मुन्नारगुडी-भगत की कोठी तसेच गांधीधाम- विशाखापट्टनम
साप्ताहीक एक्सप्रेसचा चंद्रपूर स्थानकावर थांबा
अहिरांच्या प्रयत्नांना यश
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील विशेषतः चंद्रपूर महानगरात तसेच या जिल्हयात वास्तव्यास असलेल्या दक्षिण व उत्तर भारतीय नागरिकांच्या सुविधेसाठी चंद्रपूर रेल्वे स्थानकावर मुन्नारगुडी ते भगतकी कोठी तसेच गांधीधाम-विशाखापट्टनम या साप्ताहीक रेल्वे गाडयांचा थांबा मंजूर करण्यात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यशस्वी ठरल्याने या दोन्ही रेल्वे गाडया प्रवाशांसाठी फार मोठी उपलब्धी मानली जात आहे.
मागील काही वर्षांपासून या मुन्नारगुडी-भगत की कोठी (ट्रेन नं. 16863/64) तसेच गांधीधाम- विशाखापट्टनम (ट्रेन नं. 18501/02) या दोन्ही साप्ताहीक रेल्वे गाडयांचा थांबा चंद्रपूर रेल्वे स्थानकावर मिळावा अशी मागणी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा खासदार हंसराज अहीर यांचेकडे सातत्याने करण्यात येत होती. या मागणीच्या अनुषंगाने अहीर यांनी या दोन्ही एक्सप्रेसचा थांबा ऐतिहासिक तसेच औद्योगिक वारसा लाभलेल्या चंद्रपूर येथील रेल्वे स्थानकात देण्यात यावा अशी मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री यांचेकडे केली होती. या मागणीची दखल घेवून रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी पत्रा क्र. 2018/सीएचजी/13/99 दि. 16 जानेवारी 2019 रोजीच्या पत्रान्वये उपरोक्त दोन्ही साप्ताहीक रेल्वे गाडयांचा थांबा लवकरच चंद्रपूर रेल्वे स्थानकावर देण्यात येत असल्याचे कळविले आहे.
तामिळनाडू (हिल्स स्टेशन) मुन्नारगुडी येथून सदर गाडी चिदंबरम, वेल्लूपुरम, तांबरम, चेन्नई, एग्मोर, गुडूर, विजयवाडा, वारंगल, बल्लारशाह, चंद्रपूर, नागपूर, भोपाळ, उज्जैन, कोटा, सवाईमाधोपूर, जयपूर, जोधपूर तसेच अन्य मुख्य रेल्वे स्टेशनवरून धावणार असल्याने या गाडीचा चंद्रपूर जिल्हयातील प्रवाशांना विशेषतः तिरूपती बालाजी च्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना अत्यंत सुविधाकारक ठरणार आहे.
विशाखापट्टनम ते गांधीधाम (18501/02) ही साप्ताहीक गाडी गुरूवारी निघेल व स्थानकावर शुक्रवारी स. 8.40 वाजता पोहचेल. या गाडीचा लाभ गुजरात, गांधीधाम ला जाणाऱ्या प्रवाशांना तसेच गीर पर्यटकांसाठी सुविधाकार ठरणार आहे. सदर एक्सप्रेस परतीच्या प्रवासात गांधीधाम येथून रविवारी निघून सोमवारला चंद्रपूर रात्रौ 22.40 ला. येथे पोहचेल. यापूर्वी चंद्रपूर जिल्हयातील प्रवाशांना नवजीवन या एकमेव एक्सप्रेसवर अवलंबून राहावे लागत होते, आता या एक्सप्रेसमुळे लोकांना होणारी असुविधा काही प्रमाणात दूर झालेली आहे. या रेल्वेच्या थांब्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त होत असून या दोन्ही गाड्यांची समयसारणी लवकरच रेल्वे बोर्डाकडून प्रसारीत केली जाणार आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या विशेष प्रयत्नातून मिळालेल्या या दोन्ही साप्ताहीक गाडयांच्या थांब्याबद्दल चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समिती तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व नागरिकांनी अहीर यांचे विशेष आभार मानले आहेत.