आपल्या कोणत्याही तक्रारीसाठी डायल करा 155-398
चंद्रपूर, दि.30 जानेवारी- जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'हॅलो चांदा' या ऑनलाइन तक्रार निवारण केंद्राद्वारे आतापर्यंत तब्बल 7 हजार 936 तक्रारींचा निपटारा करण्यात यश आले आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून, त्यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले हॅलो चांदा ऑनलाइन तक्रार निवारण केंद्र 155-398 या टोल फ्री क्रमांकावर समस्या सोडविणारा देशातील पहिलाच जिल्हा ठरला आहे.
या अभिनव उपक्रमाची सुरुवात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या हस्ते 15 जुलै 2017रोजी करण्यात आली. नागरिकांना ऑनलाइन तक्रार करण्यासाठी 155-398 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सेवेद्वारे जातीचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र मिळण्यातील दिरंगाई, 7/12, 8अ, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसान भरपाई, पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास केलेली टाळाटाळ, शाळा अंगणवाडीतील मध्यान्ह भोजन, शेतीविषयक समस्या, अवैध दारूची विक्री, आरोग्यासंबंधित समस्या, वीज, रस्ते आदीविषयी समस्यांची तक्रार करण्याची सुविधा आहे.
लोकांच्या तक्रारी आल्यास त्या हॅलो चांदा कक्षातील कर्मचाऱ्यांकडून नोंद केल्या जातात आणि तीस दिवसांच्या आत त्या समस्या सोडविल्या जातात. समस्या सुटली अथवा नाही याचा फिडबॅकसुद्धा या सेवेद्वारे घेतल्या जात असल्याने या सेवेला चंद्रपूरकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. जुलैपासून तर आतापर्यंत 8 हजार 474 तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी तब्बल 7 हजार 936 तक्रारीचे निराकरण करण्यात आले. तर केवळ 437तक्रारी प्रलंबित आहेत. ऑनलाइन तक्रार निवारण केंद्राद्वारे नागरिकांना समस्या मांडता येत असून त्या त्वरित सोडविण्यात येत असल्याने नागरिकांची गैरसोय दूर झाली असून सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली अभिनव योजना राज्यात लोकप्रिय ठरली आहे.
26 जानेवारीला भाषणातून कौतुक
जिल्हयात हॅलो चांदा ही योजना उत्तम काम करीत असून या यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हयातील नागरिकांच्या समस्या दूर होत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या भाषणातून या योजनेचे कौतुक केले असून नागरिकांना या योजनेचा लाभ सुध्दा घेण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी नागरिकांना केले आहे.