निघाल्यावर किंवा नवस फेडण्यासाठी नागरिक येथे मोठ्या संख्येने जातात. परंतु, पॉल ब्रिक्‍स कंपनीच्या मालकाने अतिक्रमण केल्यामुळे स्थानिकांना मंदिरात जाण्यास मज्जाव केला जातो. परिसरात अतिक्रमण व प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. 8 जून 2012 च्या ग्रामसभेत बहुमतांनी ठराव मंजूर करून ग्रामपंचायतीने कंपनीला दिलेली परवानगी रद्द करण्यात आली. परंतु, कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले.

वाहनचालकांची गैरसोय
वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी भानेगाव-कामठी मार्गावर 20 कोटी रुपये खर्च करून उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली. उड्डाणपुलाशेजारी नवीन बिना, उपासे ले-आउट, नरेंद्रनगर, साई मंदिर आहे. यामुळे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना रस्ता तयार केला आहे. परंतु, पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्यालगत नाल्या नसल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत गुडघाभर पाणी साचून वाहतुकीची कोंडी होते. पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचेही बोलले जाते. या कामाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

शिक्षण
येथे बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालय आहे. त्याची स्थापना 1994मध्ये झाली. महाविद्यालयात परिसरातील विद्यार्थी बी.ए., बी.कॉम., एम.ए.चे शिक्षण घेतात. कुंदाताई विजयकर आणि आमदार सुनील केदार यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. आर. जी. टाले यांच्या नेतृत्वात महाविद्यालयाची शैक्षणिक प्रगती सुरू आहे.

पॉल ब्रिक्‍सचे अतिक्रमण
भानेगाव ग्रामपंचायत हद्दीत लाल विटा तयार करणारा पॉल ब्रिक्‍स हा कारखाना आहे. कंपनीच्या मालकाने भानेगाव, बिना संगम, सिल्लेवाड्याला जोडणाऱ्या 40 फूट शासकीय जागेवर अतिक्रमण केले. या ठिकाणी पाण्याची टाकी, झोपडे, सिमेंट कॉंक्रिटची पक्की घरे बांधण्यात आली. परंतु, तलाठ्यापासून साऱ्याच शासकीय कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे.

उड्डाणपूल ठरतोय यमदूत
ग्रामपंचायत हद्दीतील 123 हेक्‍टर जमिनीवर 500 मेगावॉट वीजनिर्मिती केंद्र उभारण्यात आले. या वीज केंद्राला लागणारा कोळसा अन्य राज्यांतून मागविण्यात येतो. कोळशाची रेल्वेने ने-आण करण्यासाठी महानिर्मितीने भानेगाव-कामठी मार्गावर सहा
रेल्वे ट्रक तयार केले. वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी महानिर्मितीने कोट्यवधी रुपये खर्च करून पूल तयार केला. मात्र, पुलाची रुंदी कमी असल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अपघातात अनेकांचा जीवही गेला.

भुयारी मार्ग हवाय
रेल्वे ट्रॅकभोवती सुरक्षाभिंत उभारण्याची महानिर्मितीची योजना आहे. सुरक्षाभिंत झाल्यावर विद्यार्थी, कामगार, शेतकरी, नागरिकांना ये-जा करण्यासाठी उड्डाणपूल हा एकमेव मार्ग राहील. परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भुयारी मार्ग बनविण्याची मागणी जोर धरत आहे.

वाळू उत्खनन
भानेगाव परिसरात पारशिवनी तालुक्‍यातील साहोली अ, साहोली ब, डोरली व कामठी तालुक्‍यातील वारोगाव, बिना संगम हे वाळूघाट आहेत. यापैकी काही वाळूघाटांचा लिलाव करण्यात आला. तर, काहींची लिलाव प्रक्रिया रखडली. या घाटांवर कार्यरत व कार्यक्षेत्राबाहेरील महसूल अधिकारी व पोलिसांच्या आशीर्वादाने सर्रास उत्खनन सुरू आहे. माफियांकडून शासनाच्या तिजोरीला कोट्यवधींचा चुना लावत असताना संबंधित विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत आहे.

ट्रकचालकांची अरेरावी
बिना संगम गावात 100 ट्रकचालक मालक आहेत. अवैध वाळू उत्खननामुळे त्यांना कामाची कमतरता भासत नाही. त्यामुळे ट्रकचालक आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. पोलिसांना वाळूमाफियांकडून प्रतिट्रक 2500 रुपये मिळत असल्याने "तेरी भी चूप, मेरी भी चूप' असा प्रकार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

समाजभवनावर अतिक्रमण
ग्रामपंचायत हद्दीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या फंडातून संत रविदास सभागृह व वेकोलिच्या सीएसआर फंडातून 17 लाख 81 हजार रुपये खर्च करून सर्वसामान्यांसाठी दोन मोठ्या समाजभवनांची निर्मिती करण्यात आली. वेकोलि प्रशासनाने बांधून दिलेल्या समाजभवनावर ग्रामपंचायतीचे कार्यालय असल्याने ग्रा.पं.च्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले.
......................
वीटभट्ट्यांमुळे आरोग्य धोक्‍यात
भानेगाव व बिना संगम ग्रामपंचायत परिसरात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या आहेत. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. वीटभट्टीमालकांकडून पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसविले जात असताना याकडे दुर्लक्ष होत आहे.
........................
समस्यांचे आठवडी बाजार
ग्रामपंचायत हद्दीत दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो. परंतु, हा बाजार समस्यांचे माहेरघर बनला आहे. बाजारात पारशिवनी, इटगाव, गुंडरी, हिंगणा, साहोली, शिंगोरी, डोरली, भानेगाव, बिना संगम, सिल्लेवाडा, रोहना, पोटा, वलनी, पिपळा डागबंगला, दहेगाव आदी गावांतील शेतकरी आठवडी बाजारात पालेभाज्या व अन्य साहित्यांची दुकाने थाटतात. वर्षाकाठी आठवडी बाजाराचा लिलाव करण्यात येतो. मात्र, या ठिकाणी बाजाराच्या दिवशी घाणीचे साम्राज्य असते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. शिवाय ग्रामपंचायत प्रशासन याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करते. नवीन बिना भानेगाव-कामठी मार्गावर आठवडी बाजार असल्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्याने वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण झाला. शिवाय अपघाताच्या लहानमोठ्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. अज्ञात चोरट्यांकडून चोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
........
स्थानिक नेत्यांप्रति जनतेत नाराजी
प्रधानमंत्री जनधन योजना, खासदार निधी, आमदार निधी, जिल्हा परिषद निधीच्या माध्यमातून गावांचा तुटपुंजा विकास होत असला तरी समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. व्यायामशाळा, खेळाचे मैदान गावात नाही. ज्या वीज केंद्रासाठी शेतकऱ्यांनी जवळपास 123 हेक्‍टर जमीन दिली ते विद्युत मंडळ गावाला शुद्ध पाणी पुरवू शकत नाही. उलट प्रदूषणवाढीस हातभार लावत आहे. या साऱ्या प्रकारावर स्थानिक नेते चुप्पी साधून असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाप्रति रोष आहे. स्थानिक नेतृत्वाने समंजसपणा दाखवून समन्वयाची भूमिका पार पाडल्यास समस्या सुटण्यास वेळ लागणार नाही, हे नक्‍की.

समस्या यांना सांगा
खासदार कृपाल तुमाने : 9823268322
आमदार सुनील केदार : 9422108360
सरपंच रवींद्र चिखले : 9822470014
ग्रामविकास अधिकारी : 9730103078

संकलन : अहमद हुसेन शेख (9881380607)

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.