সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, January 04, 2015

बंद कंपन्यांचे व्हावे पुनर्ज्जिवन

बारमाही नदी, तरीही दुषित पाणी
कन्हान हे गाव नागपूर शहरापासून सुमारे 22 कि.मी.वर जबलपूर मार्गावर आहे. पचमढीपासून वाहणाऱ्या कन्हान नदीशेजारी हे गाव वसलेले असल्यामुळे "कन्हान' हे नाव पडले. नागपूर-कोलकाता रेल्वेमार्ग येथून जातो. 1970-75 च्या दशकात औद्योगिक नगर म्हणून उदयास आले. येथील औद्योगिकीकरण धोरणामुळे राज्यात सर्वात मोठी महसूल मिळवून देणारी ग्रामपंचायत म्हणून कन्हानने नावलौकिक मिळविला. 1970 च्या दशकात परिसरातील एक-दोन नव्हे तर जवळपास 10 कंपन्या स्थापित झाल्या. कंपनीच्या परिसरात चार ते पाच किलोमीटरपर्यंत रेल्वे मालधक्‍का, रेल्वे जाळे असणारी खंडेलवार ट्यूब मिल ही त्याकाळी राज्यात पहिली कंपनी होती. जवळपास 900 एकर जागेत स्थापित उद्योगांमध्ये हजार मजूर कार्यरत होते. परंतु 1995 नंतर येथील उद्योगांना उतरती कळा आली. बऱ्याच कंपन्यांमधील कामगार युनियनने कामगारांना विविध प्रलोभने दाखवून संप घडवून आणला. याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला. त्यामुळे 2000 पासून हळूहळू कंपन्यांना टाळे लागत गेले. आज येथील सर्वच कंपन्या बंद झाल्या असून, केवळ ढाचे उरले आहेत. अचानक कंपन्या बंद झाल्यामुळे कामगारांची देणी थकली आहेत.
.............





  • कन्हान 
  • दृष्टिक्षेपात कन्हान 
  • लोकसंख्या : 27,851 
  • संख्या : 20, 275 
  • प्रभाग : 4 
  • नगर परिषद सदस्य : 17 
  • जिल्हा परिषद शाळा : 2 
  • राष्ट्रीयकृत बॅंक: 4 
  • सहकारी बॅंक : 1 
  • विद्यालय : 2 
  • कनिष्ठ महाविद्यालय : 4 
  • तिमंद शाळा : 2 
  • अंगणवाडी : 30 
  • खाणी : 3 
..........
कन्हान
शेतकरी आर्थिक अडचणीत
कन्हान परिसरातील कंपन्यांकडे 900 एकर जागा आहे. औद्योगिक वसाहत म्हणून परिसरातील कांद्री, खंडाळा, गहुहिवरा, सिहोरा येथील शेतकऱ्यांकडून हजार एकर जागा शासनाने संपादित करून 1972 साली एमआयडीसी झोन म्हणून घोषित केली. या परिसरातील शेतजमिनीवर आजही यूएलसी म्हणून नोंद केली जाते. यामुळे शेतजमीन मालकाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. बॅंक शेतकऱ्यांना कर्ज देत नाही, शेत विकता येत नाही, शेतीचे आर्थिक नुकसान झाल्यास शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत सातबारा शासनाच्या नावे असल्यामुळे मिळत नाही, अशा विवंचनेत शेतकरी आहे. परंतु त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कुणीही पुढे येत नाही.
.....
नव्या सरकारकडून अपेक्षा
कन्हानमधील उद्योगांकडे रामटेक लोकसभा क्षेत्राचे तत्कालीन शिवसेनेचे खासदार केंद्रात अवजड उद्योग मंत्री असलेल्या सुबोध मोहितेंकडून अपेक्षा होत्या. परंतु केंद्रात मोठे पद मिळाल्यानंतरही आशा फोल ठरल्या. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बंद कंपन्या सुरू कराव्या किंवा ही जागा ताब्यात घेऊन या ठिकाणी उद्योग स्थापन करावे. जेणेकरून हजारो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल.
.....
पाण्यासाठी वणवण
बारमाही वाहणारी कन्हान नदी असताना येथे महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पूर्वी तीन टाक्‍या होत्या. वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईला समोरे जावे लागत होते. ही समस्या सोडविण्यासाठी खनिकर्म विकास महामंडळाकडून दोन कोटी 25 लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेंर्गत पुन्हा तीन टाक्‍यांचे काम करण्यात आले. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सहा टाक्‍या झाल्या. परंतु सदोष बांधकामामुळे नवीन टाक्‍या निरुपयोगी ठरल्या आहेत. याशिवाय पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन ठिकठिकाणी फुटली आहे. त्यामुळे शहराचा संपूर्ण भार जुन्याच टाक्‍यावर आहे.
....
दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्‍यात
शहरात पाणी शुद्धीकरणाचे संयंत्र नाही. नदीचे पाणी थेट नागरिकांना पुरविले जाते. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दैनंदिन गरज असलेल्या पाण्याची समस्या प्राधान्याने सोडवावी, अशी माफक अपेक्षा नागरिकांची आहे.
....
मूलभूत सुविधांचा अभाव
नागपूरपासून केवळ 20-25 किलोमीटर अंतरावर असलेल्या कन्हानमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. येथील धर्मराज विद्यालय ते रेल्वे फाटकपर्यंतचे अंतर दीड किलोमीटर आहे. मात्र येथे शौचालयाची सोय नाही. त्यामुळे महिलांची कुचंबणा होते. बाजारात कुठेही शौचालय नसल्यामुळे नागरिकांसह दुकानदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शहरात गर्दीच्या ठिकाणी तरी शौचालयाची सुविधा व्हावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
......
एक्‍स्प्रेस, सुपरफास्टला थांबा हवा
कोलकाता-मुंबई या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर असलेले कन्हान रेल्वेस्टेशन केवळ नावापुरते आहे. या स्टेशनअंतर्गत मौदा, रामटेक, पारशिवनी तालुक्‍यातील अनेक गावांचा संपर्क येतो. रामटेक तालुक्‍यातील दुर्गम भागातील नागरिकांना जवळचे स्टेशन म्हणून कन्हान आहे. मात्र येथे कोणतीही एक्‍स्प्रेस, सुपरफास्ट गाडी थांबत नाही. केवळ पॅसेंजर गाडीचा थांबा आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पॅसेंजर गाडीने नागपूरला जाऊन तेथून प्रवास सुरू करावा लागतो. रेल्वे संसाधनाची मोठी उपलब्धता तसेच येथून तीन तालुक्‍यातील गावांचा संपर्क लक्षात घेता या रेल्वे जंक्‍शनवर एक्‍स्प्रेस गाड्यांचा थांबा देण्यात यावा.
कन्हान ते बुटीबोरी, अशी मेमू ट्रेन सुरू झाल्यास नागपूर, कामठी, रामटेक, कन्हान, खापरी, बुटीबोरी या गावातील रहिवाशांना तसेच मासिक पासधारकांना त्याचा फायदा होईल.
...
प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था
शहरातील तारसा चौक प्रवाशांनी नेहमी गजबजलेला असतो. परंतु येथे प्रवाशांच्या थांबण्याकरिता निवाराच नाही. त्यामुळे उन्हाळा, पावसाळ्याच्या दिवसांत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कन्हानहून कामठी तसेच नागपूरला शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. परंतु बसस्थानकावर थांबण्यासाठी प्रवासी निवारा नसल्यामुळे विद्यार्थिनींसह वृद्धांची गैरसोय होते. शहरातील इतर निवाऱ्यांची तीच गत आहे. त्यामुळे राज्य परिवहन विभाग तसेच स्थानिक जिल्हा प्रशासनाने प्रवासी निवारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
....
उघड्या नाल्यांमुळे आजारांना निमंत्रण
नगरपरिषदेचा दर्जा मिळूनही शहरातील समस्या कायम आहेत. रस्त्यांलगतच्या उघड्या नाल्यांची कित्तेक महिन्यांपासून सफाई न झाल्यामुळे नाल्या तुंबल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहते. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांचा हैदोस वाढला आहे. गावात साथरोगांनी डोके वर काढले आहे. काही दिवसांपूर्वी शहरात डेंग्यूमुळे चौघांचा बळी गेला. तरी प्रशासन नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते.
...
अरुंद पुलामुळे वाहतुकीचा खोळंबा
महामार्गावरील सततच्या जड वाहतुकीमुळे कन्हान नदीवरील पुलाची दुर्दशा झाली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतुकीमुळे प्रशासनाने नव्या पुलाची निर्मिती करणे गरजेचे आहे. परंतु, वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. पुलालगत नागपूर - हावडा रेल्वे मार्गाची रेल्वे क्रॉसिंग आहे. त्यामुळे दर दहा मिनिटांनी रेल्वे फाटक बंद होते. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लागलेल्या मोठमोठ्या रांगांमुळे पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते.
हा पूल ब्रिटिशकालीन असल्यामुळे नव्या पुलाचे निर्माण होणे गरजेचे आहे. यासंदर्भात शासनाचा सर्व्हे झाल्याचे बोलले जाते. तत्कालीन केंद्रीय मंत्री माजी खासदार मुकुल वासनिक यांनी पुलासाठी निधी मंजूर केल्याचेही सांगितले जाते. परंतु वर्ष लोटूनही काम सुरू झाले नाही.
.................
आरोग्य केंद्राकडे जि.प.चे दुर्लक्ष
राष्ट्रीय महामार्ग आणि त्यातल्या त्यात नगरपरिषदेचा दर्जा मिळाल्यामुळे शहरात वास्तव्यासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु शहरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज रुग्णालय नाही. गंभीर जखमींना नागपूरला हलवावे लागते. त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्‍यता असते. शहरात सध्या डेंग्यू, मलेरिया आणि साथरोगांचे थैमान आहे. त्यादृष्टीने अत्याधुनिक सुविधा असणे गरजेचे आहे. आरोग्य केंद्रामध्ये पुरेशा खाटा, औषधसाठा, रुग्णवाहिका, डॉक्‍टरांची टीम नाही. नागपूर जिल्हा परिषदेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
.......
मंदिराच्या सौंदर्यीकरणाची गरज
नदीकाठावर असलेल्या कन्हानला पौराणिकदृष्ट्या महत्त्व आहे. कन्हान नदीला पुढे अनेक उपनद्या मिळून शेवटी ती गंगेला मिळते. त्यामुळे मृत व्यक्‍तीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्यांच्या अस्थी कन्हान नदीत विसर्जित केल्या जातात. परंतु नदीकाठावर असलेल्या मंदिरात दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे येथे येणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मंदिराचे बांधकाम पुरातन असल्यामुळे डागडुजी करणे गरजेचे आहे. पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथे जुगारही मोठ्या प्रमाणात खेळला जातो. त्याचाही नागरिकांना त्रास होतो. पर्यटनाच्या दृष्टीने मंदिराचा विकास झाल्यास स्थानिक बेरोजगाराच्या हाताला काम मिळेल.
........
अपुरे पोलिस कर्मचारी
कन्हान परिसरात औद्योगिकीकरणामुळे नवी वसाहत निर्माण झाली. येथे परप्रांतिय वास्तव्यास आले. त्यामुळे येथे गुन्हेगारी वाढली आहे. खून, दरोडे, मारामारी, वाळू चोरीच्या घटना नियमित घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यावर अंकूश लावण्यासाठी पोलिस कर्मचारी संख्या अपूरी पडत आहे. कन्हान येथील पोलिस ठाणे भाड्याच्या खोली आहेत. 30 गवांच्या सुरक्षेसाठी केवळ 65 पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. यात एक पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरिक्षक, 11 महिला कर्मचाऱ्यांसह 40 शिपाई आहेत. महिलांसाठी शौचालय, बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, वायरलेस कक्ष, कैद्यांसाठी बंदिगृह नाही. पोलिसासांठी परेड मैदान नसल्याने गैरसोय होत आहे.
...
सर्वांचे फोटो आहेत.....
प्रतिक्रिया
कन्हानला नगर परिषदेचा दर्जा मिळाला, ही आनंदाची बाब आहे. परंतु 27 हजार लोकवस्तीचे शहर असूनही येथे बालोद्यान व क्रीडांगणाचा अभाव आहे. मुलांच्या बौद्धिक विकासासोबत त्यांचा शारीरिक व मानसिक विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी खेळ आणि मनोरंजनासाठी क्रीडांगण आणि बालोद्यानाची गरज आहे. त्यादृष्टीने प्रयत्न व्हावे.
- धनराज बोंडे (जि.प. शिक्षक)

औद्योगिक विकासामुळे ब्रुकबॉन्ड इंडिया लिमिटेड, अशीही कन्हानची ओळख आहे. या कंपनीत सुरुवातीला 700 कामगार होते. कालांतराने त्यांची संख्या 2300 पर्यंत पोहोचली. यापैकी 200 ते 250 कर्मचारी रोजंदारीवर होते. देशातील सात मुख्य कंपन्यांपैकी एक कन्हानमध्ये होती. परंतु औद्योगिक क्षेत्रात राजकारण्यांचा शिरकाव झाला आणि चालू उद्योग बंद पडले. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत आहे.
- प्रशांत वाघमारे

शहरातील पाणीपुरवठा योजनेवर तब्बल 3.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तरी महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. तरी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. शहरात लवकरात लवकर पाणी शुद्धीकरण यंत्र लावून नागरिकांना दिलासा द्यावा.
करुणा आष्टणकर, माजी पं. स. सभापती

नगरपरिषदेचा दर्जा मिळून काही महिने लोटले. ग्रामपंचायत बरखास्त करून प्रशासक नेमण्यात आले. परंतु ग्रामपंचायत काळात जशी स्थिती होती तीच आज कायम आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, तुंबलेल्या गटारी, सार्वजनिक शौचालयांचा अभाव अशा एक नव्हे अनेक समस्या शहरात कायम आहे.
- चिंटू वाकुळकर, मनसे शहरप्रमुख

- शहराला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला. परंतु निवडणुका होऊन कारभार सुरू न झाल्याने शहरातील विकासकामे रखडली आहेत. ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्‍त केल्यामुळे कर्मचाऱ्यांना वर्षभरापासून वेतन मिळालेले नाही. विकासकामे मोठ्या प्रमाणात रखडली आहेत. याबाबत प्रशासनाकडे विचारणा केल्यास अधिकारी हात वर करतात.
- अल्का काकडे, माजी सरपंच

कन्हान परिसरालगत वेकोलिच्या खाणी आहेत. औद्योगिक विकासासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. परंतु त्यांना मोबदला मिळाला नाही. ज्यांच्या जमिनी उद्योगात गेल्या त्या कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्याची तरतूद आहे. परंतु तुटपुंजी रक्‍कम देऊन प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडण्यात आले. हातची शेती गेली आणि भावही योग्य न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना योग्य मोबदला मिळावा.
- राजेश यादव, पं.स. सदस्य, माजी सरपंच
....
कन्हान गाव राष्ट्रीय महामार्ग सातवर असल्यामुळे येथे अपघात नित्याचेच झाले आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजूला वस्ती असल्यामुळे स्थानिक नागरिक बरेचदा अपघातला बळी पडतात. येथील आरोग्य केंद्रात अत्याधुनिक सोयी-सुविधा नसल्यामुळे जखमीला नागपूरला हलवावे लागते. त्यामुळे उपचारास विलंब होतो. शहरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे रुग्णालय तसेच शवविच्छेदनाची सोय असावी.
- दिनेश ढगे

कन्हान-नागपूर मार्गावरील वेकोलितून मोठ्या प्रमाणात कोळसा उत्पादन होते. महामार्गावर कांद्री - कन्हानपर्यंत कोळशाचे ट्रक रांगेत उभे असतात. सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय कोळशाच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यास तात्पुरती कारवाई केली जाते. परंतु ठोस उपाययोजना केली जात नाही.
- मनीष वैद्य
....
कन्हान शहर महामार्गावर प्रवासी निवाऱ्याची सोय नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. मोठमोठे उद्योग बंद पडल्यामुळे बेरोजगारांची फौज दिवसेंदिवस वाढत आहे. राजकारणी केवळ स्वार्थाचे राजकारण करतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या समस्या सोडविणार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
प्रशांत वाघमारे, माजी ग्रामपंचायत सदस्य
...
बाजारपेठेत मूलभूत सुविधांचा अभाव
कन्हानमध्ये दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. लगतच्या 17 -18 खेड्यातील नागरिकांची या दिवशी शहरात गर्दी होते. परंतु बाजार परिसरात नागरिकांसाठी शौचालयाची सोय नाही. शिवाय नियमित स्वच्छता होत नसल्याने बाजारात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांना नाकावर रूमाल ठेवून वावरावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात बाजारात पाय ठेवायला जागा राहत नाही.
- रूपेश सातपुते

विद्यार्थी आणि बेरोजगारांच्या भविष्याचा विचार डोळ्यासमोर ठेवून औद्यागिक, क्रीडा मैदान, सांस्कृतिक सभागृह, ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन केंद्र, सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात यावे. बीपीएल कॉर्डधारकांना एक हजार रुपये प्रतिमहा निवृत्तीवेतन व आरोग्य सेवा देण्यात आली.
- सतीश भसारकर 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.