সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, January 19, 2019

चंद्रपूर जिल्ह्यासाठी अतिरिक्त 327 कोटींची मागणी

चंद्रपूर/प्रतिनिधी:

  ग्रामीण विकास कार्यक्रम, सामाजिक सामूहिक सेवा, पाटबंधारे, पाणीपुरवठा यासह आयटीआय, प्राथमिक शाळा, दवाखाने, अंगणवाडी यांचे बांधकाम व दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली. यासाठी जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज 327 कोटींचा अतिरिक्त निधीची मागणी जिल्हा वार्षिक योजनेसाठी केली. तर जिल्ह्यासाठी नवा पशुवैद्यकीय आराखड्याला तयार करण्याची सूचना या बैठकीत करण्यात आली.

नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 सर्वसाधारण योजनेचा आढावा घेण्यात आला. राज्याचे वित्त, नियोजन वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला वित्त राज्यमंत्री दिपक केसरकर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार,आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, महानगरपालिका आयुक्त संजय काकडे व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बांधकाम व दुरुस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम व विस्तारीकरण करणे, अंगणवाडी बांधकाम, याशिवाय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या वर्कशॉप, प्रशासकीय इमारतीसाठी नवीन जमीन संपादन, बांधकाम करणे, महाराष्ट्र नगरोत्थान अभियानांतर्गत नागरी वस्तीचा विकास, नागरिकांच्या आरोग्याशी निगडित पायाभूत सुविधांचा विकास, घनकचरा व्यवस्थापन, सामाजिक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या घटकांवर प्रामुख्याने चर्चा झाली.

संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दुरुस्ती आणि विस्तारीकरण याबाबत यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सूचना केल्यात. या संदर्भातील आराखडा पशुवैद्यकीय विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या मार्गदर्शनात तयार करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. याशिवाय चंद्रपूर, बल्लारशा महानगरातील सीसीटीव्ही कॅमेराच्या संदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीला आवर्जून उपस्थित असणारे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समक्ष महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्याच्या विस्तारीकरणामध्ये येणाऱ्या इलेक्ट्रिक पोल व डीपीच्या शिफ्टिंग संदर्भातही चर्चा झाली. 

यापूर्वी 13 डिसेंबर रोजी झालेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्याच्या बैठकीमध्ये तीनही घटक योजनांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा 2019-20 या वर्षाकरिता 347 कोटीच्या वार्षिक आराखड्याला मंजूरी मिळाली होती. आता अतिरिक्त मागणी त्यामध्ये करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समिती योजना, चांदा ते बांदा, मानव विकास मिशन, खनीज विकास निधी, अर्थसंकल्पातील तरतूद आदी घटकांची उपलब्धता आहे. आज जिल्हा वार्षिक आराखडा यांच्या सर्वसाधारण घटकातील अतिरिक्त मागणीवर विचार झाला.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.