সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, February 01, 2013

कच्च्या कैद्यांना पक्का वादा



चंद्रपूर- येथील जिल्हा कारागृहातील एका अधिकाऱ्याने धनाढ्य कच्च्या कैद्यांचा विमा उतरविण्याचा धंदा सुरू केला आहे. एखाद्या कैद्याने त्याच्याकडे विमा उतरविल्यास कारागृहात त्याला "विशेष' सुविधा पुरविल्या जातात, अशी धक्कादायक माहिती समोर आली. या कारागृहातील काही कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची तक्रार थेट गृहमंत्र्यांकडे केली. 
येथील जिल्हा कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यांतील कच्च्या कैद्यांना ठेवले जाते. यातील काही कच्चे कैदी हे धनाढ्य असतात. त्यांना जामीन मिळेपर्यंत कारागृहात त्रास नको असतो. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला ते तयार असतात. कैद्यांच्या याच असाह्यतेचा लाभ उठविण्याची शक्कल कारागृहातील एका अधिकाऱ्याने शोधली. या अधिकाऱ्याची पत्नी विमा एजंट आहे. पत्नीचे विम्याचे "टार्गेट' पूर्ण करण्यासाठी हा अधिकारी कारागृहातील धनाढ्य कच्च्या कैद्यांचा विमा उतरवीत असतो. त्या मोबदल्यात या कैद्यांना कुठलाही त्रास होणार नाही, याची हमी दिली जाते. 
विमा काढलेल्या कैद्यांना मोबाईल, बिडी, सिगारेट आदी गोष्टी राजरोसपणे वापरण्याची परवानगी असते, असे या कारागृहातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कैदी कारागृहात बंद असतानाच विमा काढण्याचे सर्व सोपस्कार पार पाडले जातात. त्याची स्वाक्षरी, छायाचित्र, पॉलिसीसाठी आवश्‍यक वैद्यकीय तपासणी कैदी कारागृहात असतानाच केली जाते. 
न्यायालयाने एकदा कैद्याची कारागृहात रवानगी केल्यानंतर त्याला बाहेर निघता येत नाही. आप्तांना भेटण्यासाठी विशेष वेळ आणि दिवस ठरलेला असतो. कैद्यांसाठी कारागृहाचे काही नियम असतात. मात्र, या अधिकाऱ्याने विमा काढण्यासाठी नियमांनाच केराची टोपली दाखविली. हा अधिकारी केवळ कैद्यांपर्यंतच थांबला नाही, तर कारागृहातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांनीही विमा उतरवावा, यासाठी तो प्रयत्नरत असतो. एका लिपिकाने त्याच्याकडे विमा उतरविला; मात्र त्याला हप्ते भरणे शक्‍य झाले नाही. त्यामुळे त्याचा छळ सुरू झाला. परिणामी मागील वर्षभरापासून हा लिपिक कामावरच आला नाही, असे त्याच्या सहकाऱ्यांनी "सकाळ'ला सांगितले.
कारागृहात दररोज नवे कैदी येत असतात. त्यांच्याकडून विमा उतरविण्याचे सत्र सुरूच असते. त्यामुळे या अधिकाऱ्याची पत्नी गडचिरोली आणि चंद्रपूर या विभागातून विमा काढण्यात अव्वल ठरली. नागपूर येथे असतानाही या अधिकाऱ्याने असेच प्रताप केल्याचे समजते. आधीही या अधिकाऱ्याची तक्रार अप्पर पोलिस महासंचालक (कारागृह विभाग) यांच्याकडे झाली होती. चौकशीसाठी अधिकारीही आले; मात्र या अधिकाऱ्यांच्या आदरातिथ्यामुळे चौकशी "टिकली' नाही. आता पुन्हा अशीच तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली आहे. या तक्रारीच्या प्रती अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), कारागृह उपमहानिरीक्षकांना पाठविण्यात आल्या आहेत. "करो जादा का इरादा' असे विमा कंपनीचे घोषवाक्‍य आहे. या घोषवाक्‍याची "री' ओढत हा अधिकारी अवघ्या कारागृहालाच वेठीस धरत आहे. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.