चंद्रपूर- जिल्ह्यातील कोळसा कंपन्यांच्या कामगारांनी मंगळवारपासून संप पुकारल्याने वेकोलिची उत्पादन प्रक्रिया ठप्प पडली. या संपामुळे दिवसभर जिल्ह्यातील ३० कोळसा खाणींचे उत्पादन बंद झाले असून, वेकोलिचे जवळपास ३० कोटी, तर कोल इंडियाच्या जवळपास २०० कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
शासनाच्या कोळसा खाणीतील कामगार विरोधी धोरण व अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी देशभरात कामगार संघटनांच्या वतीने संप पुकारला आहे. देशपातळीवर संघटनांना प्रतिसाद देत जिल्ह्यातील पाचही मान्यताप्रात कामगार संघटना संपात सहभागी झाल्या.
सकाळच्या सुमारास सर्व कामगार कोळसा खदान परिसरात पोहचले. सर्व संघटनांचे प्रतिनिधी व कामगार एकत्रित येत शासनविरोधात निदर्शने केली. यापूर्वी तीनदा कामगारांच्या हितासाठी मान्यताप्राप्त संघटनांच्या पदाधिकार्यांसोबत कोळसा मंत्रालयात बैठक घेण्यात आली. मात्र, त्यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे कामगार संघटनांना संप पुकारावा लागला.
दरम्यान, संप पुकारताच पुन्हा कोळसा मंत्रालयाने संघटनांच्या पदाधिकार्यांना बैठकीसाठी पाचारण केले आहे. दरम्यान, इंटकचे राजेंद्रप्रसाद, एस. क्यू. जमा, बिएमएसचे प्रदीप दत्ता, आयटकचे रमेंद्रकुमार, एचएमएसचे नथ्थुलाल पांडे, सिंटूचे रॉय आदी पदाधिकारी दिल्लीत होणार्या बैठकीसाठी रवाना झाले आहेत.
कामगार संघटनांनी ६ ते १० जानेवारीपर्यंत संप करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पहिल्याच दिवशी कोट्यवधी रुपयांची उत्पादन प्रक्रिया ठप्प पडल्याने राज्यातील वीज उत्पादन प्रक्रियेवरही मोठा परिणाम झाला असून, विजेचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.