সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, November 12, 2014

अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थांच्या ऑनलाईन माहिती प्रणालीचे उदघाटन

अल्पसंख्याक संस्थांची प्रवेशप्रक्रिया होणार अधिक पारदर्शक

मुंबई, दि. 11 : राज्यातील भाषिक व धार्मिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्थांची प्रवेशप्रक्रिया आणि कारभार आता अधिक पारदर्शक होणार असून यासाठी mddtrust.mahaonline.gov.in या अद्ययावत वेबपोर्टलचा आज मंत्रालयात राज्याचे महसूल तथा अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त मंत्रालयात आज श्री. खडसे यांच्या दालनात हा कार्यक्रम झाला.

राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था चालवित असलेल्या शाळा, महाविद्यालये व इतर व्यावसायिक महाविद्यालयांची इत्तंभूत माहिती उपलब्ध करुन दिली जाणार असून शाळा, महाविद्यालयांच्या शाखा, त्यांची प्रवेश क्षमता, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात देण्यात आलेले प्रवेश, रिक्त जागांची संख्या आदी माहिती या वेबपोर्टलवर उपलब्ध होणार आहे. याशिवाय राज्यातील सर्व अल्पसंख्याक संस्थांचे पत्ते, दुरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी, शासनामार्फत त्यांना मिळालेले अनुदान, या संस्थांचे मागील 3 वर्षातील लेखा परिक्षण अहवाल आदी माहितीही या वेबपोर्टलवरुन मिळणार आहे. राज्यातील भाषिक व धार्मिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त सर्व शैक्षणिक संस्थांना ही माहिती वेबपोर्टलवर तातडीने भरण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यातील भाषिक व धार्मिक अल्पसंख्याक संस्थांना शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देण्यात येते. आतापर्यंत राज्यातील 2 हजार 418 संस्थांना भाषिक व धार्मिक अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या सर्व संस्थांची इत्तंभूत माहिती आता वेबपोर्टलवर उपलब्ध होणार असल्याने प्रवेशेच्छूक विद्यार्थी, पालक यांची मोठी सोय होणार आहे.

अल्पसंख्याकांच्या विकासासाठी व्यापक प्रयत्न करणार - खडसे

याप्रसंगी बोलताना मंत्री श्री. खडसे म्हणाले की, देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत महत्वाचे योगदान राहिले आहे. मौलाना यांनी त्यावेळी हिंदु-मुस्लिम ऐक्यासाठी मोठे प्रयत्न केले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाच्या विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी त्यांनी शिक्षण क्षेत्रावर मोठा भर दिला. आजही त्यांच्या विचारांची मोठी गरज असून आपण त्यावर वाटचाल केली पाहिजे, असे ते म्हणाले.

श्री. खडसे म्हणाले की, राज्यातील अल्पसंख्याक समाजाची शैक्षणिक परिस्थिती बिकट आहे. एका माहितीनुसार अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे आयएएस होण्याचे प्रमाण फक्त 0.25 टक्के इतके आहे. या परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी मुस्लिम समाजाने शिक्षणावर भर दिला पाहिजे. अल्पसंख्याक समाजाची शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य शासनामार्फत व्यापक प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.

याप्रसंगी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव संजय कुमार, सहसचिव श्रीमती ऐनुल अत्तार, माजी आमदार सुहेल लोखंडवाला, रऊफ खान, इक्बाल आफिसर, सोहेल खान, मुख्तार अली, सलिम अलवारे, एम. खालीद, इक्बाल शेख, उर्दू कवियित्री श्रीमती खुशबू खाजम यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.