সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, January 04, 2015

मृत्यूचे प्रवेशद्वार कोंढाळी

औद्योगिकीकरण झाले; आता हवाय स्थानिक विकास

नागपूरपासून अवघ्या 48 किलोमीटरवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कोंढाळी गाव आहे. औद्योगिकदृष्ट्या कोंढाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या रस्त्याने मोठ्या प्रमाणात जडवाहतूक चालते. दिवसेंदिवस महामार्गालगत दोन्ही बाजूंनी वाढते अतिक्रमण तसेच जडवाहतुकीमुळे अपघातांत वाढ झाली आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रवेशद्वार, अशी नवी ओळख गावाला मिळाली आहे. वाढत्या औद्योगिकीकरणासोबत स्थानिकांना सुविधा न मिळाल्याने त्यांच्यात प्रशासनाप्रति नाराजी आहे. कोंढाळीत सर्वधर्मीयांचे वास्तव्य आहे. त्यामुळे गावाला सर्वधर्मसमभावाची ओळख प्राप्त झाली आहे.

लोकसंख्या : 13,884
वॉर्ड : 6
राष्ट्रीयीकृत बॅंक : 2
पतसंस्था : 6
जिल्हा परिषद शाळा : मराठी 1, उर्दू 1
अंगणवाडी : 16
बालवाडी : मराठी 2, उर्दू 1
महाविद्यालय : 1
ग्रामपंचायत कर्मचारी : 17
ग्रामपंचायत अधिकारी : 1
शिशुगृह : 1
कनिष्ठ महाविद्यालय : 1
....
अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी
उद्योगधंद्यांअभावी गावात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकांनी रस्त्याच्या कडेलाच दुकाने थाटली. वाढता-वाढता बसस्थानक बाजार चौक ते राममंदिर मार्गापर्यंत अतिक्रमण वाढले. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. बाजाराच्या दिवशी मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी ठरलेली असते. त्यामुळे रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे. नवीन बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने जुन्या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते.
.....
भूमिगत गटारांची समस्या
राज्याची उपराजधानी संत्रानगरी नागपूरचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोंढाळीत मूलभूत सुविधांचा अभाव आहे. गावात अद्याप भूमिगत गटारांची सोय नाही. त्यामुळे तुंबलेल्या नाल्यांतून सांडपाणी रस्त्यावर वाहते. परिणामी डासांचा हैदोस वाढला आहे. साथरोगांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. गावात डेंगीसदृश ताप, मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे. अद्याप एकदाही गावात औषध फवारणी करण्यात आली.
......
पाणी असूनही तहान भागेना
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या गावात अद्याप मूलभूत सुविधांचा अभाव आहे. स्थानिक खासदार, आमदार यांच्या निधीतून गावाचा विकास करणे गरजेचे आहे. त्या निधीचा योग्य विनियोग करून विकास करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत, पंचायत समितीची आहे. परंतु, गावाच्या विकासाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
कोंढाळीलगत दक्षिण-उत्तरवाहिनी जाम नदी वाहते. विशेष म्हणजे, याच ठिकाणी जाम नदी प्रकल्प आहे. असे असताना कोंढाळीची जनता मात्र तहानलेली आहे.
....
तालुक्‍याचा दर्जा केव्हा मिळणार?
दिवसेंदिवस कोंढाळीची लोकसंख्या वाढत आहे. महामार्गालगतचे गाव असल्यामुळे नागपूर, वर्धा येथील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात येथे जमिनीची खरेदी केली. त्यामुळे गावात ले-आउटचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. गावासभोवताल 60-70 खेडी आहेत. तालुक्‍याचे गाव म्हणून शेतकऱ्यांना काटोलकडे धाव घ्यावी लागते. कोंढाळीला तालुक्‍याचा दर्जा मिळाल्यास लगतच्या खेड्यांतील शेतकऱ्यांना लहानसहान कामांसाठी काटोलला जावे लागणार नाही. तसेच गावाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. बळीराजाची पायपीटही थांबेल.
.....
बाजारपेठेत मूलभूत सुविधांचा अभाव
लगतच्या 70 खेड्यांसाठी कोंढाळी ही एकमेव बाजारपेठ आहे. त्यामुळे बुधवार बाजाराच्या दिवसासोबत इतरही दिवशी येथील बाजारात नागरिकांची गर्दी असते. परंतु, बाजारात व्यावसायिकांना दुकान लावण्यासाठी ओट्यांची व्यवस्था नाही. बाजारपेठेतील गैरसोयींमुळे शेतकरी आपला माल नागपूरला आणणे पसंत करतात. जर कोंढाळीच्या बाजारपेठेत मूलभूत सुविधांची पूर्तता केली, तर येथील मोठ्या बाजारपेठेत अनेकांच्या हाताला काम मिळेल. याशिवाय बाजारात येणाऱ्या ग्राहकांसाठी शौचालयाची सोय नाही. महिलांची कुचंबणा होते. बाजारपेठेत निदान शौचालयाची सुविधा असावी, अशी मागणी अनेकवेळा नागरिकांकडून करण्यात आली; परंतु त्याचा काही फायदा झाला नाही.
....
आरोग्य केंद्रात हवी अत्यावश्‍यक सुविधा
राष्ट्रीय महामार्ग आणि त्यातल्या त्यात गाव वळणरस्त्यावर असल्यामुळे लहानसहान अपघात नित्याचे झाले आहेत. गाव महामार्गाच्या दोन्ही बाजूंना असल्यामुळे स्थानिक रहिवासीही अपघाताला बळी पडतात. जखमींवर त्वरित उपचार करण्यासाठी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे; मात्र अत्यावश्‍यक सुविधा नाहीत. उपचारासाठी नागपूर गाठेपर्यंत जखमीला मृत्यू गाठतो. वाढत्या लोकसंख्येसोबत गावात आरोग्य केंद्र असणे गरजेचे आहे. महामार्गावरील अपघातात अनेक जण जागीच गतप्राण होतात. त्या वेळी नातेवाइकांना मृताच्या शवविच्छेदनासाठी नागपूरला यावे लागते. ज्यात त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होतो. त्यामुळे आरोग्य केंद्रासोबत शवविच्छेदनगृहाची येथे व्यवस्था व्हावी, अशी मागणी होत आहे.
....
बेरोजगारांच्या हाताला काम हवे
वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत गावात उद्योगधंद्यांची कमतरता आहे. गाव महामार्गालगत असल्याने दळणवळणाची उत्तम सोय असताना केवळ लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे औद्योगिक विकासापासून वंचित आहे. एकही उद्योग नसल्यामुळे तरुणांच्या हाताला काम नाही. वाढत्या बेरोजगारीवर तोडगा काढण्यासाठी गावाचा औद्योगिक विकास होणे गरजेचे आहे. लहानमोठ्या उद्योगातून गावाची बाजारपेठ सक्षम झाल्यास परिसरातील खेड्यांचे रूप पालटण्यास वेळ लागणार नाही.
....
अपुरे पोलिस बळ
महामार्गालगत पोलिस ठाणे आहे. येथील कर्मचारीसंख्या अपुरी आहे. निवासाची सुविधा नाही. नित्याचे अपघात आणि नाकाबंदीमुळे पोलिसांची चमू महामार्गाच्या कामात सदैव व्यस्त असते. त्यामुळे स्थानिकांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नसतो. जडवाहतूक करणारे अनेक लोक येथे रात्री मुक्‍कामी असतात. त्यामुळे स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे गावात वेगळी चौकी असणे गरजेचे आहे.
......
गरिबांच्या निवाऱ्याचा प्रश्‍न
परिसरात लहान-मोठा व्यवयाय करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविणारे कोंढाळीत अनेक आहेत. महामार्गावरील सततच्या वाहतुकीमुळे चहाटपरी, पानटपरी याशिवाय लहानमोठ्या खानावळींचा उद्योग बऱ्यापैकी चालतो. येथे काम करणाऱ्यांचा संसार महामार्गालगत आहे. काही वर्षांपूर्वी महामार्गाचे चौपदरीकरण झाले. त्या वेळी अनेकांचा निवारा हिरावला गेला; तर काहींच्या जमिनी शासनाने कवडीमोल भावात खरेदी केल्या. नागरिकांना स्थायी घरे नाहीत. त्यामुळे शासनाने त्यांना कायमस्वरूपी निवारा उपलब्ध करून द्यावा. शिवाय ज्यांची जमीन महामार्गात गेली, त्यांना योग्य मोबदला द्यावा. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
....................
खेळाडू घडले, क्रीडांगण अडले
येथील अनेक खेळाडूंनी क्रीडाक्षेत्रात चांगले नाव कमावले आहे. परंतु, त्यांना अद्याप मूलभूत सुविधा व खेळाची दर्जेदार साधनसामग्री मिळालेली नाही. गावात खेळण्यासाठी मैदान नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव कसा मिळेल, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याशिवाय शिक्षणक्षेत्रातही गावात सुविधा नसल्यामुळे उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना काटोल गाठावे लागते. बदलत्या काळासोबत येथे मूलभूत सुविधा मिळणे गरजेचे आहे.
...
प्रदूषणमुक्तीसाठी हवे उद्यान
झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या तुलनेत गावाच्या विकासाची गती खूपच संथ आहे. नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी तसेच मुलांना खेळण्यासाठी गावात उद्यान असणे गरजेचे आहे. मात्र, महामार्गावरील जडवाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणापासून मुक्‍ती मिळावी, असे ठिकाण नसल्याने नागरिकांना श्‍वसनाच्या आजारांना बळी पडावे लागते. नवनिर्वाचित खासदार, आमदारांच्या निधीतून सर्वप्रथम उद्यानाची निर्मिती होणे गरजेचे आहे.
....
घाणीच्या विळख्यात जाम नदी
दक्षिण-उत्तरवाहिनी असलेली जाम नदी गावासाठी वरदान आहे. या नदीला अनेक लहानमोठ्या उपनद्या मिळाल्यामुळे गावातील नदीपात्र बारमाही वाहते. त्यामुळे लगतच्या शेतीच्या सिंचनाची उत्तम सोय आहे. परंतु, स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नदीपात्रात घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे गावात साथरोगांनी थैमान घातले आहे. नदीच्या स्वच्छतेसोबत गावाची स्वच्छता होणे गरजेचे आहे.
.....
प्रतिक्रिया
गावाच्या विकासासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विकास निधीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींशी भांडून आपला हक्‍क मिळविला पाहिजे. सर्व सदस्यांनी मतभेद न बाळगता विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे.
- वृषाली माकोडे, सरपंच

गावात उच्च शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना काटोल किंवा नागपूर गाठावे लागते. त्यामुळे उच्च शिक्षणाची सोय होऊन विद्यार्थ्यांची पायपीट थांबली पाहिजे.
- रणजित गायकवाड, अध्यक्ष, व्यापारी वेल्फेअर असोसिएशन

वाढत्या लोकसंख्येनुसार गावाला तालुक्‍याचा दर्जा मिळाला पाहिजे. त्यामुळे चौफेर विकास होऊन नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा निपटारा होईल.
- उत्तमराव गिरडकर, सामाजिक कार्यकर्ते

महामार्गामुळे अपघात नित्याचेच झाले आहेत. परंतु, गावात आरोग्य केंद्र आणि शवविच्छेदनगृह नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
- राहुल चरपे, सामाजिक कार्यकर्ते
....
वाढती बेरोजगारी ही गावाची मुख्य समस्या आहे. तरुणांच्या हाताला काम मिळाल्यास त्यांची भटकंती थांबेल आणि वाईट कामांपासून ते परावृत्त होतील. त्यामुळे गावात लहानमोठ्या उद्योगांची निर्मिती होऊन त्यातून तरुणांना काम मिळाले पाहिजे.
- अनिल लाड, सामाजिक कार्यकर्ते
....
क्रीडाक्षेत्रात कोंढाळीचे मोठे योगदान असताना गावात खेळाडूंसाठी मैदान नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. बदलत्या काळासोबत मूलभूत सुविधांची पूर्तता होणे गरजेचे आहे.
- प्रशांत खंते
....
वाढत्या लोकसंख्येसोबत गावात सुशिक्षित महिलांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महिलांसाठी लहानमोठे उद्योगधंदे निर्माण व्हावे. महिलांच्या हाताला काम मिळाल्यास त्या आत्मनिर्भर होऊन कुटुंबाला आर्थिक बळ मिळेल.
- प्रीती गौरखेडे
...
वाढती लोकसंख्या लक्षात घेता गावात मुस्लिम आणि हिंदूंसाठी दोन वेगवेगळ्या स्मशानभूमी असणे गरजेचे आहे. परंतु, गावात स्मशानभूमी नसल्यामुळे हिंदूंना नदीकाठावर तर मुस्लिमांना दफनविधीसाठी जागा शोधावी लागते. ही दुर्दैवी बाब आहे. स्थानिक प्रशासनाने सर्वप्रथम स्मशानभूमीसाठी जागा निश्‍चित केली पाहिजे.
-निसार हुसेन, सामाजिक कार्यकर्ते

कोंढाळीतील बेरोजगारी दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना औद्योगिक व तांत्रिक प्रशिक्षणाची गरज आहे. त्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात यावे. सांस्कृतिक सभागृह झाल्यास कलागुणांना वाव मिळेल.
- जगदीश गुप्ता
....
यांना सांगा समस्या
खासदार कृपाल तुमाने : 9823268322
आमदार आशीष देशमुख : 9822233000
सरपंच वृषाली माकोडे : 8888575065
ग्रामसेवक डी. एम. राठोड : 9822931207
पोलिस ठाणेदार प्रदीप लांबट : 9923931207
वीज वितरण अधिकारी नागपूरकर : 7875019689
वैद्यकीय अधिकारी डॉ. तिवारी : 9405909703
तहसीलदार (काटोल) गोस्वामी : 9765762655

संकलन : सुरेंद्र भाजीखाये, मो. 9527127449

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.