সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, January 04, 2015

ब्रिटिशकालीन खापा स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित


  • ब्रिटिशकालीन खापा 
  • स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित 

खापा शहर कन्हान नदीच्या काठावर वसलेले आहे. नदीकाठावर एकीकडे माउली माता, तर दुसरीकडे प्रसिद्ध लष्करशहा बाबांचा दर्गा आहे. या स्थळी संत पतीराम महाराज, राघवानंद महाराज, लष्करशहा बाबा, कृष्णाजी महाराज आदी संत-महात्मे जन्मले आहेत. त्यामुळे ही संतांची भूमी आहे. कृष्णाजी महाराज व त्यांच्या पत्नीने जिवंत समाधी घेतली होती. एकेकाळी जरीच्या साड्या आणि चोळीसाठी हे गाव प्रसिद्ध होते. हातमागावर चालणारा विणकर व्यवसाय आता इतिहासजमा झाला. त्यावर उपजीविका साधणारा हलबा समाज अन्य व्यवसायांत गुंतला आहे. ब्रिटिश काळात येथील शेकडो तरुणांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेतली होती. अनेकजण शहीदही झाले. येथील नगर परिषद ब्रिटिशकालीन असून, तिची स्थापना 1867 मध्ये झाली. अनेक लोकप्रतिनिधींनी नगरविकासासाठी केवळ थापाच मारल्याने हे शहर स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित आहेत.


ठळक वैशिष्ट्ये
  • - अनेक संतांची जन्मभूमी 
  • - ब्रिटिशकालीन नगर परिषद 
  • - हातमागावरील साडीचोळी प्रसिद्ध 
  • - स्वातंत्र्यासाठी अनेक तरुण शहीद 
  • - मॅंगनीज खाण, कन्हान नदीकाठी शहर 
  • ---------------------------------- 
दृष्टिक्षेपात
  • नगर परिषद स्थापना : 1867 
  • लोकसंख्या : 14,559 
  • प्रभाग : चार, वॉर्ड 17 
  • भौगोलिक क्षेत्रफळ : 309.48 हेक्‍टर 
  • गावातील रस्त्यांची लांबी : 23 किमी 
  • कनिष्ठ महाविद्यालय : 2 
  • प्राथमिक, माध्यमिक शिक्षण संस्था : 11 
  • राष्ट्रीयकृत बॅंक : 1, सहकारी बॅंक : 1 
  • आरोग्य केंद्र : 1, टपाल कार्यालय : 1 
  • हातपंप : 20 
गरिबांना घरकुलाची प्रतीक्षा
केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत 2007 मध्ये गरीब नागरिकांना निवाऱ्याची सोय व्हावी यासाठी घरकुल योजना मंजूर करण्यात आली. मात्र, ही योजना अद्याप पूर्णत्वास गेली नाही. वारंवार कामात अडथळे येत असल्याने ही योजना पूर्ण होऊ शकली नाही. आतापर्यंत 176 घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. मात्र, तिथे नागरिकांना राहण्यासाठी सोयीसुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. काही लाभार्थ्यांनी घरकुल वाटपाची प्रतीक्षा न करता त्यावर ताबा मिळवून वास्तव्य करणे सुरू केले आहे. वीज, पाणी, नाली, रस्ते आदी मूलभूत सुविधा देऊन घरकुलाचे वाटप व्हावे, अशी आशा नागरिकांना आहे.

स्वच्छता अभियान, तरीही घाण
शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मात्र, सभोवताल अनेक ठिकाणी घाण पसरली आहे. नाले, गटारे, उकिरड्यांवर घाणीचे साम्राज्य दिसून येते. त्यामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतो. प्रशासनाकडून धूळफवारणी करणे गरजेचे आहे.
शहरात सुलभ स्वच्छतागृहाचा अभाव आहे. शहरातील लोकसंख्या 15 हजारांच्या आसपास असतानाही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. बाजार चौकात मोठी गर्दी असते. येथे महिलाही येत असतात. मात्र, स्वच्छतागृह नसल्याने गैरसोय होत आहे. शहरात पाच महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची आवश्‍यकता आहे.

पशुचिकित्सा भाड्याच्या घरात
येथील पशुवैद्यकीय चिकित्सालय गेल्या 20 वर्षांपासून भाड्याच्या घरात आहे. खापा-गडेगाव मार्गावर कबीर वाड्यातील जीर्ण अवस्थेतील इमारतीत कामकाज चालते. पशुचिकित्सालयाच्या बांधकामाकरिता निधी मंजूर आहे. मात्र, शासकीय जागा उपलब्ध नसल्याने बांधकाम रखडले आहे. जागेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र, जागेस मंजुरी मिळाली नाही.

वाचनालयाची गरज
शहरातील सुशिक्षित बेरोजगारांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी वाचनालयाची गरज आहे. मात्र, येथे एकही सार्वजनिक वाचनालय नाही. गावात बेरोजगारांची संख्या अधिक आहे. वाचनालय नसल्याने तरुण वाचनापासून दूर जाऊन वाममार्गाला लागत आहेत. काही तरुण स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज करतात. मात्र, त्यांना हवी ती पुस्तके उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. नवीन वस्तीत 20 वर्षांपूर्वी वाचनालयाची इमारत तयार करण्यात आली होती. आज तिथे कॉन्व्हेंट आहे.

अग्निशमनला कर्मचाऱ्यांची कमतरता
अग्निशमन सुरक्षा योजनेअंतर्गत पालिकेला 2012-13 मध्ये शासनामार्फत 64 लाख रुपयांचे वाहन मिळाले. मात्र, अग्निशमनमध्ये काम करण्यासाठी कायमस्वरूपी कर्मचारी मिळाले नाहीत. येथे सात पदे मंजूर आहेत. मात्र, अजूनही ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे आग विझविण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे.

हातमाग व्यवसाय बंद
पूर्वी जरीच्या साड्या, पातळ, धोतर आणि चोळीसाठी प्रसिद्ध खापा शहरातील हातमाग व्यवसाय आता पूर्णपणे बंद झाला. त्यामुळे त्यावर उपजीविका करणारा हलबा समाज उपासमारीच्या संकटात आहे. येथे हबला कोष्ठी समाज मोठ्या संख्येने आहे. ते पारंपरिक व्यवसाय करून जीवन जगायचे. कालांतराने आधुनिकीकरणामुळे हातमाग व्यवसाय बंद झाला आणि त्यांना अन्य व्यवसायाकडे वळावे लागले. अनेक विणकर गाव सोडून अन्य गावांत दुसऱ्या रोजगारांत गुंतले आहेत. हातमाग व्यवसायाला राजाश्रय न मिळाल्याने विणकर समाज हालअपेष्टांचे जीवन जगत आहे.

मॅंगनीज कंपनीत नोकरीसाठी वंशपरंपरा
खापा, गुमगाव येथे ब्रिटिशकालीन मॅंगनीज खाण आहे. येथील मॅंगनीज ओर इंडिया कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे वय 40 ते 50 वर्षे झाल्यानंतर त्यांना अनफिट दाखवून कामावरून कमी करण्यात येत आहे. त्या जागी त्यांच्याच मुलांना किंवा कुटुंबीयांना नोकरीत सामावून घेण्यात येते. त्यामुळे नोकरीची वंशपरंपरा येथे सुरू झाल्याने इतरांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे. तरुण नागपूर किंवा अन्य मोठ्या शहरात जाऊन मिळेल ते काम करीत आहेत.

कन्हान नदीला हवी संरक्षक भिंत
खापा कन्हान नदीकाठी वसले आहे. याच नदीतून शहराला पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठ्याच्या पंप हाउसजवळून शहराच्या दिशेने वळण घेऊन नदी वाहते. नदीच्या प्रवाहाने काठावरील काही भाग खचलेला आहे. काठावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत जलसाठा वाढल्याने नदीचे पाणी शहरात घुसते. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन नुकसान होत आहे. भविष्यात महापूर आल्याने खापा गाव बुडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नदीच्या काठावर संरक्षक भिंतीची गरज आहे.

कवी सुधाकर गायधनी उद्यान ओस
शहरात नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी पाच-सहा वर्षांपूर्वी नगर परिषदेने नवीन वस्तीमध्ये उद्यान तयार केले. त्या उद्यानाला आपल्या कविता व लेखनाने खाप्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान मिळवून देणारे महाकवी सुधाकर गायधनी यांचे नाव देण्यात आले. मात्र, नगर परिषदेच्या उदासीनतेमुळे आज हे उद्यान ओस पडले असून झुडपे वाढली आहेत. वस्तीच्या मधोमध असल्याने या उद्यानातील झुडपातील कीटक, सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे येथील नागरिकांनाही धोका निर्माण झाला आहे. या एकमेव उद्यानाचा पुन्हा विकास करणे गरजेचे झाले आहे.

गाळेधारक सुविधांपासून वंचित
नगर प्रशासनाने शहरात विविध ठिकाणी व्यवसायांकरिता गाळ्यांच्या चाळी बांधल्या. मात्र, गाळेधारकांना सोयीसुविधा देण्यात आल्या नाहीत. व्यवसाय करण्यासाठी येथील नागरिकांनी नगर प्रशासनाला भाड्यापोटी मोठी पगडी दिली. मात्र, येथे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह नाही. त्यामुळे महिला, ग्राहकांची गैरसोय होते.

उघड्यावर मांसविक्री
येथील खापा बसस्थानक परिसर, जिजामाता शाळेसमोरील रस्त्यावर मांस विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. येथे शालेय विद्यार्थी, प्रवासी नियमित ये-जा करतात. येथे नियमित सफाई होत नाही. त्यामुळे दुर्गंधीमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. या मांस विक्रेत्यांना स्वतंत्र जागा देऊन ओट्यांची निर्मिती करण्यात यावी.

शासकीय क्रीडांगण हवे
शहरात होतकरू आणि प्रतिभावंत खेळाडू आहेत. मात्र, त्यांना सरावासाठी शासकीय क्रीडांगण नाही. त्यामुळे त्यांचा विकास खुंटला आहे. क्रीडांगण नसल्याने क्रीडापटूंना केवळ सुटीच्या दिवशीच शाळांच्या मैदानावर सराव करता येतो. अन्य दिवशी जागा उपलब्ध नसते. त्यासाठी येथे सर्वसोयीयुक्त क्रीडांगणाची गरज आहे.
-------------------------------
नागरिकांच्या अपेक्षा

शहरात अनेक समस्या आहेत. घरकुलांचे प्रलंबित काम पूर्ण करून त्यांचे वाटप लाभार्थ्यांना केले जाईल. वाचनालय, क्रीडांगणासाठी प्रयत्न करू. शासन स्तरावर पाठपुरावा करून मोठे उद्योग आणू.
- पराग चिंचखेडे, नगराध्यक्ष

खापा येथे वीस वर्षांपूर्वी रेल्वे सुरू होती. रेल्वे बंद झाल्यापासून शहराच्या अधोगतीला प्रारंभ झाला. देशात अनेक लहान-मोठी गावे, शहरे रेल्वेमार्गाने जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. खापा येथेही रेल्वे पूर्ववत सुरू केल्यास या परिसरातील लहान गावांतील शेतकऱ्यांना माफक तिकीट दरात शेतमाल थेट नागपूरला नेऊन विक्री करता येईल. यात शेतकऱ्यांसह इतरांनाही रोजगार मिळण्याची शक्‍यता आहे.
- नरेश सक्तेल, माजी नगराध्यक्ष

2007 मध्ये घरकुल योजना मंजूर झाली. मात्र, गरिबांना अजूनही घर मिळाले नाही. ही प्रलंबित समस्या मार्गी लागण्याची गरज आहे.
- जागेश्‍वर गायधनी

साडेचौदा हजार लोकसंख्येच्या गावात मुलांसाठी क्रीडांगण नाही. त्यामुळे मुले मैदानी खेळापासून वंचित आहेत. शासकीय जागा उपलब्ध असल्याने क्रीडांगण बांधण्यात यावे.
- सुनील गाडीगोणे

नगर प्रशासनाने व्यापारी संकुले बांधली. मोठी पगडी देऊन व्यावसायिकांनी खोल्या भाड्याने घेतल्या. येथे व्यावसायिक गाळेधारकांकरिता नगर प्रशासनाने पाणी व स्वच्छतागृहाची अद्याप सोय नाही.
- खेमाजी डेकाटे, माजी नगरसेवक

शहरात शिक्षित युवकांची संख्या मोठी आहे. मात्र, एकही वाचनालय नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील युवक मागे पडत आहेत. शिक्षित युवक तसेच विद्यार्थी वर्गाच्या विकासासाठी वाचनालय सुरू व्हावे.
- विजय धार्मिक

शहर कन्हान नदीच्या काठावर वसले आहे. पंप हाउसजवळून वळण घेऊन शहराच्या दिशेने नदीचा प्रवाह वाहत आहे. नदीवरचा भाग पाण्याच्या प्रवाहाने खचला आहे. त्यामुळे पुराचे पाणी शहरात शिरण्याचा धोका असल्याने संरक्षक भिंत व्हावी.
- प्रशांत पराते

येथील हातमाग व्यवसाय बंद पडल्याने अनेक युवक बेरोजगार झाले आहेत. येथे एकमेव मॅंगनीज खाण आहे. मात्र, इतरांना रोजगार मिळत नाही. परिसरात खनिज, वनसंपदा, पाणी भरपूर प्रमाणात असतानाही एकही उद्योग नाही.
- हरीश कोल्हे
-------------------------------
समस्या यांना सांगा
नगराध्यक्ष, पराग चिंचखेडे : 9021343750
मुख्याधिकारी, किशोर धोटे : 7350258104
पोलिस निरीक्षक, विजय तिवारी : 901130291
खापा पोलिस ठाणे : 07113-286322
-------------------
संकलन : किशोर गणवीर (7875873726) 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.