चंद्रपूर : मागील दोन दिवसात सूर्याचा पारा चढला आहे. पुढील आठवड्यात हा पारा ४0 अंश सेल्सीअसच्या वर जाईल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे.
मागील वर्षी पावसाने कहरच केला. पावसाळ्याच्या अगदी प्रारंभीच पावसाचे आगमन झाले. पुढे सतत चार महिने पाऊस कोसळतच राहिला. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड पावसाने त्यावेळी मोडीत काढले. सातत्याने पूरपरिस्थिती निर्माण होत राहिली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी तीन वेळा पूर आला. या अतवृष्टीत शेतकर्यांचे फार मोठे नुकसान झाले. अडीच-तीन लाख हेक्टरवरील खरीप पिके मातीमोल झाली. खुद्द मुख्यमंत्र्यांनाही जिल्ह्याचा दौरा करावा लागला होता. त्यानंतर हिवाळ्यातील काही महिने पाऊस आला नाही. मात्र उन्हाळ्याच्या तोंडावर पुन्हा अकाली पाऊस व गारपिटीने जिल्ह्याला झोडपून काढले. अनेक दिवस ढगाळ वातावरण कायम राहिले. त्यामुळे चंद्रपूरसारख्या 'हॉट' जिल्ह्यात यंदा उन्हाळा जरा विलंबाने सुरू झाला. एरवी फेब्रुवारीच्या दुसर्या पंधरवड्यापासूनच चंद्रपुरात उन्हाळ्याला प्रारंभ होतो. मार्च महिण्यात तर उन्हाची काहिली वाढली असते. होळीला आणखी तापमान वाढलेले असते. मागील वर्षी २१ मार्च रोजी ४१ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली होती. मात्र यावेळी अकाली पावसामुळे फेब्रुवारी व मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात वातावरणात गारवाच होता. अगदी होळीच्या दोन दिवसापूर्वीपर्यंत पाऊसच कोसळत होता.
आता होळीनंतर मात्र सूर्याचा पारा चढू लागला आहे. दुपारी उन्हाचे चटके असह्य होऊ लागले आहेत. आज रविवारी ४0 अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली आहे. सुर्याचा पारा चढल्याने नागरिकांनी अडगळीत पडलेले कुलर्स बाहेर काढणे सुरू केले आहे. बाजारपेठेत, रस्त्यावर, चौकाचौकात शीतपेयाची दुकाने सजली आहेत. चंद्रपूर शहरासह ग्रामीण भागातही उन्हाची काहिली जाणवू लागली आहे. चंद्रपुरात दुपारी रहदारी सुरू असली तरी ती विरळ झाली आहे. नागरिक उन्हापासून बचाव म्हणून आतापासूनच सायंकाळी घराबाहेर पडणे पसंत करीत आहेत.