मुंबई, दि. 7 : पीएम नरेंद्र मोदी चित्रपट युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. या चित्रपटातून राजयोगी व्यक्त्तित्वाच्या आणि वैश्विक नेत्याचे जीवन जगासमोर येणार आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.
लिजंड ग्लोबल स्टुडिओ प्रस्तृत पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाच्या ग्रॅण्ड पोस्टरचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते गरवारे क्लब हाऊस वानखेडे स्टेडियम येथे आयोजित कार्यक्रमात झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते व ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय, संदिप सिंग, चित्रपटात मुख्य भुमिका साकारणारे अभिनेता विवेक ओबेरॉय आणि दिग्दर्शक ओमंग कुमार उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेले, हे ग्रॅण्ड पोस्टर एकाच वेळी तेवीस भाषांत प्रदर्शित होणार आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, भारताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रुपाने या युगातील वैश्विक असे नेतृत्त्व जगाला दिले आहे. त्यांच्याकडे आकांक्षा पूर्ण करणारे नेतृत्त्व म्हणून जनता मोठ्या आशेने पाहते आहे. त्यामुळे असा चित्रपट बनविणे हा सुद्धा एक मोठा विचार आहे. या चित्रपटासाठी एक चांगली टीम तयार झाली आहे. ज्यामुळे एक प्रेरक चित्रट निर्माण होईल. कारण भारतातील युवा पिढीकडे मोठी क्षमता आहे. पण त्यांना गरज आहे,ती अशा प्रेरक जीवन दर्शनाची. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरिबीतून येऊन अगदी चहा विक्रेता, संन्यस्त आणि संघटन कुशलता ते राजकीय व्यासपीठ आणि प्रधानमंत्री पद अशा वाटचातीलून युवा पिढीसमोर आदर्श ठेवला आहे. त्या अर्थाने ते राजयोगी आहेत. त्यांच्यामध्ये राजा आणि योगीत्व असा संयोग आहे. त्यामुळेच या चित्रपटाच्या माध्यमातून युवा पिढीला मोठी प्रेरणा मिळेल.
याप्रसंगी निर्माता सुरेश ओबेरॅाय तसेच दिग्दर्शक ओमंग कुमार, अभिनेता विवेक ओबेरॅाय यांनी, हा चित्रपट म्हणजे एक मोठे आव्हान तसेच मोठी संधी असल्याचे सांगितले. विद्यमान प्रधानमंत्री असलेल्या नेतृत्त्वाबाबत, त्यांच्या कारकिर्दीतच चित्रपट साकारण्याची ही अभूतपूर्व संधी असल्याचे, त्यांनी नमूद केले.