সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, January 29, 2019

मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्‍थापन होणार

  • राज्‍य मंत्रीमंडळाचा निर्णय
  • अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराचे फलीत
चंद्रपूर, दि.29 जानेवारी- चंद्रपूर जिल्‍हयातील मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्‍थापन करण्‍याचा निर्णय राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या आज झालेल्‍या बैठकीत घेण्‍यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने राज्‍य शासनाने हा निर्णय घेतला आहे. जुलै 2018 च्‍या नागपूर येथे झालेल्‍या पावसाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाडा व उत्‍तर महाराष्‍ट्राच्‍या विकासासाठी घोषीत करण्‍यात आलेल्‍या विशेष पॅकेजमध्‍ये राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी यासंबंधीची घोषणा केली होती. 



चंद्रपूर जिल्‍हयातील नागरिकांच्‍या उपजिवीकेचे साधन प्रामुख्‍याने जंगल व शेतीवर आधारित आहे. सदर जिल्‍हयातील नागरिकांची कृषी शिक्षण घेण्‍याची मानसिकता असून सुध्‍दा सदर जिल्‍हा मागास असल्‍यामुळे या जिल्‍हयांमध्‍ये युवक व युवतींसाठी कृषी शिक्षणाची सुविधा उपलब्‍ध करणे गरजेचे आहे. ज्‍यामुळे आधुनिक कृषीतंत्रज्ञानाचा प्रसार करण्‍यासाठी ग्राम पातळीवर विस्‍तार कार्यकर्ते, ग्रामसेवक, कृषीमित्र व तज्ञ मार्गदर्शक निर्माण होवू शकतील. या क्षेत्राची ही विशिष्‍ट गरज लक्षात घेता डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्‍थापन करण्‍याबाबतचा प्रस्‍ताव विद्यापीठामार्फत शासनाला सादर करण्‍यात आलेला आहे. या प्रस्‍तावाला आज मंत्रीमंडळाची मान्‍यता मिळाली आहे.

मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्‍थापन झाल्‍यास जिल्‍हयातील युवक युवतींसाठी कृषी पदवीधर अभ्‍यासक्रमाची सुविधा निर्माण होणार असुन त्‍या माध्‍यमातुन बदलत्‍या हवामानानुसार कृषी व्‍यवसाय, शेतीपूरक व्‍यवसाय व शेती उद्योग ज्‍या मुळे कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार या भागात होवू शकतो. तसेच शेतक-यांना आधुनिक पध्‍दतीने शेती कशी करावी यासंबंधीचे प्रशिक्षण व सल्‍ला देवून पिकांची उत्‍पादकता वाढून पर्यायाने त्‍यांचा आर्थिकस्‍तर उंचावेल. ही गरज लक्षात घेता हे महाविद्यालय स्‍थापन करण्‍याचा प्रस्‍ताव शासनाला सादर करण्‍यात आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्‍या कार्यक्षेत्रांतर्गत विदर्भातील 11 जिल्‍हयांचा समावेश होतो. सद्यःस्थितीत पूर्व विदर्भातील 5 जिल्‍हयांसाठी केवळ दोनच घटक कृषी महाविद्यालये कार्यरत असून पूर्व विदर्भातील विकासाचा अनुशेष भरून काढण्‍यासाठी सदर शासकीय कृषी महाविद्यालय सहाय्यभूत ठरणार आहे.

मुल लगतच्‍या मारोडा, सोमनाथ येथे विद्यापीठाच्‍या माल‍कीची 61.80 हे, जमीन उपलब्‍ध आहे. यापैकी 41.80 हेक्‍टर जमीन या कृषी महाविद्यालयासाठी उपलब्‍ध होवू शकते. या कृषी महाविद्यालयासाठी शेती प्रयोगासाठी आवश्‍यक 30 हेक्टरजमीनीची निकड उपलबध जमिनीतून भागविली जावू शकते. झुडपी जंगल कृषी शाखेच्‍या विद्यार्थ्‍यांना पर्यावरण आणि जैवविविधतेच्‍या दृष्‍टीकोणातुन अभ्‍यासासाठी उपयुक्‍त ठरू शकते. या सर्व बाबी लक्षात घेता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत मुल येथे 60 विद्यार्थी प्रतिवर्ष प्रवेश क्षमतेचे शासकीय कृषी महाविद्यालय स्‍थापन करण्‍याचा निर्णय राज्‍य मंत्रीमंडळाने घेतला आहे.

चंद्रपूर जिल्‍हयातील कृषी शिक्षण व प्रशिक्षण या प्रक्रियेच्‍या माध्‍यमातुन जिल्‍हयाचा कृषी विषयक विकासाला या कृषी महाविद्यालयाच्‍या स्‍थापनेने गती मिळणार आहे. या आधीही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्‍हयातील कृषी क्षेत्राच्‍या विकासाच्‍या दृष्‍टीने अनेक महत्‍वपूर्ण निर्णय घेतले आहेत. चंद्रपूर जिल्‍हयातील 96 हजार शेतक-यांना कर्जमुक्‍तीचा लाभ, चंद्रपूर तालुक्‍यातील अजयपुर येथे पंजाब नॅशनल बँकेच्‍या सहका-र्यांने शेतकरी प्रशिक्षण केंद्राची स्‍थापना, टाटा ट्रस्‍ट च्‍या सहकार्याने92 गावांमध्‍ये समृध्‍द शेतकरी प्रकल्‍प, जे.के. ट्रस्‍ट्र च्‍या सहकार्याने जिल्‍हयात 15 ठिकाणी भाकड गायींचे दुध उत्‍पादक गायींमध्‍ये रूपांतरण करण्‍याचा प्रकल्‍प, पोंभुर्णा येथे मधुमक्षीका पालनाचा कृषी उद्योग, चांदा ते बांदा या योजनेच्‍या माध्‍यमातुन जिल्‍हयात मोठया प्रमाणावर बंधा-यांची निर्मीती, चिचडोह बॅरेज च्‍या माध्‍यमातुन चंद्रपूर व गडचिरोली जिल्‍हयातील 43 गावांना सिंचनाचा लाभ, जिल्‍हयातील माजी मालगुजारी तलावांच्‍या दुरूस्‍तीसाठी मोठया प्रमाणावर निधीला मंजूरी, विशेष बाब या सदराखाली मुल आणि पोंभुर्णा या तालुक्‍यातील शेतक-यांसाठी सिंचन विहीरींना मंजूरी, पळसगांव-आमडी उपसा सिंचन योजना हा महत्‍वाकांक्षी सिंचन प्रकल्‍प, चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मुल तालुक्‍यातील चिचाळा व लगतच्‍या गावांमध्‍ये पाईपलाईन द्वारे सिंचन सुविधा उपलब्‍ध करण्‍याचा 23 कोटी रू. किंमतीचा महत्‍वाकांक्षी प्रकल्‍प, पोंभुर्णा येथे टाटा ट्रस्‍ट च्‍या सहकार्याने अगरबत्‍ती उत्‍पादन प्रकल्‍प, टूथपिक उत्‍पादन प्रकल्‍प, विसापूर आणि पोंभुर्णा येथे बांबु हॅन्‍डीक्राफ्ट ॲन्ड आर्ट युनिटची स्‍थापना, दुग्‍धव्‍यवसाय प्रकल्‍प आदी महत्‍वपूर्ण निर्णय घेत शेतक-यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्‍यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्‍या प्रयत्‍नांना मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्‍थापन करण्‍याच्‍या निर्णयाने नवा आयाम प्राप्‍त झाला आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.