সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, March 04, 2013

उद्योजकांनी प्रक्रिया उद्योगात पुढे यावे


चंद्रपूर दि.04- शेती उत्पादनात विदर्भ अग्रेसर असून मात्र शेतीवर आधारीत प्रक्रिया उद्योग तुलनेनी कमी प्रमाणात आहेत.  शेती मालावर प्रक्रिया करणारे उद्योग विदर्भात आल्यास किंवा येथील उद्योजकांनी प्रक्रिया उद्योग सुरु केल्यास शेतक-यासह उद्योजकांना आर्थिक फायदा होवून विदर्भाचा विकास होईल.  यासाठी उद्योजकांनी अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक करावी असे आवाहन पालकमंत्री संजय देवतळे यांनी केले.
      महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या वतीने  विदर्भातील अन्न प्रक्रिया उद्योगाबाबत चालना देण्यासाठी एक दिवशीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी पालकमंत्री संजय देवतळे बोलत होते.  आमदार सुधीर मुनगंटीवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, जिल्हाधिकारी विजय वाघमारे व विभागीय व्यवस्थापक डॉ.अनील मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
      कार्यक्रमाचे सुरुवातीला पालकमंत्री संजय देवतळे यांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन चर्चासत्राचे उदघाटन करण्यात आले.  आपल्या भागातील प्राप्त व्यवस्थेच्या आधारे शेती मालावर प्रक्रिया उद्योग सुरु केल्यास या भागातील शेतमालाला चांगला भाव मिळेल सोबतच येथील तरुण तरुणींना रोजगार प्राप्त होईल असे ते म्हणाले.  शेतीला जोड धंदयाची अतिशय आवश्यकता असून कुकुट पालन, मासेमारी यासारखे व्यवसाय शेतक-यांनी करावेत.
      कापूस व धान यासारखी पिके विदर्भात मोठया प्रमाणात होत असून येथील माल प्रक्रियासाठी बाहेरील राज्यात आयात केला जातो.  त्यापेक्षा आपल्याच भागात प्रक्रिया उद्योग निर्माण झाल्यास कापूस व धानाच्या मुल्यात वाढ होवू शकते असे ते म्हणाले.  राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियानाचा शुभारंभ आपल्या जिल्हयातून होत आहे ही बाब येथील उद्योजकांना प्रोत्साहन देणारी ठरेल असे सांगून देवतळे म्हणाले की, या योजनेचा परिसरातील उद्योजकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.  शासन त्यांना सर्व सहकार्य करण्यास तयार आहे.
      आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, या चर्चासत्राचे निमित्ताने प्रक्रिया उद्योगासाठी चांगले वातारवण तयार होणार आहे.  विदर्भात मोठया प्रमाणात कच्चा माल उपलब्ध आहे. पण त्यावर आधारीत प्रक्रिया उद्योग नाहीत.  राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रक्रिया उद्योग उभे राहावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बचत गटाचे कार्य चांगले असून प्रक्रिया उद्योगात बचत गटांना प्राधान्य देण्याचे मुनगंटीवार म्हणाले.  माजी मालगुजारी तलावामध्ये मासेमारीचा व्यवसाय उपलब्ध करुन दयावा यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
      व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी आपल्या भाषणात या योजनेची सविस्तर माहिती दिली.  गेल्या दोन महिण्यापासून ही योजना महाराष्ट्राकडे आली असून आतापर्यंत 370 अर्ज प्राप्त झाले आहेत.  यापैकी 70 टक्के अर्ज पश्चिम महाराष्ट्रातील असून विदर्भातील जास्तीत जास्त लोकांनी प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी अर्ज करावे यासाठी चंद्रपूरात चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एखादया उद्योजकाला अन्न प्रक्रिया उद्योग उभारायचा असेल किंवा विस्तार करायचा असेल तर 50 लाखापर्यंत अनुदान या योजनेत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.  विदर्भात शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी पोषक वातावरण असून येथील उद्योजकांनी अन्न प्रक्रिया उद्योगाकडे वळावे असे आवाहन त्यांनी केले.
    डव्हाटेज विदर्भमुळे विदर्भात मोठया प्रमाणात उद्योग येवू घातले असून त्याची सांगड प्रक्रिया उद्योगाशी घातल्यास विदर्भ विकासाला हातभार लागेल. हे चर्चासत्र चंद्रपूरसाठी संधी असून याठिकाणी मोठया प्रमाणात उद्योग यावेत असे मत जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी व्यक्त केले.  उद्योजकांचे अडचणी सोडविण्यासाठी आपण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      या चर्चासत्राचे निमित्ताने वनिता आहार उद्योगाचे विनायकराव धोटे यांचा पालकमंत्री संजय देवतळे यांनी शाल श्रीफळ देवून सत्कार केला.  या कार्यक्रमात उद्योजक संघटनेचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा यांनी उद्योगासमोर येणा-या अडचणी सांगून त्या सोडविण्याची विनंती केली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र शिंदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.अनिल मोरे यांनी मांडले. या चर्चासत्रास विविध उद्योगातील उद्योजक मोठया संख्येने उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.