ज्येष्ठ गीतकार सुधीर मोघे यांचं आज शनिवारी दीर्घ आजारपणात दु:खद निधन झालं आहे. अत्यंत मोठा कवी, संगीतकार आणि गुणी कलाकार महाराष्ट्रानं गमावल्याची खंत व्यक्त होत आहे. त्यांना मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानं पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केलं होतं. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु आज सकाळी त्यांची तब्येत ढासळली आणि अखेर मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांचे निधन झालं.
जीवनावर भरभरून प्रेम करणारा तो एक कलाकार होता आणि मला ज्या ज्यावेळी मदत लागली त्या त्यावेळी ते पाठिशी उभे राहिल्याची भावना कवी संदीप खरे यानं व्यक्त केली. कायम हसतमुख असलेल्या मोघेंना भेटल्यावर मनाची मरगळ दूर होऊन प्रफुल्लित व्हायला व्हायचं असे सांगतानाच माझ्या जडणघडणीत त्यांचा खूप मोठा वाटा असल्याचंही संदीप म्हणाला.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही सुधीर मोघे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. मोघे व आमचे अनेक वर्षांचे संबंध होते असे सांगत एक उत्तम गीतकार असलेले मोघे माणूसही तितकेच सज्जन होते, असे त्या म्हणाल्या. मी त्यांची अनेक गाणी गायली,ती सगळीच उत्तम होती. पण 'विसरू नको श्रीरामा मला' हे त्यांनी लिहीलेलं गाणं आपल्या विशेष आवडीचं गाणं असल्याचे त्या म्हणाल्या.
सुधीर मोघे यांचे साहित्यातील योगदान
कविता संग्रह
- आत्मरंग
- गाण्याची वही
- पक्षांचे ठसे - ३हून अधिक आवृत्त्या
- लय - एकाहून अधिक आवृत्त्या
- शब्द धून
- स्वतंत्रते भगवती
गद्य
- अनुबंध
- गाणारी वाट - एकाहून अधिक आवृत्त्या
- निरांकुशाची रोजनिशी- एकाहून अधिक आवृत्त्या
चित्रपट गीतकार
सुमारे ५० हून अधिक चित्रपटांचे गीतलेखन त्यांनी केले.
आत्मविश्वास
एक डाव भुताचा
कळत नकळत
चौकट राजा
जानकी
पुढचं पाऊल
राजू
लपंडाव
शापित
सूर्योदय
हा खेळ सावल्यांचा
सुधीर मोघे यांनी लिहिलेली रसिकप्रिय भावगीते आणि चित्रपट गीते
अरूपास पाहे रूपी
आदिमाया अंबाबाई
आला आला वारा
एक झोका चुके काळजाचा
एकाच ह्या जन्मी जणू
काजल रातीनं ओढून नेला
कुण्या देशीचे पाखरू
गोमू संगतीनं माझ्या तू
जरा विसावू या वळणावर
झुलतो बाई रास-झुला
तपत्या झळा उन्हाच्या
तिथे नांदे शंभू
दयाघना का तुटले
दिसलीस तू फुलले ॠतू
दिसं जातील दिसं येतील
देवा तुला शोधू कुठं
दृष्ट लागण्याजोगे सारे
नवा डाव चल मांडायाला
निसर्गासारखा नाही रे
फिटे अंधाराचे जाळे
भेटशील केव्हा माझिया जिवलगा
मन मनास उमगत नाही
माझे मन तुझे झाले
माय भवानी तुझे लेकरू
मी सोडुन सारी लाज
रात्रीस खेळ चाले
विसरू नको श्रीरामा
शंभो शंकरा करुणाकरा
सखि मंद झाल्या तारका
सूर कुठूनसे आले अवचित
सांग तू माझाच ना
सांज ये गोकुळी सावळी सावळी
हे जीवन सुंदर आहे
हे नायका जगदीश्वरा
सुधीर मोघे यांनी संगीत दिलेली गीते
अज्ञात तीर्थयात्रा
भन्नाट रानवारा मस्तीत शीळ
भेटशील केव्हा माझिया जिवलगा
माझे मन तुझे झाले
रंगुनी रंगात सा-या
संगीत दिग्दर्शन
कशासाठी प्रेमासाठी : मराठी चित्रपट
सूत्रधार : हिंदी चित्रपट
स्वामी , अधांतरी, नाजुका : मराठी दूरदर्शन मालिका
हसरतें , डॉलर बहु , शरारतें : हिंदी मालिका
रंगमंचावरील कार्यक्रम: संकल्पनां, संहिता आणि दिग्दर्शन
कविता पानोपानी
नक्षत्रांचे देणे : कुसुमाग्रज यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम
नक्षत्रांचे देणे : शांता शेळके यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम
नक्षत्रांचे देणे : सुधीर फडके यांचे संगीत असलेल्या गाण्यांचा कार्यक्रम
मंतरलेल्या चैत्रबनात
स्मरणयात्रा
"उत्तररात्र" रॉय किणीकर-काव्यप्रयोग
सुधीर मोघे यांना मिळालेले पुरस्कार
महाराष्ट्र राज्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार ४ वेळा
सूरसिंगार पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार २ वेळा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्यातर्फे कृतज्ञता पुरस्कार
गदिमा प्रतिष्ठानातर्फे चैत्रबन पुरस्कार
पहिल्या वर्षी सर्वोत्कृष्ट गीतकार मटा गौरव पुरस्कार
पहिल्या वर्षी सर्वोत्कृष्ट गीतकार अल्फा गौरव पुरस्कार
'मराठी कामगार साहित्य परिषदे 'तर्फे 'गदिमा पुरस्कार' - २००६
'महालक्ष्मी ' पुरस्कार - २००६
'महाराष्ट्र साहित्य परिषदे'चा 'कविवर्य ’ना.घ. देशपांडे' पुरस्कार - २००६
'दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान ' - प्रथम वर्ष 'शांता शेळके 'पुरस्कार - हस्ते श्रीमती लता मंगेशकर २००७
साहित्यकार 'गो. नी. दांडेकर 'स्मृती पुरस्कार - मृण्मयी पुरस्कार २००८
केशवसुत पुरस्कार २०११
’रोटरी क्लब’, डोंबिवली यांच्यातर्फे ‘व्होकेशनल एक्सलन्स’ पुरस्कार - (२०११-१२)
सोमण परिवार आणि कुटुंबीयांतर्फे शब्दस्वरप्रभू ’अजित सोमण’ पुरस्कार - (२० ऑगस्ट २०१३).