সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, January 04, 2015

पारशिवनी

पूर्वी पारशिवनीचे नाव शिवनी असे होते. मात्र, येथे येण्याकरिता कन्हान व पेंच या दोन नद्यांचे पात्र पार करून यावे लागायचे. त्यामुळे शिवनी या गावाला पारशिवनी असे नाव पडले. आधी पारशिवनी हे गाव वनशिंगी येथे होते. जेथे सध्या पारशिवनी शहर वसले आहे. ती जागा बाकाबाई भोसले यांच्याकडून मालगुजार बाजीराव पाटील यांनी 100 रुपयांत घेतली होती. कालांतराने येथे या गावाला स्थलांतरित करण्यात आले.
....
समस्या यांना सांगा
तहसीलदार बाळासाहेब तेढे : 9850560029
खंडविकास अधिकारी श्री. जाधव : 9421021344
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन नाईकवार : 6350008361
वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर : 9890986153
सरपंच प्रकाश डोमके : 9545354222
ग्रामविकास अधिकारी दिनकर इंगळे : 93250183640
पोलिस निरीक्षक दिलीप मसराम : 9667875204
वीज अभियंता श्री. गेडाम : 7850012425
संकलन : देवानंद शेंडे : 8888287528

सातपुडा पर्वतरांगांच्या दत्तटेकडी व शिवटेकडीच्या पायथ्याशी पारशिवनी गाव वसले आहे. उपराजधानीलगतचे गाव असल्याने दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे स्थानिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. गावालगतच मोठा तलाव आहे. त्यामुळे सर्वत्र हिरवळ असून, नागपूर जिल्ह्यातील "मिनी ग्रीनसिटी' अशी गावाची ओळख आहे. शिवटेकडीला "क' तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला असून, विकासाची प्रतीक्षा आहे. ऋषिपंचमीला येथे मोठी यात्रा भरते, तसेच लगतच घोगरा तीर्थस्थळ असल्याने महाशिवरात्रीला यात्रा भरते.
....
वैशिष्ट्य : पेंच व्याघ्र प्रकल्प, मानसिंगदेव अभयारण्य, पेंच जलाशय, कुंवारा भिवसेन, पर्यटन क्षेत्र लागठाणा येथे जाणारे पर्यटक पारशिवनीवरूनच जातात. तत्पूर्वी, पारशिवनीत हमखास थांबतात. त्यामुळे वैदर्भी पर्यटनाच्या दृष्टीने पारशिवनीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नागपूरपासून केवळ 32 किमी अंतरावर असल्याने व्यापाऱ्यांचे पारशिवनीकडे लक्ष आहे. मोठमोठ्या बाजारपेठ जवळच असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य किंमत मिळते.
......
दृष्टिक्षेपात पारशिवनी
लोकसंख्या : जवळपास 25 हजार
उद्योग : एकही नाही
वॉर्ड : 6
राष्ट्रीयीकृत बॅंका : 03
सहकारी बॅंका : 01
पतसंस्था : 04
जिल्हा परिषद शाळा : 02
महाविद्यालये : 02
ग्रामपंचायत कर्मचारी : 17
ग्रामपंचायत अधिकारी : 01
अंगणवाडी : 14
.....
दारू दुकान हटविण्यात यावे
वॉर्ड क्रमांक 1 व 4 मधील देशी दारूचे दुकान भरवस्तीत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. दारुड्यांच्या सततच्या भांडणांमुळे महिलांचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे दारूचे दुकान त्वरित हटविणे गरजेचे आहे. एकंदरीत, गावातच दारूबंदी केली पाहिजे.
...
मांसविक्रीची दुकाने गावाबाहेर असावीत
मांसविक्रीची बरीच दुकाने सावनेर - रामटेक मार्गावर आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचा त्रास ये-जा करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतो. विक्रीनंतर टाकाऊ मांस रस्त्यांच्या कडेला टाकले जाते. त्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढली आहे. मांसविक्रीची दुकाने शहराबाहेर असावीत.
...
दुकानाचे गाळे हवे
उपराजधानीलगत असूनही शहराचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही. ग्रामपंचायतीची मुख्य बाजार चौकात जागा असूनही तिथे दुकानाचे गाळे नाही. शहरात अनेक बेरोजगारांच्या हाताला काम नाही. ग्रामपंचायतीने दुकानांचे गाळे तयार करून ते भाड्याने दिले तर बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, सोबतच ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही भर पडेल.
...
कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे घाणीचे साम्राज्य
शहराच्या अनेक वस्त्यांतील कचरा सावनेर मार्गाच्या कडेला टाकला जातो. तिथे डुक्‍कर व कुत्र्यांची दिवसभर झुंबड असते. लगतच पालिवाल डी.एड. व बी.एड. महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा त्रास होतो. कचऱ्यामुळे डासांचा उच्छाद वाढला असून, साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित असावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
..
क्रीडासंकुलाच्या मागणीकडे दुर्लक्ष
वाढत्या लोकसंख्येसोबतच नागरिकांच्या गरजाही वाढत आहेत. शहरात क्रीडासंकुल नसल्यामुळे मुलांच्या खेळण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पारशिवनीत क्रीडासंकुलाकरिता जागा अधिग्रहित करण्यात आली, मात्र निधीअभावी काम रखडलेले आहे. वाढत्या स्पर्धेच्या आजच्या युगात मुलांची पीछेहाट होऊ नये म्हणून शहरात क्रीडासंकुल व्हावे, अशी मागणी जोर धरत आहे.
....
बाग, उद्यान नाही
लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात एकही उद्यान नाही. त्यामुळे आम्ही खेळायचे कुठे, असा प्रश्‍न बच्चेकंपनीकडून विचारला जातो. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना निवांतपणे बसण्यासाठी जागा नाही. सकाळ, संध्याकाळी त्यांना फिरण्यासाठी सावनेर रोड, पेंच रोड, खापरखेडा रोड, रामटेक रोड तसेच शिवटेकडी व दत्तटेकडी येथे जावे लागते.
...
भूमिगत गटारांची समस्या
उपराजधानीपासून जवळ असूनही पारशिवनीत मूलभूत सुविधांचा अभाव आहे. भूमिगत गटारे व नाल्या नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरूनच वाहते. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांचा हैदोस वाढला आहे. सध्या सर्वत्र डेंगी, मलेरियासह साथरोगांचे थैमान असताना प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे.
...
बसस्थानकावर खड्डेच खड्डे
अनेक महिन्यांपासून बसस्थानकातील रस्त्यांचे डांबरीकरण न झाल्यामुळे येथील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. दररोज प्रवास करणारे विद्यार्थी आणि नागरिकांना यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. स्थानिक लोकप्रतिनिधींनी किमान बसस्थानकाच्या रस्त्यांचे त्वरित डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बसस्थानकासोबतच शहरातील अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शहरात पाठीच्या आजाराचे रुग्ण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
...
अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी
वाढत्या लोकसंख्येसोबत गावात बेरोजगारांची संख्या वाढली. पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकांनी रस्त्याच्या कडेलाच दुकाने थाटली. वाढता वाढता शहरातील जुने बसस्थानक ते पेंच रोड व पेंच रोड ते तहसील कार्यालयापर्यंत अतिक्रमण वाढले. आठवडी बाजाराच्या दिवशी मुख्य रस्त्याने पायी चालणेही कठीण होते. याशिवाय दररोज वाहतुकीची कोंडी ठरलेलीच आहे. त्यामुळे शहरातील अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे. याशिवाय पेंच रोडवर ऑटोस्टॅण्ड असल्याने येथे वाहतुकीची कोंडी होते. आठवडी बाजाराच्या दिवशी येथून ऑटो काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.
....
हायमास्ट लाइटचा अभाव
शहरातील एकाही चौकात हायमास्ट लाइट नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते. ग्रामपंचायतीकडून अनेकदा हायमास्ट लाइटची मागणी करण्यात आली; परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी अंधारात चाचपडतच मार्गक्रमण करावे लागते.
.....
चौकांचे सौंदर्यीकरण व्हावे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत देशभर स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. परंतु शहरातील अनेक चौकांत कचऱ्याचे ढिगारेच दृष्टीस पडतात. शहरातील किमान मुख्य चौकांची स्वच्छता होऊन आंबेडकर चौक, गांधी चौक, सावनेर - रामटेक महामार्गावरील चौकांचे सौंदर्यीकरण करून शहराच्या सौंदर्यात भर घालावी.
...
गाव तहानलेलेच
वाढत्या लोकसंख्येसोबत नागरिकांच्या गरजाही वाढत आहेत. त्यातच पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. सध्या पेंच नदीवरून पालोरा येथून शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र एका जलवाहिनीने होणारा पाणीपुरवठा अपुरा पडतो. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने नवेगाव खैरी येथील पेंच जलाशयातून 12 किमीची जलवाहिनी टाकून शहराला पाणीपुरवठा करण्याचे ठरविले असून, कामाला सुरुवात झाली. तरीही 14 वर्षांनंतरही या योजनेचे पाणी शहरात पोहोचले नाही. जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती असल्याने पाणी वाहून जाते. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जाते.
....
प्रतिक्रिया
शहराचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही. आता राज्यात भाजपची सत्ता आली आहे. या भागाचा आमदार या नात्याने शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सदैव तत्पर आहे.
डी. मल्लिकार्जुन रेड्डी (आमदार)
अग्निशमन यंत्रणा असावी
जवळपास 25 हजार लोकसंख्या असताना शहरात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नाही. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडते. त्यामुळे अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
हेमंत सूर्यवंशी
.....
शववाहिनीची सोय व्हावी
वाढत्या लोकसंख्येसोबत नागरिकांच्या गरजा वाढत आहेत. स्थानिक प्रशासनाकडून शहरात एखादी शववाहिनी असणे गरजेचे आहे.
महेश रोकडे
...
दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्‍यात
शहरात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागते. त्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे.
सलीम बाघाडे (ग्रा. पं. सदस्य)
.....
नगरपंचायतीचा दर्जा मिळावा
वाढत्या लोकसंख्येसोबत शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळणे गरजेचे आहे. नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यास शहराचा चौफेर विकास होईल. नागरिकांच्या मूलभूत समस्यांचा निपटारा होईल.
प्रा. रवींद्र बर्वे
...
झोपडपट्ट्यांना मालकी हक्‍काचे पट्टे मिळावेत
इंदिरानगर, महात्मा गांधीनगर, एमआयडीसी झोपडपट्टी यांना स्वत:च्या मालकी हक्‍काचे पट्टे मिळवून देण्यासाठी प्रशासनाने मदत करावी, तसेच शासकीय आबादी ले-आउटमधील रस्ते, नाल्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी शासनाने लक्ष द्यावे.
सागर सायरे, ग्रा. पं. सदस्य
..........
रुग्णालयात औषध पुरवठा व्हावा
येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची प्रचंड गैरसोय होते. गरीब रुग्णांना रुग्णालयात औषध मिळत नाही. त्यामुळे नियमित औषध पुरवठा व्हावा.
-तुषार दापूरकर
...

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.