সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, March 30, 2013

अपघातात एका इसमाचा मृत्यू

अपघातात एका इसमाचा मृत्यू


चंद्रपूर, ३० मार्च
भरधाव दुचाकीवरून चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकीने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका इसमाचा मृत्यू तर दोन युवक गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवार, ३० मार्चला दुपारी २ वाजताच्या सुमारास कोसारा गावाजवळ घडली. मृतकाचे नाव सुधाकर शिवराम सिडाम (४१, रा. ताडाळी) असून, जखमींची नावे शहामुद्दीन मोहम्मद इनायत अन्सारी (२०) व शब्बीर अन्सारी (२२) अशी आहे.
ताडाळी निवासी सुधाकर सिडाम, शहामुद्दीन मोहम्मद इनायत अन्सारी व शब्बीर अन्सारी हे तिघे काही कामानिमित्य चंद्रपूर येथील न्यायालयात दुचाकीने येत होते. दरम्यान, दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनाने समोरून येणाèया ट्रकला जबर धडक दिली. यात सुधाकर सिडाम, शहामुद्दीन मोहम्मद इनायत अन्सारी व शब्बीर अन्सारी हे तिघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, सुधाकर सिडाम याची प्रकृती qचताजनक झाल्याने त्यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Friday, March 29, 2013

चंद्रपुरात रक्तरंजित रंगपंचमी - -

चंद्रपुरात रक्तरंजित रंगपंचमी - -

चंद्रपूर - जुन्या वादातून दोन गटांत उद्‌भवलेल्या हाणामारीत तलवारहल्ला झाल्याने तीन महिलांसह पाच जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (ता. 28) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. या प्रकरणी 15 आरोपींना अटक करण्यात आली. ही घटना आपसी वादातून घडली असली, तरी होळीच्या पार्श्‍वभूमीवर रक्तरंजित रंगपंचमी झाल्याने प्रचंड दहशत निर्माण झाली. 

शहराच्या मध्यवर्ती भागातील जलनगर वॉर्डात खंजर मोहल्ला आहे. परप्रांतीय नागरिक असलेल्या वस्तीत नेहमीच चाकू, तलवारीने हाणामारीच्या घटना घडत असतात. हाती स्थायी रोजगार नसल्याने हे परप्रांतीय अवैध व्यवसाय करून जीवन जगतात. त्यामुळे व्यवसाय करण्यावरून एकमेकांत वाद होत असतात. अशातच गुरुवारी रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी जुना वाद उफाळून आला. प्रारंभी शाब्दिक वाद होता. त्यानंतर तरुणांच्या एका गटाने तलवारी काढून तीन महिलांसह पाच जणांवर सपासप वार सुरू केले. त्यामुळे जलनगरात प्रचंड दहशत निर्माण झाली. या घटनेची माहिती काहींनी पोलिसांना दिली. जखमी आपला जीव वाचविण्यासाठी रक्ताने माखलेल्या स्थितीतच जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेत होते. पोलिस पथक पोहोचल्यानंतर सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुणाच्या पोटावर, तर कुणाच्या पाठीवर वार झालेले दिसून आले. नरेश रामवा खंजर (वय 25), सारिका जय खंजर (वय 30), सविता रवी खंजर (वय 35), पायल बादल खंजर (वय 31), सुनील रामवा खंजर (वय 21) अशी जखमींची नावे आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वांना भरती केल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. यात एकूण 15 जणांना अटक करण्यात आली. सायंकाळपर्यंत सर्व आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

अवैध व्यवसायाचा वाद 
शहरातील जलनगर वॉर्ड हे अवैध धंद्यांसाठी प्रसिद्ध आहे. सणानिमित्त दारूविक्री बंद असली की, येथे अवैधरीत्या दारू मिळते. पोलिसांनाही ही बाब माहीत आहे. मात्र, कारवाईच होत नसल्याने 16 वर्षांपासूनचे तरुणदेखील या दिवशी उघडपणे दारू विकण्यासाठी रस्त्यावर उभे असतात. अशा वेळी ग्राहक मिळविणे आणि जादा व्यवसाय करणे, यावरूनही अनेकदा वाद उफाळून आले आहेत.
 आरोग्य सेवेतील रिक्त पदे भरण्यास प्राधान्य

आरोग्य सेवेतील रिक्त पदे भरण्यास प्राधान्य


  
     आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी घेतला रुग्णसेवेचा आढावा    

      चंद्रपूर दि.29- जिल्हा सामान्य रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असून राज्यात 440 नवीन डॉक्टरांची भरती करण्यात आली आहे त्यापैकी प्राधान्याने चंद्रपूर जिल्हयात पदस्थापना देण्यात येईल अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी दिली.  आज सामान्य रुग्णालयाचा पहाणी दौरा करुन आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालय 30 खाटावरुन 50 खाटाचे करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावे अशा सूचना जिल्हा शल्य चिकिस्तक यांना केल्या.
        आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांचे सोबत आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार विजय वडेट्टीवार, आरोग्य उपसंचालक डॉ.मनोहर पवार, जिल्हा शल्य‍ चिकित्सक डॉ.प्रमोद सोनुने, माजी उपसंचालक डॉ.अरुण आमले, डॉ. टि.जी.धोटे, डॉ.सरीता हजारे, डॉ.अनंता हजारे व डॉ.चंद्रशेखर लाडे दौ-यात सहभागी होते.   
      जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्ग 1 ची एकूण 14 पदे रिक्त असून  त्यापैकी 9 पदे तात्काळ भरण्याची प्रक्रिया करण्यात येईल असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.  सिटी स्कॅन मशीन, एमआरआय मशिन व एक्स रे मशीन च्या निवीदा शासनाने मागविल्या असून ही यंत्रसामुग्री लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.  या आढावा बैठकीत त्यांनी अंडवृध्दी बाबत विशेष मोहिम घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या.
       राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रम, माता बालसंगोपन कार्यक्रम, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण, राष्ट्रीय एड्स नियंत्रण, सिकलसेल नियंत्रण, मानसिक आरोग्य तपासणी, राष्ट्रीय कर्ण बधिरता नियंत्रण, हत्ती रोग नियंत्रण, मधुमेह, कर्करोग नियंत्रण, शालेय आरोग्य तपासणी, क्षयरोग नियंत्रण व कृष्ठ रोग नियंत्रण कार्यक्रमाचा सविस्तर आढावा आरोग्य मंत्र्यांनी घेतला.  
      बल्लारपूर येथे 30 खाटाचे रुग्णालय 50 खाटाचे करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना आरोग्य मंत्र्यांनी दिल्या.  जननी सुरक्षा कार्यक्रम अधिक प्रभावी पणे राबविण्याच्या सूचना देतांनाच गरोदर मातांना प्रसुती संपूर्णपणे  मोफत देण्यात याव्या असे आरोग्य मंत्र्यांनी सांगीतले. चतुर्थश्रेणी रिक्त पदाबाबत जिल्हाधिकारी यांचेसोबत बैठक घेवून ती भरण्याची प्रक्रिया करावी असे निर्देश शेट्टी यांनी दिले.
      या आढावा बैठकीनंतर आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाची प्रत्यक्ष पहाणी केली.  यावेळी त्यांनी सामान्य कक्ष, अतिदक्षता कक्ष, महिला प्रसुती कक्ष, बर्नवार्ड, ओपीडी, औषधी कक्ष यासह रुग्णालयातील वार्डला भेट देवून पहाणी केली.   यानंतर मंत्रीमहोदयांनी अधिका-यांशी व नागरीकांशी चर्चा करुन आरोग्य संबंधी समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याचे  सांगितले.
ग्रामस्वच्छतेतून साजरी केली होळी

ग्रामस्वच्छतेतून साजरी केली होळी

चंद्रपूर- एकमेकांच्या अंगावर रंग आणि पाणी उधळत धुळवडसाजरी करण्याऐवजी भद्रावती तालुक्यातील घोनाड व कोची या दोन गावातील नागरिकांनीग्रामस्वच्छता करून होळी साजरी केली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता आणि संतगाडगेबाबांच्या संदेशांचा गजर करीत ग्रामस्थांनी स्वच्छता अभियान राबविले गावातील काडीकचरा वेचण्यात आला प्रदूषण टाळण्यासाठी सामूहिकपणे एकच होळी पेटविण्यातआली गावातील नाल्या कचऱ्याचे ढीग स्वच्छ करण्यात आलेत त्यानंतर रात्रभर भजन -कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला धुलीवंदनाच्या दिवशी सामूहिक ध्यान करण्यात आले त्यानंतरभव्य ग्रामदिंडी काढण्यात आली बचत गटांचे सदस्य महिला युवकांनी सहभाग घेतला ग्रामनिरीक्षणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला त्यानंतर सहभोजनाने होलिकोत्सवाच्याकार्यक्रमाची सांगता झाली रंगाचा वापर आणि पाण्याचा अपव्यय टाळत गावकऱ्यांनी हाआगळावेगळा संदेश लोकांना दिला आहे होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी गावातील मद्यविक्रीपूर्णपणे बंद होती युवकांनीही त्याचा चांगला प्रतिसाद दिला गुरुदेव सेवा मंडळाचे बंडोपंत बोढेकरयांनी या निर्णयाबद्दल युवकांचे कौतुक केले बोढेकर यांच्या अध्यक्षतेखाली कोची येथील कार्यक्रमातसेवकराव मिलमीचे काया बालबोढ हरीदास भोयर हनुमान बल्की नामदेव थेटे शशीकांतजगताप देवानंद मारेकर नंदू शेळकी आदींनी पुढाकार घेतला .
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....

तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....

तुकोबा,होऊ नये तो
सगळ्याचाच कळस झालाय.
ज्याचा येऊ नये
त्याचाच किळस आलाय.

पूर्वी कधीच नव्हता
असा भक्तीचा बाजार आहे.
श्रद्धा-ब्रिद्धा सबकुछ झुठ,
हा मानसिक आजार आहे.

आम्ही सगळे ओळखलेय
दंभाला भक्तीची
रंगरंगोटी आहे.
हे सगळेच नाठाळ,
यांना कासेची लंगोटी नको;
यांच्या बाळबुद्धीला
फक्त तुम्ही नाठी म्हणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....

यांना अजून माहित नाही,
बोलले तसे वागले पाहिजे.
किर्तनातल्या शब्दा-शब्दाला
प्रत्यक्षात जागले पाहिजे.

तुमच्या भागभांडवलावरच
जोरात यांचा धंदा आहे.
यांच्या दर्शनासाठीही
पायावरती चंदा आहे.
यांची ही बाबागिरी आणि बंडलबाजी
तुम्ही एकदा खोटी म्हणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....

उगीच कुणाचा कधी
उगीच तुकोबा होत नाही.
त्यासाठी मोह,माया,वासना,
मूळापासून झडवाव्या लागतात.
वाटलेल्या कर्जाच्या खतावण्या
इंद्रायणीत बुडवाव्या लागतात.

वरून अंगाला नाही,
मनाला राख फासावी लागते.
कुणाच्या शाही नजराण्याची
आसक्ती नसावी लागते.

आजकाल मात्र
जरा वेगळीच खोड आहे.
अध्यात्म आणि राजकारण
जणू दंवडीची जोड आहे?

जो राजाश्रयाला भुलला,
तो काही साधु नाही.
कुणावरही आपले
गुरूत्व कधी लादू नाही.

राम-कृष्ण-हरीचा मंत्र
एकदा यांच्यासाठी म्हणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....

अजूनही त्यांचा
पून्हा तोच दावा आहे.
वेदांचा खरा अर्थ,
आम्हांलाच ठावा आहे.

ते सांगतात तोच धर्म,
ते सांगतील तोच देव आहे.
जसे काय ज्ञान म्हणजे,
त्यांच्या बापाचीच ठेव आहे.

पंढरीच्या वाळवंटी
आम्ही नाचतो आहोत.
नव-नवे अर्थ शोधत
गाथा पुन्हा वाचतो आहोत.

एक कौतुकाची थाप
आमच्याही पाठी हाणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....

अध्यात्माच्या क्षेत्रात
आज ज्याचा त्याचा टापू आहे.
रोज नवा बाबा,नवा महाराज,
रोज नवी मॉं,नवा बापू आहे.

मी मोठा की तु मोठा?
याचे स्तोम तर फार आहे.
भक्तांच्या टोळ्या-टोळ्यात
आज जणू गॅंग-वॉर आहे?

जुना भक्त नवा गुरू,
उगवत्याला वंदन असते.
ओव्हरडोस होईल असे,
सत्संगाचे चंदन असते.

याला अध्यात्माचे राजकारण,
नाही तर कुणी अध्यात्मिक खुटी म्हणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....

कुणी आपल्या बडेजावात
भक्तांना चूर करतोय,
कुणी भोळ्या भक्तांचे
दु:ख इथे दूर करतोय.

कुणी लावतोय अंगारा,
कुणी भक्तांचे कान फुंकतोय.
कुणी अफू-गांजाच्या नशेत
मठा-मठात छान झिंगतोय.

कुणी झाले मांत्रिक,
कुणी झाले तांत्रिक.
कुणी पट्टीचा ऍक्टर आहे.
रोग्यांची संख्या वाढ्ताच,
कुणी चक्क डॉक्टर आहे.

रोग कोणताही असो
त्यांच्याकडे उपचार हजर आहेत.
अडल्या-नडल्या भक्तांचे
त्यांच्याच नावाने गजर आहेत.

व्याकूळलेल्या भक्तांना
जो तो अध्यात्माची भूल देतोय.
एवढेच काय?
ज्यांना होत नाही,
त्यांना चक्क मूल देतोय !

झोपलेल्या या भक्तांना
तुम्ही एकदा उठी उठी म्हणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....

गुरूंबरोबर भक्तांनाही
आज अध्यात्माची नशा आहे.
वरून वरून किर्तन,
आतून मात्र तमाशा आहे.

बुवा तिथे बाया,
बाया तिथे बुवा आहे.
एकांतात गुरूची सेवा,
एकांतातच दूवा आहे.

किर्तनाची बिदागी तर
विचारू नका किती आहे.
अध्यात्मिक चंगळवादात
बिचारी श्रद्धा सती आहे.

घेणारांना गोड वाटते,
देणारांनाही गोड वाटते.
जेव्हढी बिदागी जास्त,
तेवढी किर्तनाची ओढ वाटते.

याला धंदा म्हणा, नाही तरी
कुणी लुटा-लुटी म्हणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....

आता पाप पाप म्हणून
कुणी उर बडवू शकत नाहीत.
कुणाच्याही गाथा,
पुन्हा इंद्रायणीत बुडवू शकत नाही्त

सदेह वैकुंठाचा अर्थ
हळूहळू का होईना कळतो आहे.
तरीही एखादा मंबाजी,
जमेल तसा छळतो आहे.

खोटा इतिहास पुन्हा
कुणी लिहू शकत नाही.
आणायचे म्हटले तरी
ते विमान पुन्हा येऊ शकत नाही.

तुकोबा तुमचा वारसा
आमच्या ठायी ठायी आहे !
आजकाल आमच्या लेखणीत
तुमचा आशिर्वाद अन
वॉटरप्रुफ शाई आहे !!

वज्राहून कठीण,
मेणाहून मऊ आहोत.
केला होता अट्टहास यासाठी म्हणा.
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा....

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
मोबा.९९२३८४७२६९

Thursday, March 28, 2013

मजुरीसाठी श्रमिक एल्गारचा रास्ता रोको आंदोलन

मजुरीसाठी श्रमिक एल्गारचा रास्ता रोको आंदोलन


मुल तालुक्यातील फुलझरी जंगलातील बांबु कटाई कामगारांना ठरलेल्या दराप्रमाणे मजुरी द्यावी ही मागणी घेऊन जानाळा येथे श्रमिक एल्गारचे वतीने रास्ता आंदोलन करण्यात आले व आंदोलनानंतर रात्रभर मजुरीचे वाटप करण्यात आले.
बल्लारपूर पेपर मिलचे वतीने फुलझरी येथे मागील 2 महीण्यापासुन बांबु कटाईचे काम सुरू होते. या कामावर मध्यप्रदेश, गोंदिया जिल्हा व परीसरातील मजुर मोठया प्रमाणात बांबु कटाईचे काम करीत होते. सदर मजुरांना 11 रूपये प्रती बंडल दिल्या जात होते परंतु हा दर परवडण्यासारखा नसल्यामुळे मजुरांनी एक महीण्यापुर्वी काम बंद करून जंगल सत्याग्रह आंदोलन पुकारला होता. या आंदोलनाची दखल घेत बल्लारपुर पेपर मिलचे अधिकाÚयांनी मजुरांची बैठक घेऊन 12 रूपये प्रती बंडलप्रमाणे दर देण्याचे मान्य केल्याने पुर्ववत कामाला सुरवात करण्यात आली.
काम पुर्ण झाले व होळीचा सणही असल्याने मजुरांना मजुरीची आवश्यकता होती परंतु बल्लारपुरचे अधिकारी 11 रूपये प्रती बंडलप्रमाणे मजुरीचे वाटप सुरू केले त्यामुळे मजुरांमध्ये असंतोष निर्माण होऊन ठरलेल्या दराप्रमाणेच मजुरी मिळत नसल्याने मजुरी घेण्यास नकार दिला. श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अॅड.पारोमिता गोस्वामी यांनीही पेपर मिल व्यवस्थापनाला समजविण्याचा प्रयत्न केला परंतु मजुरांच्या भुमिकेला मानत नसल्याने 25 मार्चला रात्रो 9.30 वाजता जानाळा येथे चंद्रपूर - मुल मार्ग बंद करण्यात आला. यावेळी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले परंतु मजुर हटण्यास तयार नव्हते. मजुरांची भुमिका ठाम असल्याने बिल्टचे अधिकाÚयांनी 12 रूपये दर देण्याचे मान्य केंले.  मजुरी ही त्याचवेळी वाटपाला सुरवात झाली पुर्ण रात्र व दिवसभर जवळपास 45 लाख रूपये पोलीसांचे समक्ष मजुरी वाटप करण्यात आली.
या आंदोलनात अॅड. पारोमिता गोस्वामी सह विजय कोरेवार, विजय सिध्दावार, डाॅ. कल्याणकुमार, प्रविण चिचगरे, शंकर बोरूले, अनिल शेंडे, संगिता गेउाम, दिनेश घाटे, यमराज बोदलकर, वामन मउावी, किशोर बद्देलवार आदी श्रमिक एल्गारचे कार्यकर्ते सहभागी होते.
घोडेवाही येथील धान्य दुकानाचा परवाना रद्द

घोडेवाही येथील धान्य दुकानाचा परवाना रद्द


- श्रमिक एल्गारच्या प्रयत्नाला यश

सावली तालुक्यातील मौजा घोडेवाही येथील वादग्रस्त स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी श्रमिक एल्गारने पुकारलेल्या लढयाला यश आले..
सावली तालुक्यातील मौजा घोडेवाही येथील कार्डधारक रास्तभाव दुकानदार उत्तम निमगडे याचे मनमानी कारभाराविरूघ्द गेल्या 5-6 वर्षापासुन तक्रारी करीत आहेत. अवैद्यरित्या मालाची विक्री करतांना रंगेहात पकडले, तिनदा ग्रामसभेत सदर दुकानदारला हटविण्याबात ठराव घेण्यात आला, जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपुर यांनी सदर दुकानदाराचा परवाना रद्दही केला असतांना दुकानदाराचे अपील अर्जावरून उपायुक्त नागपूर यांनी उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याचे कारण देऊन पुन्हा निमगडे यालाच दुकान पुर्ववत दिले. परंतु सदर दुकानदाराला 15 एकर शेती, थ्रेशर मशीन, टॅªक्टर, स्लॅपचे घर असल्यामुळे या आदेशाविरूध्द श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात कार्डधारकांनी सावली तहसिल कार्यालयातच दिनांक 22.01.2013 ला ठिय्या मांडला व 144 राशन कार्ड उपायुक्त नागपूर यांना तहसिलदारचे मार्फतीने परत केले. त्यानंतर 10.2.13 ला जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे कार्यालयासमोर ठिया आदंोलन केले. या आंदोलनाची दखल घेत सदर दुकानाची चैकशी करण्यात आली. चैकशीअंती जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर यांनी  18 फरवरी 2013 चे आदेशानुसार सदर दुकानदार अनियमितपणे मालाचे वाटप करणे, धान्याची अफरातफर करणे आदी कारणांकरीता अनामत रक्कम जप्त करून निमगडे यांचा परवाना रद्द केले.
निमगडे याचा परवाना श्रमिक एल्गारचे प्रयत्नामुळे रद्द झाल्याने सरपंच सत्यवान दिवटे, तमुस अध्यक्ष संजय दुधे, देवांगणा दुधे, गंगूबाई डोंगरे, वर्षा चिमुरकर, नंदा उंदिरवाडे, पोर्णिमा डोंगरे, आमुबाई चिमुरकार, मिराबाई बारसागडे, यामीना दहेलकार, यामीना बाबनवाडे, सुरेश कोडापे, देवराव गोहणे, यशवंत संदोकार, गुरूदास गावडे, बाबुराव पिटाले यांसह शेकडो महीला पुरूष श्रमिक एल्गारचे आभार मानले आहे. -

Monday, March 25, 2013

ग्रंथोत्सव व सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप

ग्रंथोत्सव व सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप


             
भारती बंधूंच्या सुरेल गायनाने रसिक मंत्रमुग्ध
चंद्रपूर, दि. 25 सुफी संगीतातील सातव्या पिढीचे नेतृत्व करणा-या  भारती बंधूंनी आपल्या बहारदार संगीताचा नजराना सादर करून चंद्रपूरकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांनी संगीताचा आस्वाद घेत टाळ्यांच्या जोरदार गजरात भरभरून दाद दिली. चंद्रपूरकरांनी तीन दिवस गायन, नृत्य व संगीताचा त्रिवेणी संगम अनुभवला.  भारती बंधूच्या सुफी गायनाने सांस्कृतिक महोत्सव व ग्रंथोत्सवाचा समारोप झाला.  अशा प्रकारचे कार्यक्रम नेहमी चंद्रपूरात व्हावे, अशी अपेक्षा चंद्रपूरकर रसिकांनी  व्यक्त केली.  
सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चांदा क्लब मैदानावर तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव तथा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी सांस्कृतिक महोत्सव व ग्रंथोत्सवाचे उदघाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्या हस्ते झाले. या तीन दिवसीय कार्यक्रमात हरिहरन यांचे गायन, पार्वती दत्ता यांचे शास्त्रीय नृत्य व भारती बंधू यांच्या सुफी संगीताचा त्रिवेणी संगम चंद्रपूरकरांना अनुभवयास मिळाला. भारती बंधू यांच्या सुफी संगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी विजय वाघमारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी.एच. डहाळकर, उपविभागीय अधिकारी आशितोष सलील, अहेरीचे उपविभागीय अधिकारी उदयसिंग चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण बडकेलवार, तहसिलदार गणेश शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, कार्यक्रम व्यवस्थापक आशिष उके आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
भारती बंधुंनी जीवन का भार सोप दिया तुम्हारे हाथो मे.........या गीताने सुरूवात करून संगीताचे विविध प्रकार सादर करत रसिकांचे मन जिंकले. त्यानंतर सुरज की गरमी से....., मौसे नैना मिलायके........, मोहे अपना बनायके..... अशी एकाहून एक सुफी गीतं सादर करून चंद्रपूरकरांना मंत्रमुग्ध केले. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांनी टाळ्यांचा जोरदार गजर करून  दाद दिली.  कार्यक्रमात स्थानिक गायक समृध्दी इंगळे, अजय मांडविया, श्री. दारा, सौ. शितल दारा, हिमांशु रंगारी, संदीप कपूर यांनी रोज रोज ऑंखो...., इन्ही लोगो ने ले लिया दुपट्टा मेरा...., अभी मुझमे बाकी है जिंदगी....., इश्क सुफीयाना...., नैना ठगलेंगे......., धुनकी धुनकी लागे......अशी विविध बहारदार गीते सादर करून रसिकांचे मने जिंकले.  त्यांना चंद्रशेखर शर्मा, दिनेश, बंटी, रवी यादव, निखील यांनी संगीताची साथ दिली.
सुफी बंधुंची प्रतिक्रिया
सांस्कृति महोत्सव व ग्रंथोत्सवात तिन्ही दिवस चंद्रपूरकरांसाठी गायन, शास्त्रीय नृत्य व संगीताचा त्रिवेणी संगम घडवून आणल्याबद्दल जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांचे सुफी बंधूंनी कौतुक केले. शासनातर्फे अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम नेहमी आयोजित करण्यात यावे, अशी अपेक्षाही  त्यांनी यावेळी व्यक्त केली.
                   विजय वाघमारे
चंद्रपूर वासियांनी तीन संगीत नृत्य मैफलीचा मनमुराद आनंद लुटावा हेच या महोत्सवातून प्रशासनाला अपेक्षित होते.  यावर्षी महोत्वाला थोडा उशीर झाला.  मात्र पुढील महोत्सव नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये घेण्याचा प्रयत्न राहील अशी प्रतीक्रिया जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी व्यक्त केली.  चंद्रपूर रसिक अतिशय सृजन असून शास्त्रीय संगीत नृत्यांची चंद्रपूरकरांना उत्तम जाण आहे म्हणूनच शास्त्रीय संगीत नृत्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.  ग्रंथोत्सवालाही भरभरुन प्रतिसाद मिळाला असून वाचकांनी 5 लाखांची ग्रंथ खरेदी केली असे वाघमारे म्हणाले.  
 जिल्हा ग्रंथोत्सवात पाच लाखाची ग्रंथ विक्री

जिल्हा ग्रंथोत्सवात पाच लाखाची ग्रंथ विक्री



ग्रंथोत्सव 2013 चा समारोप

      चंद्रपूर, दि. 25 - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,  जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथालय  चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चांदा क्लब मैदानावर आयोजित चंद्रपूर ग्रंथोत्सवातील पुस्तक प्रदर्शनात सुमारे पाच लाख रूपयांच्या  ग्रंथ विक्रीची विक्रमी उलाढाल झाली. तीन दिवसीय या प्रदर्शनात 25 स्टॉल लावण्यात आले होते.
      22, 23 व 24 मार्च या तिनही दिवशी ग्रंथोत्सवातील स्टॉलला पुस्तक प्रेमीनी मोठया प्रमाणात भेट दिली व खरेदी केली.  विशेषत: महाविद्यालयीन तरुण तरुणींनी स्टॉलला भेट देवून स्पर्धा परिक्षेची पुस्तके  विकत घेतली.  स्पर्धा परिक्षेच्या पुस्तकावर 50 टक्के सवलत देण्यात आली होती.  इतरही स्टॉलवरही 10 ते 40 टक्के सवलतीच्या दरात पुस्तके विक्री करण्यात आली.  पहिल्या दिवशी अंदाजे दिड लाख, दुस-या दिवशी दिड लाख तर समारोपाच्या दिवशी दोन लाख रुपयांचे ग्रंथ चंद्रपूर वाशियांनी विकत घेतले.  या विक्रीबद्दल स्टॉल धारकांनी समाधान व्यक्त केले असून चंद्रपूरकर ग्रंथप्रेमीचे आभार मानले.   
               प्रदर्शनात तिन्ही दिवस पुस्तक प्रदर्शनाला उत्सर्फुत प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध पुस्तकांच्या स्टॉलवर विद्यार्थी व नागरीकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन पुस्तक प्रदर्शन व विक्रीचा लाभ घेतला. या प्रदर्शनात एकूण 25 स्टॉल लावण्यात आले होते. त्यात जिल्हा ग्रंथालय, महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्यचे स्टॉल, चंद्रपूर येथील राणाज पुस्तकालय,  ज्ञानगंगा बुक्स, केसन्स बुक डेपो, नवनीत प्रकाशन, साईबाबा बुक सेलर, महालक्ष्मी बुक डेपो, लक्ष्य स्पर्धा परीक्षा केंद्र, साईन कट्टा प्रकाशन, तेजज्ञान फाऊंडेशन, ग्रंथाली गुप्ताजी (मुंबई), सुधीर प्रकाशन (वर्धा), विद्या विकास (नागपूर), पंजाब बुक सेलर (गडचिरोली), मंगेश प्रकाशन (नागपूर), मध्यम इंटरप्रायजेस (चिरोली), अरिहंत बुक्स (चिमूर), लोकवाङमय प्रकाशन (मुबंई) यासह विविध स्टॉलचा समावेश होता.
     जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी ग्रंथोत्सवातील सर्वच 25 स्टॉलला भेट देऊन विविध पुस्तकांची पाहणी केली.  पुस्तक खरेदीला वाचक प्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला असून पुढील वर्षीही ग्रंथोत्सवाचे आयोजन करून अधिक पुस्तकांचे स्टॉल ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत श्री. वाघमारे यांनी व्यक्त केले. 23 मार्च रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी.एस.डहाळकर यांनी ग्रंथ प्रदर्शनीला भेट देवून ग्रंथ खरेदी केली.  जिल्हाधिकारी वाघमारे यांनी ग्रंथ प्रदर्शनीला भेट दिली त्यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण बटकेलवार, तहसिलदार गणेश शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, नायब तहसिलदार तळपदे उपस्थित होते. 

Sunday, March 24, 2013

पत्रकारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा

पत्रकारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा


चंद्रपूर
गडचिरोली र्शमिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ६ व ७ एप्रिल २0१३ रोजी पत्रकारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत 'वृत्तलेखन - मांडणी आणि भाषा', 'जनसंपर्क- महत्त्व आणि गरज', अर्थसंकल्पाचे वेिषण पत्रकारिता आणि कायदे, तणाव व्यवस्थापन, मुद्रित शोधन आणि शुद्धलेखन या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आजच्या पत्रकारितेत शहरी आणि ग्रामीण बातम्यांचे महत्त्व आणि बदललेले स्वरूप लक्षात घेऊन त्यांचे ज्ञान अद्ययावत करण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणार्‍या या कार्यशाळेत भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली. सहभागी प्रतिनिधींची र्मयादित संख्या १00 आहे. नोंदणी शुल्क १00 रुपये ठेवण्यात आले आहे. नोंदणी ३१ मार्चपर्यंत इच्छुक पत्रकारांनी चंद्रपूर येथील र्शमिक पत्रकारसंघाच्या कार्यालयात करावी. उद््घाटन ६ एप्रिल रोजी सकाळी १0 वाजता होणार असून, समारोपीय कार्यक्रम ७ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३0 वाजता होईल. सहभागी सर्व पत्रकारांना प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे. नोंदणी करण्याचे आवाहन चंद्रपूर-गडचिरोली र्शमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष हनूगूंद, सचिव संजय तुकराम, जिल्हा महिती अधिकारी रवी गिते यांनी केले आहे.
काव्यशिल्प: सर्वसामान्यांचे दुःख एकवटून भविष्याचे

काव्यशिल्प: सर्वसामान्यांचे दुःख एकवटून भविष्याचे

काव्यशिल्प: सर्वसामान्यांचे दुःख एकवटून भविष्याचे:  प्रतिनिधीत्व करण्याचे सामर्थ्य कवितेत... कवी अजिम नवाज राही    चंद्रपूर ग्रंथोत्सव 2013 च्या कवी संमेलनात मोठ्या संख्येने नागरीकांची उप...
सर्वसामान्यांचे दुःख एकवटून भविष्याचे

सर्वसामान्यांचे दुःख एकवटून भविष्याचे


 प्रतिनिधीत्व करण्याचे सामर्थ्य कवितेत...
कवी अजिम नवाज राही
   चंद्रपूर ग्रंथोत्सव 2013 च्या कवी संमेलनात मोठ्या संख्येने नागरीकांची उपस्थिती

चंद्रपूर, दि.23 - अक्षरांच्या सागर बोटांचा खेळ नसून दुःखांचा खडकाळ प्रवास करणारी कविता आहे. सर्वसामान्यांचे दुःख एकवटून भविष्याचे प्रतिनिधीत्व करण्याचे सामर्थ्य कवितेत आहे. कविता आतून येते तेव्हा तीचा संबंध हृदयाच्या पाझराशी असतो अशी कविता माणसाला जगण्याच बळ देऊन जाते  असे प्रतिपादन सुप्रसिध्द कवी अजिम नवाज राही यांनी आज येथे केले.
चंद्रपूर ग्रंथोत्सव 2013 निमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथालय विभागातर्फे डॉ. शामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आयोजित केलेल्या कवि संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी कवी प्रा. श्रीपाद प्रभाकर जोशी होते. याप्रसंगी माजी आमदार एकनाथराव साळवे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, जिल्हा कोषागार अधिकारी श्री. वाघमारे जिल्हा ग्रंथालय अधिकारी आर.जी. कोरे, विदर्भ साहित्य संघ गोंडवण, शाखा चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. शरद सालफळे, चंद्रपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह अनिल बोरगमवार, वृत्त निवेदिका संध्या दानव आदी  प्रामुख्याने उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यात वाङमयीन चळवळ वाढण्यास सुरूवात झाली असल्याचे सांगत श्री. राही म्हणाले की, लेखकांना निर्माण केलेल्या कथा, कादंब-या, कविता काळजापर्यंत पोहचल्या तरच वास्तविकचे दर्शन घडते. तेव्हाच लेखकाला आत्मविश्वाची झळाली प्राप्त होते. कादंब-या कथांचा परिचय सजग झाल्यावर होतो, मात्र कवितेचा परिचय अगदी बालपणापासून होत असतो. त्यामुळेच यंत्र युगातही कवितेचे महत्वह कमी झालेले नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
अनेक कवी मुक्त छंदाच्या नावावर भाषेची उधळपट्टी करून जीवनानुभवाचा बोध न ठेवता कवितेची गळचेपी करीत असतात. कविता लिखान करताना रचनात्मक दृष्ट्या परिश्रम घेणा-यांचे साहित्य काळजापर्यंत पोहचत असते. तुकोबारायांचे अभंग इंद्रायणी नदीत टाकल्यावर पाण्यावर तरंगताना दिसून आले असे म्हणतात. पण ते तसे नसून हे अभंग लोकांच्या काळजापर्यंत पोहचल्यामुळे पुस्तकी रूपात उदयास आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. साहित्याची निष्ठावंत भक्ती असेल, तरच कवितेचे दान पदरी मिळते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात श्री. जोशी म्हणाले, कवि कोणत्याही एका समाजाचा नसून सुख-दुःख सामर्थ्याने समाजापुढे ठेवणारा दुत आहे. कवी ही एक संस्था असून मानवी जिवनातील अनुभव कवितेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रशांत मडपुवार, प्रा. विद्याधर बनसोड, प्रा. रविकांत वरारकर, पद्मरेखा धनकर-वानखेडे, वर्षा चौबे, संगीता पिज्दुरकर, रंगनाथ रायपुरे, ना. गो. थुटे, तनुजा बोढाले, संगीता धोटे, मिलींद बोरकर, इरफान शेख, शिवशंकर घोगुल, भानुदास पोपटे, सीमा भसारकर, मोरेश्वर पेंदाम यांनी आपल्या कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. संचालन इरफान शेख यांनी केले. तर आभार आर.जी. कोरे यांनी मानले. संमेलनात मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.
नृत्य पदन्यासाने रसिकांचे भारत दर्शन

नृत्य पदन्यासाने रसिकांचे भारत दर्शन


पार्वती दत्तांच्या नृत्याची चंद्रपूरकरांना मोहिनी
            
चंद्रपूर, दि. 24 - वेळ संध्याकाळची......चांदा क्लब मैदानावर रसिकांची चिक्कार गर्दी.....उभारलेल्या भव्य मंचावर सप्तरंगांचा पडलेला प्रकाश...... अशा या भारवलेल्या वातावरणात सुप्रसिध्द शास्त्रीय नृत्यांगणा पार्वती दत्ता यांनी मंचावर आगमन करून पदन्यास, अंग-प्रत्यंग व भावमुद्रेच्या सहाय्याने सुर, ताल व लय यांचा सुरेख मेळ घालून रसिकांना आपल्या शास्त्रीय नृत्याने भुरळ घातली. शास्त्रीय नृत्यातील सप्त प्रकारांनी संगीताच्या तालावर पदन्यास करून रसिकांना भारत दर्शन घडविले. निमित्त होते सांस्कृतिक व ग्रंथोत्सव महोत्सवाचे....
सुप्रसिध्द शास्त्रीय नृत्यांगणा पार्वती दत्ता यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य परंपरेवर आधारीत विविध प्रकारचे नृत्य आविष्कार सादर करून चंद्रपूरकरांना मोहित केले. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांनीही टाळ्यांचा जोरदार गजर करून या नृत्य आविष्काराला मनमुराद दाद दिली.   
सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चांदा क्लब मैदानावर आयोजित केलेल्या तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव व ग्रंथोत्सवात सुप्रसिध्द शास्त्रीय नृत्यांगणा पार्वती दत्ता यांनी आपल्या नृत्याचा आविष्कार सादर केला. याप्रसंगी जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी पार्वती दत्ता यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपविभागीय अधिकारी आशितोष सलील, अहेरीचे उपविभागीय अधिकारी उदयसिंग चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी पी.डी. बडकेलवार, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
मंचावर येताच पार्वती दत्ता यांनी नृत्य ही एक साधना असल्याचे सांगून शास्त्रीय नृत्याविषयीचे महत्व रसिकांना पटवून दिले. त्यानंतर त्यांनी मंगलाचरणाने नृत्याचा आरंभ केला. जगन्नाथ अष्टकम, मोहिनी अट्टम या प्रकारातील शास्त्रीय नृत्य सादर करून अभिवादन केले. त्यानंतर सन्निधी या सात पवित्र नंद्यांवर आधारीत शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण करून रसिकांना भारत दर्शनाच्या भावविश्वात नेले. सरस्वती नदीवर आधारीत कथ्थक, नर्मदा नदीवर आधारीत मोहनी अट्टम, कावेरी नदीवर आधारीत भरतनाट्यम, सिंधु नदीवर आधारीत कथ्थकअली, गोदावरी नदीवर आधारीत कुचिपुडी, यमुना नदीवर आधारीत मणिपुरी, गंगा नदीवर आधारीत ओडीसी या शास्त्रीय नृत्यातील सात नृत्य प्रकारांचा अविष्कार सादर केला. पार्वती दत्ता यांच्या शिष्या श्रीलक्ष्मी यांनी आंध्रप्रदेशातील कुचिपुडी

नृत्य पदन्यासाने रसिकांचे भारत दर्शन या प्रकारातील भामा कलापंप, संजीब भट्टाचार्य यांनी श्रीकृष्ण नृत्य वर्णनावर आधारीत रास लीला हे मणिपुरी नृत्य सादर केले. गण्णमी गोसावी यांनी उत्तर भारताच्या कला प्रकारावर आधारीत होरी हे कथ्थक नृत्य सादर केले. आनंद सच्चिदानंदन यांनी दक्षिण भारतातील कलांवर आधारीत तिल्लाना हे भरतनाट्यम नृत्य सादर करून रसिकांनी नृत्याची मोहीनी घातली. यावेळी रसिकांनीही विविध नृत्य प्रकाराला टाळ्यांचा गजर करून भरभरून दाद दिली.
चंद्रपूरातील स्थानिक कलाकार सौ. भाग्यलक्ष्मी देशकर व त्यांच्या वरिष्ठ विद्यार्थीनी कु. सुविधा कुळकर्णी, कु. त्रिशिला निमगडे व कु पौर्णिमा जोशी यांनी कथ्थक नृत्यातील नृत्य पक्ष सादर केला. मृणालिनी खाडीकर व समुहाने पाश्चिमात्य संगीतावर आधारीत घिरघिर बदरा नटराज स्तुती हे शास्त्रीय नृत्य सादर करून रसिकांची दाद मिळविली. सागर अंदनकर यांच्या चिमुकल्या नृत्य समुहाने गायत्री मंत्र हे भरतनाट्यम नृत्य सादर केले. कथ्थक साधना केंद्राचे भाग्यलक्ष्मी देशकर व समुहाने उत्तर भारतातीत नृत्य सादर केले. सागर अंदनकर व समुहाने रामायणावर आधारीत भरतनाट्यम नृत्य सादर करून रसिकांना मोहित केले. कार्यक्रमाचे निवेदन प्रशांत आर्वे व प्रा. सौ. जयश्री कापसे गावंडे यांनी केले. ध्वनी संदीप बारस्कर यांचे, तर प्रकाश योजना श्री. संदीप, नागपूर यांची होती. तांत्रिक सहाय्य हेमंत गुहे, श्री. टिंकु यांनी केले. या कार्यक्रमात चंद्रपूरकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
पार्वती दत्ता यांची प्रतिक्रिया
चंद्रपूर सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने सुजान रसिकांना भेटण्याचा आनंद अवर्णनिय असल्याची प्रतिक्रिया शास्त्रीय नृत्यांगणा पार्वती दत्ता यांनी व्यक्त केली. विदर्भातील आपला पहिलाच कार्यक्रम असून चंद्रपूर रसिकांच्या उत्सफुर्त प्रतिसादामुळे भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले. 

Saturday, March 23, 2013

हरिहरन यांच्या सुरेल गायनाने चंद्रपूरकर मंत्रमुग्ध

हरिहरन यांच्या सुरेल गायनाने चंद्रपूरकर मंत्रमुग्ध



बहारदार गाण्यांच्या सप्तसुरात रसिक चिंब भिजले
गाण्यांना वन्स मोर ची हाक.....रसिकांनी दिली भरभरून दाद....
चंद्रपूर दि.२३ : पधारो म्हारे देश.....नगमे है शिकवे है किस्से है बाते है....चंदा रे चंदा रे कभी तो जमी पे आ......पत्ता पत्ता बुटा बुटा..., मेरे पास है तु..., चप्पा चप्पा चरखा चले...अशा एकाहून एक विविध बहारदार गाण्यांचा नजराना सुप्रसिध्द पाश्र्वगायक हरिहर यांनी सादर करून चंद्रपूरकरांना मंत्रमुग्ध केले. हरिहरन यांच्या गायनाच्या सप्तसुरात रसिक चिंब भिजले. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांनी गाण्यांचा आस्वाद घेऊन टाळ्यांचा जोरदार गजर केला. वन्स मोर ची हाक देऊन विविध गीतांना भरभरून दाद दिली. चंद्रपूरकरांना या संगीत मैफीलीता योग आला तो सांस्कृतिक तथा ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने.
सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चांदा क्लब मैदानावर आयोजित केलेल्या तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव व ग्रंथोत्सवाचे उदघाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी विजय वाघमारे, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, पोलिस अधिक्षक राजीव जैन, मनपा आयुक्त प्रकाश बोखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी.एच. डहाळकर, गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी आशितोष सलील, अहेरीचे उपविभागीय अधिकारी दयासिंग चौधरी, गडचिरोली येथील परिविक्षाधीन भारतीय प्रशासन सेवेचे अधिकारी आस्तिककुमार पांडे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
उदघाटनानंतर लगेच हरिहरन यांच्या गायनाला सुरूवात झाली. मंचावर येताच हरिहरन यांनी पधारो म्हारे देश...... हे गीत सादर करून चंद्रपूरकरांचे मन जिंकले. रसिकांनीही टाळ्यांचा जोरदार गजर करून गीताला उत्तम प्रतिसाद दिला. हरिहरन यांनी कस काय चंद्रपूर असा मराठी भाषेत संवाद साधून चंद्रपूरकर रसिकांचे मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल कौतुक केले. यानंतर हरिहरन यांनी नगमे है शिकवे है किस्से है बाते हे.....हे गीत सादर करून सप्तसुरांच्या मैफिलीला संगीतमय रंग दिला. त्यानंतर दम दारा दम दारा दम दम....हे गीत सादर केले. चंदा रे चंदा रे कभी तो जमी पे आ.... या गीताला सुरूवात करून संगीत मैफीलीचा साक्षीदार असलेल्या चंदाला तु पण जमीनीवर येऊन रसिकांचे प्रेम घे, असे आवाहन केले. त्यानंतर बाहो के दरमिया दो प्यार मिल रहे है...., दमा दम मस्त कलंदर, मोहे अपने रंग मे रंग...., पत्ता पत्ता बुटा बुटा...., मेरे पास है तु..., छय छप छय छप्पाक छय.. हे गीत नृत्याच्या तालावर सादर केले. डोल डोलतोय वा-यावर बाई माझे...., लागी रे लागी लगन......, हम तुमसे ना कुछ कह पाये...., झोका हवा का आजभी...चप्पा चप्पा चरखा चले... अशी एकाहून एक बहारदार गीते विविध सप्तसुरात सादर केली. विविध गीतांच्या अप्रतिम लयात रसिकांना डोलायला भाग पाडले. रसिकांनी विविध गीतांना वन्स मोर ची हाक देऊन टाळ्यांचा गजर करून उत्तम दाद दिली. हरिहरन यांची गझल व मराठी गीतांनी रसिकांनी संगीताची भुरळ घातली.
हरिहरन यांनी काश ऐसा कोई मंजर होता....मेरे कांधे पे तेरा सर होता....जमा करता हु मै आये हुये संग...सर छुपाने के लिए तेरा सर होता... इस बुलंदी पे बहुत तनहा हू...काश मै सबके बराबर होता.....ही गझल सादर करून रसिकांना काही काळ भावनिक विश्वात नेले. 
जगात शांतीचा संदेश देणारे गीत हे बुध्दा की वाणी......सादर करून जगाला शांतीचा संदेश दिला. तुही रे तुही रे....या गीताने संगीत मैफीलीची समाप्ती झाली. हरिहरन यांनी कार्यक्रमाच्या पहिल्या गीता पासून ते शेवटच्या गीता पर्यंत रसिकांना त्यांच्या आसनावर बसवून ठेवले. मैदानावर हजारोंच्या संख्येने रसिकांनी हजेरी लावून हरिहरन यांच्या विविध गीतांचा आस्वाद घेतला.
हरिहरन यांचा मुलगा अक्षय हरिहरन, सोबतच्या गायिका लावण्या, चांद राही व इतर गायकांनी हरिहरन यांना उत्तम साथ दिली. बासरी वादन व तबला वादनाच्या जुगलबंदीमुळे चंद्रपूरकरांच्या मनात संगीताची भुरळ निर्माण झाली. कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण बडकेलवार, तहसिलदार गणेश शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मैदानावर मोठ्या संख्येने रसिकांनी हजेरी लावली होती.
  ग्रंथोत्सवात आज निमंत्रितांचे कवी संमेलन

ग्रंथोत्सवात आज निमंत्रितांचे कवी संमेलन



प्रसिध्द कवी अजीम नवाज राही यांची उपस्थिती
चंद्रपूर दि.२३ :
 महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथोलय यांच्या वतीने सुरु असलेल्या तीन दिवशीय सांस्कृतिक तथा ग्रंथोत्सवात रविवार २४ मार्च २०१३ रोजी सकाळी १०.३० वाजता डॉ शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित केले आहे.  या कवी संमेलनात प्रसिध्द कवी व निवेदनकार अजीम नवाज राही यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून श्रीपाद प्रभाकर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हे कवी संमेलन होणार आहे. 
रंगनाथ रायपूरे, नीता कांतमवार, मिलींद बोरकर, शिवशंकर घुगुल, भानुदास पोपटे, ना.गो.थुटे, रविकांत वरडाकर, तनुजा बोडाले, संगीता पिज्दुरकर, संगीता धोटे, प्रशांत मडपूवार, डॉ.विद्याधर बनसोड, डॉ.पद्मरेखा धनकर-वानखेडे हे कवी संमेलनात सहभागी होणार आहेत.  या कवि संमेलनाचे संचालन ईरफान शेख करणार आहेत.  निमंत्रितांच्या कवी संमेलनास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव समिती च्या वतीने करण्यात आले आहे.



वाचनाची आवड व सवय संस्कृती संवर्धनासाठी उपयुक्त : डॉ. शरद सालफळे
चंद्रपूर ग्रंथोत्सव २०१३ च्या परिसंवादात मोठ्या संख्येने नागरीकांची उपस्थिती
चंद्रपूर दि.२३ : सध्याच्या तांत्रिक युगात टिव्ही व संगणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे, तरीसुध्दा वाचनाचे महत्व कुठेही कमी झालेले दिसून येत नाही. त्यामुळे आजही वाचन संस्कृती जिवंत आहे. वाचनाची आवड आणि सवय संस्कृती संवर्धनासाठी उपयुक्त आहे, असे प्रतिपादन  विदर्भ साहित्य संघ गोंडवण, शाखा चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. शरद सालफळे यांनी आज येथे केले.
चंद्रपूर ग्रंथोत्सव २०१३ निमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथालय विभागातर्फे डॉ. शामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात वाचन संस्कृती आणि आपण या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादाचे उदघाटन उपविभागीय अधिकारी आशुतोष सलील (भाप्रसे) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. 
व्यासपीठावर प्राध्यापिका सविता भट, चंद्रपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह अनिल बोरगमवार, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, ग्रंथपाल आर.जी. कोरे, लेखा परिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक औदारे, श्री. यादव, मुरली मनोहर व्यास प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. सातफळे म्हणाले, टिव्ही संस्कृतीचे विषारी मुळे वाचन संस्कृती संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. सध्याच्या युगात विविध तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असला तरी वाचनावर कोणताही दुष्परिणाम झालेला नाही. उलट वाचनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे अनेक जुन्या काळात लिहलेली पुस्तके आजही खरेदी केली जात आहेत. वाचनालय व ग्रंथालय हे विद्येचे मंदिर आहे. नवीन पिढीमध्ये वाचनाची आवड आणि सवय निर्माण झाल्यास वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी अधिक उपयुक्त ठरेल, असे मत त्यांनी यावेळी मांडले.
सविता भट म्हणाल्या, माणसाच्या बुध्दीचा विकास वाचन, लेखन व विचारामुळे होत असतो.  सध्याच्या युगात यंत्रांनी संपुर्ण जागा व्यापली आहे. मात्र वाचन कुठेही बदललेले नाही. केवळ वाचनाचा प्रकार बदलत जाईल. भविष्यात ऑडीयो, व्हीडीओ किंवा संगणाकाद्वारे वाचन केल्या जाणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
वाचनामुळे माणसाचा सांस्कृतिक व गुणात्मक विकास होतो. बरेचदा मोठ्या प्रमाणावर वाचन केले जाते, मात्र वाचन किती करतो, त्यापेक्षा वाचन काय करतो, याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वाचनामुळे आकलन व कल्पना शक्ती वाढीला लागते. कल्पना शक्तीच्या आधारे लेखन विकसीत होतो. वाचनातून लेखनाला गती देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. बोरगमवार म्हणाले, वाचनाच्या छंदामुळे आयुष्याला नवी दिशा मिळते. वाचनाची चळवळ वाढविण्याची गरज आहे. केवळ सरकारी पातळीवर नव्हे, तर लोकांच्या पातळीवरही या चळवळीला गती देण्याची गरज आहे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक खेड्यात वाचनालय निर्माण करण्याची गरज आहे. संचालन व आभार प्रदर्शन संध्या दानव यांनी केले. परिसंवादात मोठ्या प्रमाणावर नागरीक व विद्यार्थी उपस्थित होते. 

Friday, March 22, 2013

शिक्षकाच्या आत्महत्येनंतर तणाव

शिक्षकाच्या आत्महत्येनंतर तणाव

अकोला दि. २२:
वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत एका शिक्षकाने गळफास घेवून आत्महत्या केल्यानंतर अकोल्यात तणाव निर्माण झाला आहे. मृत्युपूर्वी लिहून ठेवलेल्या एका चिठ्ठीत या शिक्षकाने आपल्याला जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिका?्यांसह काही अधिकारी मानसिक त्रास देत होते , असे नमूद केले आहे.
दरम्यान शिक्षकाच्या पार्थिवासह त्याच्या नातेवाईक व अन्य शिक्षकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेत ठाण मांडले. चिठ्ठीत ज्या अधिका?्यांची नावे नमूद आहेत , त्यांना जोवर अटक होत नाही , तोवर मृतदेह उचलणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.
ग्रंथोत्सवात सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध

ग्रंथोत्सवात सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध


तीन दिवस चालणार प्रदर्शन, नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन

      चंद्रपूर, दि. 22 - सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर व जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चांदा क्लब मैदानावर आयोजित केलेल्या चंद्रपूर सांस्कृतिक महोत्सव तथा ग्रंथोत्सवात विविध ग्रंथांचा खजिना ठेवण्यात आला आहे. तीन दिवस चालणा-या या प्रदर्शनात 25 स्टॉल लावण्यात आले असून विविध प्रकारची पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध ठेवण्यात आली आहे. नागरीकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन पुस्तक प्रदर्शन व विक्रीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यांनी केले आहे.
               प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ग्रंथोत्सवाला उत्सर्फुत प्रतिसाद प्राप्त झाला असून सकाळपासूनच विविध पुस्तकांच्या स्टॉलवर विद्यार्थी व नागरीकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन पुस्तक प्रदर्शन व विक्रीचा लाभ घेतला. हे प्रदर्शन 24 मार्च पर्यंत चालणार आहे. या प्रदर्शनात एकूण 25 स्टॉल लावण्यात आले आहेत. त्यात जिल्हा ग्रंथालय, महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्यचे स्टॉल, चंद्रपूर येथील राणाज पुस्तकालय,  ज्ञानगंगा बुक्स, केसन्स बुक डेपो, नवनीत प्रकाशन, साईबाबा बुक सेलर, महालक्ष्मी बुक डेपो, लक्ष्य स्पर्धा परीक्षा केंद्र, साईन कट्टा प्रकाशन, तेजज्ञान फाऊंडेशन, ग्रंथाली गुप्ताजी (मुंबई), सुधीर प्रकाशन (वर्धा), विद्या विकास (नागपूर), पंजाब बुक सेलर (गडचिरोली), मंगेश प्रकाशन (नागपूर), मध्यम इंटरप्रायजेस (चिरोली), अरिहंत बुक्स (चिमूर), लोकवाङमय प्रकाशन (मुबंई) यासह विविध स्टॉलचा समावेश आहे.
       या स्टॉलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत शुद्र पुर्वी कोण होते ?, डॉ. आबंडेकरांचे बुध्द धर्मावर व्याख्याने, नागवंशीय इतिहास, धम्मपद, आदिवासी समाज आणि आंबेडकरी क्रांती आणि प्रतिक्रांती, अंधश्रध्दा बुवाबाजी, माहितीचा अधिकारी, जातक कथा संग्रह, महात्मा ज्योतिबा फुले लिखीत गुलामगिरी व शेतक-याचा आसुड, गोंडी संस्कृतीचे संदर्भ, जातीभेद निर्मुलन, बिरसा मुंडा, पुणे करार, आंबेडकरी सत्याग्रह, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवडक भाषणे, बलुत, विचारवेध, विज्ञानाचे तत्वज्ञान, सदरक्षणालय खलनिग्रणालय, भटक्यांचा भारूड, महाराष्ट्राचा लेखाजोखा, उपरा, भाषावार प्रांतरचना, भारतीय कलेचा इतिहास, संत गाडगेबाबा, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले व आजचे स्त्री वास्तव्य, भारतीय नारी, आपले नेहरू, गोंडवाना सांस्कृतिक इतिहास, जिवनात यशस्वी कसे व्हावे, लोकराजा शाहू महाराज व्यक्तित्व आणि विचार, भारताचे संविधान यासह विविध पुस्तके मोठ्या प्रमाणावर स्टॉलवर उपलब्ध आहेत. यातील अनेक स्टॉलवर 10 ते 40 टक्के सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध आहेत. स्पर्धा परीक्षांची पुस्तकेही 20 ते 50 टक्के सवलतीच्या दरात आहेत. तीन दिवस चालणा-या या प्रदर्शनाला नागरीक व वाचकप्रेमींनी आवर्जुन भेट देऊन पुस्तक प्रदर्शन व विक्रीचा लाभ घ्यावा. 

केवळ 100 रूपयांमध्ये वर्षभर लोकराज्य

       महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य या मासिकाचे स्टॉल चांदा क्लब मैदानात आयोजित चंद्रपूर सांस्कृतिक महोत्सव व ग्रंथोत्सवात लावण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांच्या माहितीची प्रसिध्दी लोकराज्य या मासिकात निरंतर प्रकाशित केली जाते. देशात सर्वाधिक खपाचे असलेले हे मासिक केवळ 100 रूपयांमध्ये वर्षभर (12 महिने) उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लोकराज्य या मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी, तसेच नाव नोंदविण्यासाठी ग्रंथोत्सवातील स्टॉल किंवा जिल्हा माहिती कार्यालय, प्रशासकीय भवन, चंद्रपूर, दुरध्वनी क्रमांक 252515 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  

Thursday, March 21, 2013

बंदुकीची गोळी सुटली

बंदुकीची गोळी सुटली

वरोरा येथील पोलिस ठाण्यात पोलिस शिपायाच्या हातून बंदुकीची गोळी सुटली….दुसरा पोलिस शिपाई जखमी…। सकाळी सात वाजताची घटना … चंद्रपूरात भरती 

Wednesday, March 20, 2013

 महसूल मंत्र्यांच्या हस्ते नरेश पुगलीया यांच्या उपोषणाची सांगता

महसूल मंत्र्यांच्या हस्ते नरेश पुगलीया यांच्या उपोषणाची सांगता

 चंद्रपूर दि.२०- विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसापासून सुरु असलेले माजी खासदार नरेश पुगलीया यांनी उपोषण महसुल मंत्री बाळासाहेब थोरात व रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत यांचे हस्ते निंबू पाणी पिऊन उपोषण सोडले. यावेळी माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार, आमदार नामदेव उसेंडी, महापौर संगीता अमृतकर, जिल्हाधिकारी विजय वाघमारे, उपविभागीय अधिकारी आशुतोष सलील व  मनपा आयुक्त प्रकाश बोखड उपस्थित होते.
     मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुचनेवरुन आपण आलो असून नरेश पुगलीया यांच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री चव्हाण यांचे सोबत लवकरच एक बैठक घेण्यात येईल असे बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.  ज्या मागण्या आपल्या विभागाशी संबंधीत आहेत.  त्या संदर्भात सुध्दा एक बैठक घेण्यात येईल असे थोरात म्हणाले.   पुगलीया यांच्या मागण्या जनहिताच्या असून त्या संदर्भात शासन गंभीर असल्याचे रोहयो मंत्री नितीन राऊत यांनी यावेळी सांगितले.  माजी खासदार नरेश पुगलीया यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन बाळासाहेब थोरात यांना दिले.  मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेशी करावी व त्या पूर्ण कराव्यात अशी विनंतीही त्यांनी थोरात यांना केली.  त्यानंतर बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांचे हस्ते निंबू पाणी घेऊन पुगलीया यांनी आपले सात दिवसाचे उपोषण संपविले.

Tuesday, March 19, 2013

बस कोसळून 27 प्रवासी मृत्युमुखी

बस कोसळून 27 प्रवासी मृत्युमुखी

रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेडजवळ असलेल्या जगबुडी नदीत आज (मंगळवार) पहाटे खासगी बस कोसळून 27 प्रवासी मृत्युमुखी पडले. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघे अत्यवस्थ आहेत.
आज पहाटे 3.30 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. महाकाली ट्रॅव्हल्स कंपनीची बस गोव्याहून मुंबईकडे जात होती. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस जगबुडी नदीवरील पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात कोसळली. त्यामुळे 27 जण मृत्युमुखी पडले. अपघात झाल्यानंतर लगेच बचावकार्य सुरू करण्यात आले. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत 26 मृतदेह नदीपात्राबाहेर काढण्यात आले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचे समजते.

मृतांची नावे                                 

1. मिर्झा बेग - मुंबई

2. गुरूदत्त माने - अंधेरी

3. संतोष राठोड - पोलादपूर

4. फिलिंका फर्नांडिस - गोवा

5. मिथुन पेडणेकर - सावंतवाडी

6. रविंद्र सावंत - अंधेरी

7. वीरेंद्र यादव - दिवा

8. प्रकाश तळवटेकर - तरळा

9. प्रकाश पवार - गोवा

10. इस्तावेन फर्नांडिस - गोवा

11. सेविनवेती फर्नांडिस - सांताक्रुझ 

12. बाप्टीस फर्नांडिस - विलेपार्ले

13. रामबहाद्दुर गुप्ता - ग्रॅण्टरोड

14. बाप्टीस फर्नांडिस - कणकवली

15. अफोदे डिसुझा - गोवा

16. शैलेंद्र हळदणकर - अकोला

17. पॅड्रीक मिंडिस - गोवा 

जखमींची नावे                   

1. संताजी किरदत्त - सातारा

2. शिवराम गारूडी - गोवा

3. शिवराम धानगी - कणकवली

4. वशिष्ठ खोणी - नवी मुंबई

5. आलम शेख - वांद्रे

6. लालू रोहिदास - गोरापूर 

7. मारिया कॉस्टन - रशिया

8. सारिका सरमळकर - नेरूळ 

9. कामरूद्दीन शेख - वांद्रे 

10. मैरूद्दीन मलिक - केरापूर 

11. जयराम सरमळकर - नेरूळ 

12. ऑल्विन फर्नांडिस - गोवा

13. मोरेश पडसेकर - गोवा

14. महेश मयेकर - रत्नागिरी