photo, Devanad Sakharkar, chandrapur |
चिमणीचे घर होते मेणाचे, कावळ्याचे घर होते शेणाचे.
एक दिवस काय होतं, खूप धो-धो पाऊस येतो.
कावळ्याचं घर शेणाचं असल्यामुळे वाहून गेलं, चिमणीचं घर राहून गेलं.
ही कहाणी लहानपणी सर्वांनीच ऐकली असेल. परंतु, आता मात्र समेटच्या जंगलात चिऊताईचे अस्तित्व धोक्यात आले आहे. घरात येऊन आरशावर टक टक असा आवाज करणारी, घरातील ङ्कोटोच्या मागे गवत, काडीकच-यापासून घरटे बनविणारी चिमणी आज दिसेनाशी झाली आहे. अंगणात काही धान्य वगैरे वाळत घातलं की, थुई-थुई नाचत येणारी चिमणी आज दुर्मिळ झाली आहे. आपण झोपेतून उठतो तेव्हा पक्ष्यांचा चिवचिवाट कानी पडत नाही, तर गाड्यांचे आवाज कानावर आदळतात. त्यामुळे सध्या ज्या चिमण्या अस्तित्वात आहेत, त्या टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी झाडावर मातीचे मडके बांधून त्यात पाणी ठेवावे व मिनरल वॉटरच्या बाटलीमध्ये खाऊ ठेवावा. त्यामुळे घराशेजारील परिसरामध्ये चिवचिव असा आवाज दरवळेल. असा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. त्याप्रमाणे शाळा महाविद्यालयातील विद्याथ्र्यांनादेखील चिऊताईचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, याची विद्याथ्र्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. आधी चिऊताई घरामध्ये कच-याचे घरटे करीत होती. परंतु, आपल्या बदलत्या सवयीमुळे चिऊताईचे घरटे अनेकदा मोडत असतो. त्यासोबत उन्हाळ्यात पाण्यासाठी लाही- लाही होते. त्यामुळे पाण्याचे जलपात्र ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
भारतात सर्वात जास्त संख्येने असणारा पक्षी म्हणून चिमणी परिचयाची आहे. नर चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात. मादी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते.