नागपूर/प्रतीनिधी:
ग्रामिण भागातील वीजेसंदर्भातील तक्रारींचे त्वरीत निराकरण व्हावे यासाठी दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय प्रमाणपत्र असणाऱ्या राज्यातील २३ हजार युवकांना आगामी काळात ग्राम विदुयत व्यवस्थापक पदावर नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ग्राम विद्युत व्यवस्थापकाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र स्विकारतांना प्रशिक्षणार्थी. |
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्राम विद्युत व्यवस्थापकाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केलेल्या नागपूर जिल्ह्यातील उमेदवारांना शनिवारी (दि .19) ऊर्जामंत्रांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. ग्राम विदुयत व्यवस्थापकाच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांच्या मार्फ़त ग्रामीण भागात महावितरणच्या कामासोबतच ग्रामपंचायत क्षेत्रातील गावांतील वीज दुरुस्तीची कामे करता येणार आहेत. नियुक्त करण्यात येणा-या ग्राम विदुयत व्यवस्थापकांना महावितरणशी निगडित वितरण हानी कमी करणे, वीज चोरीला प्रतिबंध घालणे या स्वरूपाची कामे करावी लागणार आहेत. सोबतच आगामी काळात सौर ऊर्जेचे महत्व लक्षात घेता शाळा, शासकीय कार्यालये, आरोग्य केंद्र या ठिकाणी यंत्रणा लावण्यासाठी पाठपुरावा करणे. शेतकरी, घरगुती वीज ग्राहकामध्ये सौर ऊर्जेसाठी जागृती करण्याची जावबदारी ग्राम विदुयत व्यवस्थापकाची राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ग्राम विदुयत व्यवस्थापक हा महावितरण आणि वीज ग्राहक यांना जोडणारा दुवा आहे. तुमचे काम जोखमीचे असल्याने काम करतेवेळी पुरेशी खबरदारी घेण्याची कळकळीची सूचनाही बावनकुळे यांनी उपस्थित सर्व ग्राम विदुयत व्यवस्थपकांना केली. ग्राम पंचायतीच्या हद्दीत काम करतेवेळी ग्राम विदुयत व्यवस्थापकाच्या कामाचे मुल्यांकन स्थानिक शाखा अभियंत्यांमार्फत करण्यात येऊन त्याअनुषंगाने विद्युत सहाय्यकांच्या पदभरतीवे वेळी त्यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवण्याच्या सुचनाही ऊर्जामंत्री यांनी यावेळी केल्या.
यावेळी प्रशिक्षण देण्यात आलेल्या १५३ ग्राम विदुयत व्यवस्थपकांना प्रमाणपत्र देण्यात आले. नागपूर प्रशिक्षण केंद्रात सप्टेंबर-२०१८ पासून ७ तुकड्यामध्ये निवड झालेल्या उमेद्वारांना २०० तासांचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिली. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, कार्यकारी संचालक (मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे, नागपूर जिल्हा विदुयत सनियंत्रण समितीचे अध्यक्ष गिरीश देशमुख, कामठी तालुका विदुयत सनियंत्रण समितीचे अध्यक्ष मोबीन पटेल, ग्राहक सल्लागार गौरी चंद्रायण, जिल्हा परिषद सभापती उकेश चव्हाण, अधीक्षक अभियंता उमेश शहारे, नारायण आमझरे, मनीष वाठ, विदुयत निरीक्षक उमाकांत धोटे, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे सहायक संचालक प्रवीण खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी केले.