चंद्रपूर, दि.7 जानेवारी – राष्ट्रीय शैक्षणिक योजना तथा प्रशासन संस्था नवी दिल्ली तर्फे संपूर्ण देशभरातून उत्कृष्ठ शैक्षणिक व प्रशासकीय कार्य करणा-या शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना राष्ट्रीय सन्मान देऊन गौरव करण्यात आले.
चंद्रपूर जिल्हयामध्ये शैक्षणिक क्षेत्रात ज्यांनी भरीव कामगीरी करुन संपूर्ण चंद्रपूर जिल्हयातील माध्यमिक शाळा शंभर टक्के डिजीटल करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, असे कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय वसंतराव डोर्लीकर हे सन 2017-18 चे राष्ट्रीय सन्मानाचे मानकरी ठरले.
चंद्रपूर जिल्हयातील माध्यमिक शाळा नोव्हेंबर 2017 मध्ये शंभर टक्के डिजीटल झाल्या. या कार्यात चंद्रपूर जिल्हयाचे तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, तत्कालीन उपसंचालक अनिल पारधी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांचे सहकार्य मिळाले. या कार्यासोबत चंद्रपूर जिल्हयात बरेच विद्यार्थी शाळा बाहय असल्याचे निदर्शनास आहे. याचा शोध घेण्यासाठी शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांनी एक नवीन उपक्रम सुरु केला. प्रत्येक शाळेत शाळा बाहय विद्यार्थी दाखवा व मुख्याध्यापक यांचेकडून एक हजार रुपये मिळवा. अशा प्रकारचे बोर्ड लावण्यात आले. त्यामुळे शाळा बाहय मुलांची संख्या कमी झाली.
या विधायक कार्याबद्दल शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांना 4 जानेवारी 2019 रोजी निपा नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री ना.प्रकाश जावळेकर तसेच केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री ना.सत्यपालन सिंग यांचे शुभहस्ते राष्ट्रीय सन्मान देऊन गौरविण्यात आले. या सन्मान सोहळयात देशभरातून 49 अधिका-यांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातून संजय डोर्लीकर यांचा समावेश होता.
तसेच शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांना यापूर्वी सुध्दा उत्कृष्ठ कार्याबद्दल शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनतर्फे तत्कालीन मुख्य सचिव सुमित मल्लीक यांचे हस्ते गौरविण्यात आले होते.