সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, January 27, 2019

अटल महाआरोग्य शिबिरात ५० हजारांवर रुग्णांनी घेतला लाभ

नागपूर/प्रतिनिधी:

अटल आरोग्य महाशिबिराच्या माध्यमातून आरोग्याची मोठी व्यवस्था शासनाने राज्यभर उभारली. कुठलाही गरीब व्यक्ती यापुढे उपचाराविना मृत्यू पावणार नाही. महाआरोग्य शिबिरांनी राज्यात क्रांती घडविली आहे. या माध्यमातून शासनाने नागरिकांना आरोग्याचे ‘सुरक्षा कवच’ दिले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

महाराष्ट्र शासन आणि स्व. प्रभाकरराव दटके स्मृति सेवा संस्थेच्या वतीने स्व. दिवाकरराव धाक्रस स्मृति परिसर रेशीमबाग मैदान येथे रविवारी (ता. २७) आयोजित अटल आरोग्य महाशिबिराच्या उद्‌घाटन कार्यक्रमात उद्‌घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी मंचावर खासदार डॉ. विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, आमदार सुधाकर देशमुख, आमदार विकास कुंभारे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार गिरीश व्यास, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर तथा अटल महाआरोग्य शिबिराचे मुख्य संयोजक नगरसेवक प्रवीण दटके, स्व. प्रभाकरराव दटके स्मृति सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष राऊत उपस्थित होते. 

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी अटल महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून राज्यभरात गोरगरीबांच्या आरोग्यासाठी कार्य केले. गरीब आणि मध्यमवर्गीयांना आरोग्याचा प्रश्न भेडसावतो आहे. रोगाचे निदान झाल्यानंतर उपचारांवर लाखोंचा खर्च होतो. पैशाअभावी अनेकजण उपचार करू शकत नाही. हेच लक्षात घेऊन राज्य सरकारने विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून उपचाराचा मोफत लाभ देणे सुरू केले. राज्य सरकारने जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून दीड लाख रुपयांपर्यंतचा उपचार गरीबांना दिला. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराचा लाभ रुग्ण घेऊ शकतो. मुख्यमंत्री सहायता निधीसुद्धा मुख्यमंत्री कक्षाच्या माध्यमातून दिला जातो. एकट्या नागपुरात ४० कोटींची तर संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत ५०० कोटींची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून उपचारासाठी देण्यात आली. यापुढे कोणीही आरोग्याच्या कारणामुळे व्यथित होणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला. 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी बोलताना म्हणाले, छोटूभैय्या धाक्रस आणि प्रभाकरराव दटके हे क्रियाशील आणि उत्साही कार्यकर्ते होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्य केले. या दोन्ही उत्तम कार्यकर्त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आयोजिण्यात आलेले हे शिबिर मध्य नागपुरातील लोकांसाठी उपचाराच्या दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे. सुमारे ५० हजारांवर लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला, याचा आपणास आनंद आहे. गरीब, दीनदुबळ्यांची सेवा करणे हे आयुष्यातल सर्वात चांगले कार्य आहे. ना. गिरीश महाजन यांनी हा यज्ञ राज्यभर केला. प्रवीण दटके यांच्यासारखे गरीबांची कणव असलेले कार्यकर्ते स्वत: पुढाकार घेऊन असे शिबिर आयोजित करून आरोग्याच्या या यज्ञात समीधा टाकण्याचे कार्य करीत असल्याचे ते म्हणाले. 

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन म्हणाले, राज्यभरात आयोजित केलेल्या आरोग्य महाशिबिरांमुळे गोरगरीब जनतेला आधार मिळाला. एक दिवसाचे शिबिर झाले म्हणजे कार्य थांबत नाही तर पुढील चार ते सहा महिने शिबिरात उपचार घेणाऱ्या प्रत्येक रुग्णांवरील उपचाराचा पाठपुरावा करण्यात येतो. मागील १५ वर्षांत झाला नसेल इतका खर्च आरोग्यावर केवळ गेल्या चार वर्षांत मुख्यमंत्री सहायत निधीतून करण्यात आला. सामान्य माणसाला मदतीचा हात देण्याचे कार्य शासनाने केल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. 

प्रास्ताविका शिबिराचे मुख्य संयोजक नगरसेवक प्रवीण दटके यांनी शिबिराच्या आयोजनाबाबत माहिती दिली. मध्य नागपुरातील विविध वस्त्यांमध्ये २४ ठिकाणी १६ ते १८ जानेवारी आणि २१ ते २३ जानेवारीदरम्यान ओपीडी झाली. यामध्ये ४७ हजार नागरिकांची नोंदणी झाली. १९ हजार रुग्णांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. महाशिबिरात आलेल्या रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया तातडीने तर मोठ्या शस्त्रक्रिया तारीख देऊन करण्यात येतील. या शिबिरानंतर सुमारे सहा महिने प्रत्येक रुग्णावरील उपचाराचा पाठपुरावा करून अखेरच्या रुग्णांपर्यंत लाभ देण्यात येईल. यासाठी महाल येथे स्वतंत्र कार्यालय तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीपप्रज्वलन करून शिबिराचे विधीवत उद्‌घाटन केले. यानंतर अटल आरोग्य महाशिबिरात सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिबिराच्या आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या जी.एम. फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांचाही सत्कार करण्यात आला. संपूर्ण शिबिराची धुरा सांभाळणारे रामेश्वर नाईक यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन माजी नगरसेवक बंडू राऊत यांनी केले. आभार स्व. प्रभाकरराव दटके स्मृति सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष राऊत यांनी मानले.

सर्व विकारांवर उपचार
रेशीमबाग मैदानावर रुग्णांच्या सोयीनुसार विकारनिहाय तपासणी आणि उपचार व्यवस्था करण्यात आली होती. शिबिरात नेत्ररोग, हृदयरोग, अस्थिव्यंगोपचार, जनरल सर्जरी, मेंदूरोग, बालरोग, मुत्ररोग,प्लास्टिक सर्जरी, कान, नाक, घसा, स्त्री रोग, कर्करोग, दंतरोग या रोगांची रोगांची तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया तर जनरल मेडिसीन, लठ्ठपणा यावर तपासणी व उपचार करण्यात येतील, अशी माहिती आयोजकांनीदिली.

सेवेकऱ्यांची सेवा
अटल आरोग्य महाशिबिराच्या निमित्ताने स्व. दिवाकरराव धाक्रस स्मृति परिसरात अनेक सेवेकरी रुग्णांना सेवा देत होते. रुग्णांसाठी ३० रुग्णवाहिका परिसरात फिरत होत्या. आरोग्य शिबिर संपूर्ण रेशीमबाग मैदानावर असल्यामुळे वृद्ध रुग्णांना, महिलांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ४० मॅक्सीकॅबची व्यवस्था होती. मॅक्सीचे चालक संपूर्ण दिवसभर रुग्णांची ने-आण करण्यात व्यस्त होते. एका बाजूला भोजनाच्या व्यवस्थेत काही स्वयंसेवक व्यस्त होते. शिबिरात येणाऱ्या प्रत्येकाला आग्रहाने भोजन देत होते. शिबिरातील डॉक्टर, परिचारिका रुग्णांना सेवा देताना कुठेही थकले नाही. सफाई कर्मचारी परिसरात होणारा कचरा उचलत होते. आयोजकांपैकी सर्व कार्यकर्ते रुग्णांना माहिती सांगत होते आणि त्यांची मदत करीत होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.