नागपूर- नंदनवनच्या केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी मोनिका किरणापुरे हत्याकांड खटल्याचा बहुप्रतीक्षित निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. डब्लू. चांदवानी यांच्या न्यायालयाने सहा पैकी चार आरोपींना न्यालायालयाने दोषी मानले आहे. मोनिका किरणापुरेच्या चारही मारेकऱ्यांना जन्मठेप सुनावली.
न्यायालयाने कुणाल अनिल जयस्वाल, प्रदीप महादेव सहारे, श्रीकांत सारकर, उमेश मराठे या चौघांनाही दोषी ठरवले असून रामेश्वर सोनेकर आणि गीता मालधुरे यांना निर्दोष ठरवले आहे. दरम्यान या सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अश मागणी मोनिकाच्या आई-वडिलांनी केली आहे. या खटल्यात एकूण ३१ साक्षीदार तपासण्यात आले.
नंदनवनच्या केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असणा-या मोनिकाची ११ मार्च २०११ हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेला कुणाल जयस्वाल सावरगावचा रहिवासी असून घटनेच्या वेळी तो काटोलच्या सेंट पॉल हायस्कूलचा शिक्षक होता. कुणालचे केडीकेमध्ये शिकणाऱ्या आणि नंदनवनच्याच वसतिगृहात राहणाऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये बेबनाव निर्माण झाल्याने कुणाल हा आपला मित्र प्रदीप महादेव सहारे याला सोबत घेऊन २२ फेब्रुवारी २०११ रोजी केडीके कॉलेज येथे प्रेयसीला समजावण्यासाठी गेला होता. दोघे समोरासमोर येऊनही ती काहीही न बोलता निघून गेली होती. त्यामुळे चिडून कुणालने आपल्या प्रेयसीला कायमचे संपविण्याचे ठरवले होते. याच वसतिगृहात राहणारी अन्य एक मुलगी कुणालच्या ओळखीची होती. दोघीही एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी होत्या. मात्र ती कुणालच्या प्रेयसीच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून कुणालला मोबाईलवर कळवायची. दरम्यान कुणालने आपला मित्र प्रदीप याची माहिती देणाऱ्या मैत्रिणीसोबत ओळख करून दिली होती.
कुणालने प्रदीपला भाडोत्री गुंडांकडून आपल्या या प्रेयसीचा खून करण्यास सांगितले होते. मोमीनपुऱ्याच्या एका हॉटेलमध्ये खुनाचा कट रचण्यात आला होता. खुनासाठी एक लाखाची सुपारी देऊ करण्यात आली होती.
प्रत्यक्ष खुनाच्या एक दिवसाअगोदर कुणाल आणि प्रदीप हे नंदनवन येथील वसतिगृहानजीकच्या एका कॅफेत थांबले होते. मारेकऱ्यांना कुणालच्या प्रेयसीला तिच्याच मैत्रिणीच्या मार्फत दाखवण्यात आले होते.
घटनेच्या दिवशी कुणालची प्रेयसी वसतिगृहातून बाहेर पडल्याची माहिती तिच्या मैत्रिणीने कुणालला दिली. लागलीच मारेकऱ्यांनी मोटरसायकलींनी पाठलाग सुरू केला होता. ती कुणालची प्रेयसी नव्हती तर तिच्यासारखी दिसणारी निष्पाप मोनिका किरणापुरे होती. कॉलेजचा गणवेश घालून आणि स्कार्फने चेहरा झाकून होती. तिच्यावर तीक्ष्ण व धारदार शस्त्रांचे दहा घाव घालण्यात आले होते. त्यापैकी तीक्ष्ण व धारदार जांबिया तिच्या पाठीत भोसकण्यात आला होता. खून केल्यानंतर लागलीच सर्व आरोपी काटोल येथे पळून गेले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोनिकाचा मृत्यू झाला.