সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, January 04, 2015

पचखेडी

पचखेडी

ब्रिटिशकाळात पचखेडीची ओळख बेलडोंगरी अशी होती. पूर्णत: गवळी समाजाची वस्ती असलेले हे गाव आमनदीच्या काठावर वसले होते. नदीकाठावरील भाग अचानक भूस्खलन होऊन खचल्याने संपूर्ण गाव दबले, असे इतिहासतज्ज्ञ सांगतात. 20 वर्षांपूर्वी येथे झालेल्या उत्खननात सोन्याची अंगठी, प्राचीन मातीच्या वस्तू आढळल्या. त्यामुळे ऐतिहासिक कथेला दुजोरा मिळतो. कालांतराने पुन्हा गाव वसले. परसोडी, दहेगाव, खैरलांजी, मदनापूर व केसोरी अशी पाच गावे जवळजवळ होती. त्यामुळे या गावाला "पचखेडी' असे नाव पडल्याचे गावकरी सांगतात. परसोडी राजा या गावातील शेतात भोसले राजे यायचे. नदीवर लहान मुलांसोबत खेळायचे. खाचरावर बसून मुलांना ओढायला लावायचे. सखाराम डहारे या तरुणाने एकट्याने महाराजांचा खाचर ओढून शाबासकी मिळविली होती. त्यामुळे त्याला नागपूर येथील राजवाड्यात गौरविण्यात आले, अशा अनेक आठवणी आहेत. सखराम डहारे यांच्या मुलाने सखास्मृती विद्यालय सुरू करून शैक्षणिक सुविधा निर्माण करून दिली. गोसेखुर्द प्रकल्पातील सोनेगाव व जीवनापूर ही गावे वसल्यामुळे पचखेडी गाव कुही तालुक्‍यातील मोठ्या गावांच्या रांगेत आहेत.


  • दृष्टिक्षेपात पचखेडी 
  • एकूण लोकसंख्या : 4019 
  • पचखेडी : 2932, खैरलांजी : 575, मदनापूर : 512 
  • प्रभाग : 4, सदस्य : 11, 
  • राष्ट्रीयकृत बॅंक 1, खाजगी पतसंस्था 1, 
  • अंगणवाडी 4, आयुर्वेदिक रुग्णालय 1, पशुवैद्यकीय रुग्णालय 1, जि.प. शाळा 1, माध्यमिक विद्यालय 1, कनिष्ठ महाविद्यालय 1, वरिष्ठ महाविद्यालय 1, माता बालसंगोपन केंद्र 1, टपाल कार्यालय 1, वनविभाग कार्यालय 1, विद्युत उपकेंद्र 1, मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 1 

पचखेडी क्रमांक दोन : लोकसंख्या
अंतर्गत गावे : जीवनापूर, सोनेगाव-कुकुडउमरी
....
गावात काय हवे
उद्योग, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत, अंगणवाडीसाठी इमारत, बाजारासाठी स्वतंत्र जागा, शासनमान्य वाचनालय, व्यायामशाळा, शासकीय तंत्रनिकेतन, पॅरामेडिकल कॉलेज, बगिचा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा भवन, व्यसनमुक्‍ती केंद्र, सार्वजनिक शौचालय, पोलिस चौकी.

गावात काय नको
अवैध दारुविक्री, शाळेजवळील मटन मार्केट, उघड्यावरची घाण, चौकातील अतिक्रमण
.....

पाणीपुरवठा/फोटो
सुमारे पाच वर्षांपूर्वी मंजूरी मिळालेल्या 33 लाखांच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेला पुर्णत्वास नेण्यात अपयश आले आहे. साईराम कन्स्ट्रक्‍शनला काम देण्यात आले होते. मात्र, बांधकामाचा टप्पा खर्च झालेला नाही. पचखेडीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या कानबैरीच्या जहरी झाडात जुन्या जलस्त्रोताच्या विहिरीतून आलेल्या जलवाहिनीतून फुटलेल्या छिद्रातून निघणाऱ्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करतात. प्रशासनाच्या व कंत्राटदाराच्या दप्तर दिरंगाईमुळे अजुनही 33 लाख रुपये किमतीच्या राष्ट्रीय पेयजल योजनेतून एकही पाण्याचा थेंब प्यायला मिळाला नाही. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन पचखेडीची पाणीसमस्या मिटविण्यात यावी.

जिवघेण्या विजतारा /फोटो
पचखेडी येथून मदनापूरकडे जाताना वीज वितरणच्या रोहित्रावरील विजतारा उघड्याच असल्याने केव्हाही धोका होऊ शकतो. शाळकरी विद्यार्थी येथून नेहमी ये-जा करतात. रोहित्र रस्त्यालगत असल्याने हाताचा स्पर्श होऊन दुर्घटना घडण्याची शक्‍यात आहे. त्यामुळे त्यावर झाकण बसविण्याची गरज आहे.

प्रवासी निवारा झाला मिनी बार
येथील प्रवासी निवारा पूर्णत: मोडकळीस आल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. पावसाळा आणि उन्हाळ्याच्या दिवसांत महिला, विद्यार्थिनींना अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो. एसटी महामंडळाची बस निवाऱ्यासमोर थांबत नसल्यामुळे नेमके थांबायचे कुठे, असा प्रश्‍न नागरिकांना पडतो. प्रवाशांअभावी भकास असलेल्या थांब्यावर दारुड्यांची मैफिल भरते. त्यामुळे प्रवासी निवारा की मिनी बार, असा प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही.

हातपंपासमोरच घाण /फोटो
दत्तमंदिराजवळील हातपंपासभोवताल गढुळ पाणी साचले आहे. शेजारीच शेणखताचे खड्डे आहेत. त्यामुळे येथे नेहमीच दुर्गंधी असते. ही घाण हातपंपाजवळ असल्याने जिवजंतू तयार होऊ लागले आहे. ते जलस्त्रोतात जावून पाणी दूषित होऊ शकते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात सापडले आहे.

पोलिस चौकी हवी
या परिसरातील प्रमुख गाव पचखेडी असल्याने पोलिस चौकीची गरज आहे. या परिसरात अवैध धंदे, चोरी, हाणामारीच्या घटना घडत असतात. त्याची तक्रार देण्यासाठी वेलतूर पोलिस ठाण्यात जावे लागते. या ठाण्यांतर्गत येथे चौकी सुरू झाल्यास नागरिकांची गैरसोय दूर होईल.

पॅकेज मिळावे
पचखेडी येथे गोसेखुर्दबाधित जीवनापूर, सोनेगाव व कुक्कुड उमरी गावाचे पुनर्वसन झाले. पुनर्वसनासाठी शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला त्यावेळच्या उत्पन्नानुसार देण्यात आला. शासनाने गोसेखुर्दबाधित कुटुंबीयांना पॅकेज घोषित करून वाढीव मोबदला दिला. त्याच धर्तीवर पचखेडी येथील ज्यांच्या जमिनी संपादित केल्या. त्यांना मोबदला मिळण्याची मागणी जोर धरत आहे.
......
प्रसाधनगृहाअभावी महिलांची कुचंबणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभर स्वच्छता अभियान राबविले जात आहे. खासदार, आमदारांपासून सरपंच ग्रामपंचायत सदस्य झाडू हाती घेऊन स्वच्छता करीत आहे. परंतु पचखेडीत आजही सार्वजनिक शौचालयाचा अभाव आहे. त्यामुळे बाजारातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रसाधानगृहाअभावी महिलांची कुचंबणा होते. पचखेडी येथील मदनापूर रोडवरील सार्वजनिक प्रसाधनगृह वर्षभरापासून बंद आहे.
.......
अधिकारी, कर्मचाऱ्यांचे "अप-डाऊन'
शासकीय अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहिल्यास विकासाची गती वाढेल, त्यामुळे प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने मुख्यालयी रहावे, असे आदेशस्व. विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री असताना दिले होते. मात्र पचखेडीत एकही अधिकारी - कर्मचारी राहत नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
.....
अपुऱ्या सुविधांमुळे आरोग्य धोक्‍यात
यावर्षी परिसरात डेंग्यूसदृश आजाराचे 20 ते 25 रुग्ण आढळले. शासनाच्या अपुऱ्या आरोग्य सुविधेमुळे गरिबांना कर्जबाजारी होऊन महागड्या रुग्णालयातून उपचार करावे लागत आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान मूलभूत सोयी-सुविधा असाव्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
.....फोटो
शाळेलगतच मटण मार्केट
पचखेडीच्या जिल्हा परिषद शाळेलगतच मटण मार्केट आहे. त्यामुळे मुलांना शिक्षक व पुस्तकी ज्ञानापेक्षा कोंबड्या, बकऱ्यांच्या किंकाळ्या अधिक ऐकू येतात. उघड्यावर लटकलेले मांस पाहून चिमुकल्यांना अनेक प्रश्‍न पडतात. शाळा प्रशासनाने याबाबत ग्रामपंचायतीकडे अनेकदा लेखी तक्रार केली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. शाळेलगतचे मटण मार्केट हटविणे गरजेचे आहे.

वन्यजीवांचा हैदोस
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यामुळे या परिसरात वन्यजीव मुक्तसंचार करतात. मात्र, जंगलात पाणी आणि शिकारीसाठी तृणभक्षी प्राणी नसल्याने हिंस्त्र वन्यजीव गावाकडे येवू लागले आहेत. त्यामुळे अनेकांच्या पाळीव जनावरांचा बळी गेला. अनेकदा मनुष्यावरही हल्ले झाले आहेत. रानटी डुकरे शेतात येवून पिकांची नासाडी करीत आहेत. त्यामुळे वनविभागाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.

पाण्याअभावी स्वच्छतागृह बंद : फोटो
ग्रामपंचायतीने दोन वर्षांपूर्वी पचखेडी-मदनापूर मार्गावर सार्वजनिक शौचालय बांधले. त्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून स्वच्छतेचा मंत्र दिला. मात्र, येथे पाणीच नसल्याने शौचास जाणे बंद झाले आहे. हागणदारी मुक्त गावाचे स्वप्न बघणाऱ्या गावकऱ्यांना पाणीटंचाईचा फटका बसला आहे. आता येथे 10 फूटापर्यंत गवत वाढल्याने आत जाता येत नाही. त्यामुळे येथील महिला उघड्यावर बसू लागल्या आहे. ग्रामपंचायतीत 50 टक्के महिला सदस्य असतानाही हे गाव पाण्याअभावी हांगणदारीमुक्त होण्यापासून दूर राहिले आहे.
......
प्रतिक्रिया
कुही तालुक्‍यातील इंदिरासागर प्रकल्प व अभयारण्यामुळे शेतकरी, शेतमजूर त्रस्त आहेत. वैनगंगा नदीवर पूल व नागपूर - आंभोरा मार्गाचे दुपदरीकरण झाल्याने शेतकऱ्यांच्या मालाला भाव तरुणांच्या हाताला काम मिळेल. तसेच कुही एमआयडीसी येथे प्रकल्पग्रस्तांना उद्योगासाठी प्राधान्याने भूखंड व तीस लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध व्हावे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटू.
- सुनील जुवार
तालुकाध्यक्ष, भाजप, कुही
........
पचखेडीलगत जीवनापूर, सोनेगाव, गोठणगाव, पांढरगोटा, राजुली ही गावे वसली आहेत. त्यामुळे बेरोजगारीची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे सोयाबीन फॅक्‍टरी, सूतगिरणी, दूधप्रक्रिया उद्योग सुरू व्हावेत.
- प्रमिला वनदुधे, सरपंच
-----------
आंभोरा तीर्थक्षेत्राचा विकास झाल्यास विदर्भाची पंढरी असलेल्या आंभोऱ्याला पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त होईल. त्यासाठी गडपायली गावापर्यंत क्षेत्र वाढवावे. त्यामुळे पर्यटन विकासासोबत रोजगार निर्मितीस मदत होईल.
- बाबासाहेब तितरमारे
....
तालुक्‍यात चहूबाजूंनी प्रकल्प असल्यामुळे बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यासाठी शासनाने सोयाबीन उद्योग प्रक्रिया कारखाना उभा करावा, गोसेखुर्दचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे, मच्छीमारीचे अद्ययावत व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र उभारावे, व्याघ्र प्रकल्पानजीकच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी वनविभागाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
सुनील डहारे
-------------
शासनाने पुढाकार घेऊन स्थानिक संसाधनांचा उपयोग करून प्रक्रिया उद्योगास प्राधान्य द्यावे. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळून बेरोजगारीची समस्या सुटू शकेल.
- कैलास हुडमे
....
पुनर्वसित पचखेडी भागात शासकीय उपक्रमातून शेतीवर आधारित कारखाने तयार झाल्यास स्थानिकांच्या हाताला काम मिळेल.
- संदीप सुखदेवे
....
पचखेडीत सावंगी, गोठणगाव, जीवनापूर, सोनेगाव ही गावे वसल्यामुळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होणे गरजेचे आहे. याशिवाय रिक्‍त पदे भरून आरोग्य सेवा सुरळीत होणे गरजेचे आहे.
- डॉ. विनोद जुवार
...
बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन गृहोद्योग सुरू व्हावे. प्रत्येक शाळेत शासनाने मुलींसाठी मोफत कराटे प्रशिक्षण सुरू करावे. तसेच तालुकास्तरावर मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र शासनाने सुरू करावे.
- मेघा तितरमारे, माजी जि.प. सदस्य
....
दूधप्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास स्थानिकांच्या हाताला काम मिळेल. त्यादृष्टीने विचार होणे गरजेचे आहे.
- मोरेश्‍वर ठवकर
...
माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक व माजी ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या प्रयत्नातून आंभोरा येथील वैनगंगा नदीवर पुलासाठी 42 कोटींचा निधी मंजूर झाला. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात औद्योगिक भरभराट होईल.
मनोज तितरमारे, जि.प. सदस्य
...
पचखेडी परिसरातील अवैध दारूविक्री तत्काळ बंद व्हावी. जि.प. शाळेजवळ असलेले अनधिकृत मटण मार्केट आंबोरा मार्गावर स्थानांतरित करावे.
- गुणवंत लांजेवार, नागरिक

गोसेखुर्द प्रकल्प 160 किमीमध्ये विस्तारलेला आहे. त्यामुळे तो विकसित करून पर्यटनस्थळ घोषित करण्यात यावा. उमरेड-कऱ्हाडला अभयारण्यामुळे पचखेडीतील गावकऱ्यांना रोजगार उपबल्ध करून देण्यात यावा. धरणातील पाण्यावर जलविद्युत प्रकल्प उभारल्यास प्रकल्पग्रस्तांच्या हाताला काम मिळेल.
- जीवनलाल डोंगरे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

गावातील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी लघुउद्योग आणि कुशल कामगार निर्मितीसाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात यावे.
- हिवरकर पाटील

प्रकल्पामुळे येथील कुटुंब उद्‌ध्वस्त झाले. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी व 2007च्या कायद्यानुसार मोबादला, विनाअट 30 लाखापर्यंत उद्योगासाठी कर्ज, धरणात मासेमारीसाठी परवानगी देण्यात यावी.
- फारुख पाटील, अध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती, पचखेडी क्रमांक दोन

येथील तरुणांनी श्रमप्रतिष्ठा बाळगून पारंपरिक पद्धतीला फाटा देत नव्या तंत्रज्ञानाने शेती करण्याची गरज आहे. त्यातून उत्पन्न अधिक मिळून रोजगाराचे नवे साधन उपलब्ध होईल.
- गुरुमणी पिल्लेवान

गावातील तरुणांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी कलामंच सभागृह स्थापन करण्याची गरज आहे. गावातील तरुणांना कलेच्या प्रचारासह तालिम करण्यास मदत होईल.
- आशिर्वाद वासनिक

या परिसरात वन्यजीवांचा हैदोस वाढला आहे. हिंस्त्रप्राणी शेतीसह जीवांचे नुकसान करीत आहेत. वनविभागाने सौर ऊर्जेवर चालणारे काटेरी कुंपण लावून व्यवस्थापन त्यांनीच करावा.
- जितेंद्र गोंडाणे
......

यांना सांगा समस्या
खासदार कृपाल तुमाने : 9823288322
आमदार सुधीर पारवे : 9422829464
जि.प. सदस्य मनोज तितरमारे : 9660068347
तहसीलदार प्रताप वाघमारे : 9422642842
गटविकास अधिकारी बाबाराव भरक्षे : 9764301052
सरपंचा प्रमिला वनदुधे : 7776961322
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र पटले : 9923930167
ठाणेदार गोंदके : 9823777517

---------
संकलन : गुरुदेव वनदुधे (9767582644), 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.