काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, August 31, 2013

अडीच लाख ग्रामपंचायती ब्रॉडबँडने जोडणार

अडीच लाख ग्रामपंचायती ब्रॉडबँडने जोडणार



देशातील अडीच लाख ग्रामपंचायती येत्या दोन वर्षात इंटरनेटच्या ब्रॉडबँड (१00 एमबीपीएस) कनेक्शनने जोडण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी शुक्रवारी राज्यसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना दिली. 
सरकारने नॅशनल ऑप्टिक फायबर नेटवर्कने देशातील सर्व ग्रामपंचायतींना जोडण्याची सरकारची योजना असून त्यास मंजुरी देण्यात आली आहे. डार्क फायबर नेटवर्कने १00 एमबीपीएसची गती गाठता येणार आहे. हायस्पिड ब्रॉडबँड कनेक्शनमुळे लोकांना टीव्हीवरील दृश्याप्रमाणे स्पष्ट व्हिडिओ पाहता येतील. या माध्यमातून व्हिडिओ कॉलिंग सुद्धा करता येणार आहे. ग्रामपंचायतीमधील इंटरनेटच्या माध्यमातून लाईव्ह व्हिडिओ प्रशिक्षणामुळे लोकांना शिक्षित करण्यास मदत होणार आहे. या संपूर्ण योजनेसाठी २0 हजार कोटी रुपये खर्च येणार असून येत्या डिसेंबरपर्यंत देशातील ५ हजार ग्रामपंचायती ब्रॉडबँड इंटरनेटने जोडल्या जातील, असा विश्‍वास सिब्बल यांनी व्यक्त केला.
शासकीय कामांसाठी जी-मेल न वापरण्याची सूचना

शासकीय कामांसाठी जी-मेल न वापरण्याची सूचना


शासकीय कामकाजाच्या माहितीचे देवाण-घेवाण यानंतर जी-मेलवरून करण्यात येणार नाही. याबाबत सरकार लवकरच कर्मचार्‍यांना माहिती देण्यासाठी अधिसूचना काढणार आहे. इंटरनेटवरून अमेरिकन विविध देशातील माहिती गोळा करीत असल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर सावधगिरीची बाब म्हणून सरकार जी-मेलसह इतर मेल साईटवरून शासकीय कामकाजांच्या माहितीची चोरी होऊ नये यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. 
सरकारने ५ लाख कर्मचार्‍यांना शासकीय कामांसाठी जी-मेल न वापरण्याची सूचना देणार असून कार्यालयीन ई-मेलसाठी त्यांना भारताच्या राष्ट्रीय माहिती केंद्राच्या (नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर) ई-मेल सर्व्हिसचा वापर करण्यास सांगितले जाणार असल्याचे माहिती दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. सरकार कामकाजाचे मेल जी-मेलवरून पाठविण्याची सवलत दिल्यामुळे अनेक शासकीय कर्मचारी एनआयसीचा वापरच करीत नव्हते, हे विशेष.
जी-मेलचे सर्व्हर अमेरिकेत आहे. त्यामुळे भारतीय युझर्सची जी-मेलमधील माहिती इतर देशांमध्येही आपोआप पोहोचते. या माध्यमातून शासनाची महत्त्वपूर्ण माहिती, दस्तावेज दुसर्‍या देशाच्या हाती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासकीय कामात कोणताही धोका नको, यासाठी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाचा माजी अधिकारी असलेल्या एडवर्ड स्नोडेनच्या खुलाशानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.अमेरिकन सरकारला गुगल, फेसबुक आणि अँपलसारख्या कंपन्यांचे ई-मेल आणि चॅटमधील माहिती पाहता येते. प्रिझ्म नावाच्या प्रोग्रामच्या साहाय्याने अमेरिकी सरकारला या कंपन्यांच्या युझर्सचा पर्सनल डाटाही पाहता येतो. त्यामुळे जागातील अनेक देशांची चिंता वाढली आहे.
याबाबत सरकारच्या निर्णयाची माहिती नसल्याने यावर काही बोलण्याचा प्रश्नच नाही. सध्या केवळ चर्चेच्या फैरी झडत असून, कार्यवाही शून्य आहे, असे गुगल इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.
पाच महिन्यात 36 जणांना डेंग्यूची लागण

पाच महिन्यात 36 जणांना डेंग्यूची लागण


चंद्रपूर - जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून हिवताप निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात येत असला, तरी अवघ्या पाच महिन्यांत हिवतापाचे चार, तर डेंग्यूचा आठ ठिकाणी उद्रेक झाला आहे. यात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. तर, आतापर्यंत ग्रामीण भागातील एकूण 36 लोकांना डेंग्यूची लागण झाली आहे.

एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कार्यकाळात एकूण 12 ठिकाणी या आजाराचा उद्रेक झाला. हिवतापाचा चिमूर तालुक्‍यातील बोथली, गोंडपिंपरीतील गणेशपिंपरी, ब्रह्मपुरीतील हळदा, कोरपनातील निजामगोंदी येथे उद्रेक झाला. यादरम्यान राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत सुमारे 800 लोकांचे रक्तनमुने घेऊन उपचार करण्यात आले. यापैकी 11 लोकांत हिवतापाची लागण झाल्याचे दिसून आले. दुर्दैवाने पाच जणांचा मृत्यू झाला. बोथली येथील सोनाबाई सोनुने, गणेशपिंपरी येथील मोरेश्‍वर चंदगिरवार, हळदा येथील मोरेश्‍वर मुलकर, मुकरू खेवले आणि सुधाकर गेडाम यांचा मृतांत समावेश आहे. ब्रह्मपुरीतील हळदा येथील नागरिक कामानिमित्त परप्रांतात गेले होते. ही मंडळी परत आली, तेव्हा त्यांना हिवतापाची लागण झाली होती. या गावात अवघ्या चार दिवसांत तिघांचा मृत्यू झाला.

ऑगस्ट महिन्यात आठ ठिकाणी डेंग्यू तापाचा उद्रेक झाला. चिचपल्लीनजीक असलेल्या गोंडसावरी, सावलीतील पेटगाव, गोंडपिंपरीतील धामणगाव आणि ब्रह्मपुरीतील चिचखेडा, कुडेसावली आणि चौगान येथे हा उद्रेक झाला. तपासणीदरम्यान एकूण 108 लोकांची रक्तजल तपासणी करण्यात आली. यापैकी 36 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले. सुदैवाने उपचार झाल्याने बहुतेक रुग्ण बरे झाले आहेत. डेंग्यूने विहीरगाव येथील 11 वर्षांची ज्ञानेश्‍वरी शेरकी हिचा मृत्यू झाला आहे. मागील पाच महिन्यांत आरोग्ययंत्रणेने एक हजार हा रक्तनमुने, तर 108 रक्तजल नमुने घेतले. यात 12 लोकांना हिवतापाची, तर 36 लोकांना डेंग्यूची लागण झाल्याचे दिसून आले. शहरी भागातील डेंग्यूची लागण झाल्याचे दिसून येत आहे.


http://chandrapurnews.blogspot.in/

Friday, August 30, 2013

थंड पाण्याची 'शुद्ध' फसवणूक न्यायालयात

थंड पाण्याची 'शुद्ध' फसवणूक न्यायालयात

चंद्रपूर - थंड पाणी विक्रीच्या व्यवसायात उतरलेल्या अनेक व्यावसायिकांच्या आता मुसक्‍या आवळणे अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केले. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील पंधरा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही प्रकरणे आता न्यायालयात आहेत. 
हजारो रुपये गुंतवायचे अन्‌ लाखो रुपये कमवायचे, असे समीकरण थंड पाणी विक्रीचे आहे. उन्हाळा लागला की, थंड पाण्याची विक्री जोरात सुरू होते. गुंतवणूक कमी आणि नफा जास्त असल्याने अशा व्यावसायिकांची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. एकट्या चंद्रपूर शहरात कोणताही परवाना न बाळगता थंड पाणी विक्री करणाऱ्यांची संख्या वीस- पंचवीसच्या आसपास आहे. आता मात्र पाणी डोक्‍यावरून गेल्याने नाइलाज म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई सुरू केली आहे.

मे महिन्यात चिमूर येथील श्रीहरी जलसेवा प्रकल्पावर या विभागाने कारवाई केली. त्यानंतर काही विक्रेत्यांवरही कारवाईचे सत्र सुरू होते. कारवाईच्या सत्रामुळे मधल्या काळात "चोरी-चोरी चुपके- चुपके' विक्री सुरू होती. याची भणक लागल्याने अन्न व औषधी प्रशासन विभागाने जिल्ह्यातील थंड पाण्याची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या प्लांटला भेटी दिल्यात. त्यांना नोटीस देऊन समज देण्यात आली. मात्र, त्याचा काहीएक फरक पडला नाही. यामुळे विभागाने जिल्ह्यातील तब्बल पंधरा थंड पाणी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले.
यात मेसर्स क्रिस्टल वॉटर प्लांट बल्लारपूर, ऑरो ऍक्वा फाइन राजुरा, ऑक्‍सी लाइफ रामपूर, प्युअर ऍक्वा बल्लारपूर, ऑक्‍सी लाइफ बल्लारपूर, अरची ऍक्वा इंडस्ट्रीज ब्रह्मपुरी, इम्यॅनुअल ई ऍक्वा उदापूर, श्री बालाजी ऍक्‍वा भद्रावती, एयमन थंडर फ्रेश भद्रावती आणि विलास ऍक्वा चिल्ड यांचा समावेश आहे.
भारतीय मानक ब्युरोचे प्रमाणपत्र व अन्न सुरक्षा मानद कायद्यांतर्गत परवाना न घेता पाण्यावर प्रक्रिया करून त्याची जारमध्ये विक्री करण्याचे प्रताप या विक्रेत्यांच्या नावावर आहेत. हे व्यावसायिक विहीर, बोअरवेलचे पाणी "स्टोअर टॅंक'मध्ये पाठवितात. तेथून ते फिल्टर करतात. मात्र, हे फिल्टरसुद्धा केवळ नावालाच असते. त्यानंतर पाणी चिलिंग टॅंकमध्ये पाठविले जाते. तेथून थेट कॅनमध्ये साठवणूक करून ग्राहकांच्या माथी मारले जाते. 20 ते 30 रुपये कॅनप्रमाणे या पाण्याची विक्री बाजारात होते. थंड पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भारतीय मानक ब्युरोचे प्रमाणपत्र आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना लागतो. मात्र, या दोन्ही विभागांची परवानगी न घेताच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर थंड पाण्याची विक्री सुरू आहे. चंद्रपूर शहरातील काही विक्रेत्यांवर नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी नंदनवार, चहांदे यांनी दिली.

उपसंचालक कल्याणकुमार यांची बदली

उपसंचालक कल्याणकुमार यांची बदली

चंद्रपूर- ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे ( बफर क्षेत्र ) उपसंचालक कल्याणकुमार यांची गोंदियावन्यजीव विभागाचे वनसंरक्षक या पदावर पदोन्नतीने , डहाणूचे उपवनसंरक्षक जी . पी . नरवणेयांची ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे ( बफर क्षेत्र ) उपसंचालक या पदावर , गडचिरोलीचेउपवनसंरक्षक जी . मल्लिकार्जुन यांची डहाणूचे उपवनसंरक्षक या पदावर आणि सिरोंचा येथीलउपवनसंरक्षक लक्ष्मी अन्नाबथुल यांची गडचिरोलीचे उपवनसंरक्षक या पदावर बदली करण्यात आलीआहे .
अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रेणीतील तसेच ,मुख्य वनसंरक्षक व वनसंरक्षक श्रेणीतील रिक्त पदेपदोन्नतीने भरण्यात येत आहेत . प्रशासकीयकारणास्तव अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक ,मुख्यवनसंरक्षक व वनसंरक्षक श्रेणीतीलअधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापनेचे आदेश २८ऑगस्टला निर्गमित करण्यात आले आहेत .
वनविकास महामंडळ ( औषधी वनस्पती ) नागपूरचेमुख्य महाव्यवस्थापक ए . एस . के . सिन्हा यांचीअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ( संधारण ), प्रधानमुख्य वनसंरक्षक कार्यालय नागपूर या रिक्त पदावरबदली करण्यात आली आहे . तसेच , वनविकासमहामंडळ नागपूरचे महाव्यवस्थापक जरनैल सिंगयांना मुख्य महाव्यवस्थापक ( औषधी वनस्पती ),वनविकास महामंडळ या पदावर पदोन्नती , कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ . पी . एन . मुंडेयांना आर . आर . सहाय यांच्या सेवानिवृत्तीमुळे १ सप्टेंबर २०१३ पासून रिक्त होणाऱ्या अप्परप्रधान मुख्य वनसंरक्षक ( माहिती , तंत्रज्ञान व धोरण ), प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय यापदावर पदोन्नतीने पाठविण्यात आले आहे . पुण्याचे मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव ), एम . के .राव यांची डॉ . पी . एन . मुंडे यांच्या पदोन्नतीमुळे रिक्त होणाऱ्या मुख्य वनसंरक्षक , कोल्हापूरया पदावर , तसेच सामाजिक वनीकरण पुण्याचे मुख्य वनसंरक्षक तथा उपमहासंचालक विकास गुप्तायांची मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव ) पुणे आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील मुख्यवनसंरक्षक ( अकाष्ठ वनोपज ) ए . जे . कांबळे यांची मुख्य वनसंरक्षक तथा उपमहासंचालक ,सामाजिक वनीकरण , पुणे येथे बदली करण्यात आली आहे . नाशिकचे वनसंरक्षक ( वन्यजीव ) ए. एम . वीसपुते यांची मुख्य वनसंरक्षक तथा उप महासंचालक , सामाजिक वनीकरण , नाशिकतसेच , सामाजिक वनीकरण अकोल्याचे उपसंचालक एस . बी . शेळके यांची वनसंरक्षक ( वन्यजीव) नाशिक आणि गडचिरोलीचे वनसंरक्षक ( कार्यआयोजना ) यू . जी . अवसक यांची मुख्यवनसंरक्षक तथा सदस्य सचिव , महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूर येथे पदोन्नतीवर बदलीकरण्यात आली आहे .
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक के . पी . सिंग यांची मुख्यवनसंरक्षक , ठाणे या रिक्त पदावर , यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक दिनेशकुमार त्यागी यांचीमेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक या पदावर , गोंदिया वन्यजीवविभागाचे वनसंरक्षक व्ही . व्ही . गुरमे यांची यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक या पदावर पदोन्नतीने, ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे ( बफर क्षेत्र ) उपसंचालक कल्याणकुमार यांची गोंदियावन्यजीव विभागाचे वनसंरक्षक या पदावर पदोन्नतीने , डहाणूचे उपवनसंरक्षक जी . पी . नरवणेयांची ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे ( बफर क्षेत्र ) उपसंचालक या पदावर , गडचिरोलीचेउपवनसंरक्षक जी . मल्लिकार्जुन यांची डहाणूचे उपवनसंरक्षक या पदावर आणि सिरोंचा येथीलउपवनसंरक्षक लक्ष्मी अन्नाबथुल यांची गडचिरोलीचे उपवनसंरक्षक या पदावर बदली करण्यात आलीआहे .
जिल्ह्यात डेंग्यूचे १२५ रुग्ण

जिल्ह्यात डेंग्यूचे १२५ रुग्ण

चंद्रपूर - सततच्या पावसानंतर विदर्भात साथीच्या आजारांनीडोके वर काढले आहे . चंद्रपूर जिल्ह्यात मेडिकलकॉलेजच्या वि ‍ द्यार्थिनीचा नागपुरात गुरुवारी डेंग्यूनेमृत्यू झाला . सदर वि ‌ द्यार्थिनीला बुधवारीचंद्रपूरातून नागपुरात हलविण्यात आले होते . मागीलपाच महिन्यात जिल्ह्यातील डेंग्यूने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तीनवर पोहचली आहे . दरम्यान , जिल्ह्यात डेंग्यूचे १२५ रुग्ण आढळले आहेत .

चंद्रपुरातील वि द्यार्थिनीचा नागपुरात डेंग्यूने मृत्यू
चंद्रपूर : वैष्णवी प्रभावत ( २१ ) ही नागपूर मेडिकलकॉलेजची एमबीबीएसची द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. ती आजारी असल्याने चंद्रपुरात घरी परतली होती . चंद्रपुरातील श्वेता हॉस्पिटल येथे तिलासोमवारी भरती करण्यात आले होते . रक्त तपासणीत डेंग्यूचे विषाणू आढळले होते . अचानकतब्येत बिघडल्याने तिला नागपुरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले . पण उपचारादरम्यानतिचा मृत्यू झाला .

चंद्रपूर जिल्ह्यात ७ एप्रिल २०१२ ला राजुरा तालुक्यातील विहीरगाव येथे डेंग्यूचा पहिला बळी गेलाहोता . ज्ञानेश्वर शेरकी ( ११ ) असे त्याचे नाव होते . सावली तालुक्यातील उसरपार चक येथीलकैकाडू साखरे ( ६० ) यांचा मंगळवारी गडचिरोलीत मृत्यू झाला होता . कैकाडू हे मुलीकडेगडचिरोलीला गेले होते .
चंद्रपूर जिल्ह्यात डेंग्यूचे सुमारे १२५ रुग् ‍ ण आढळले आहेत . चंद्रपूर जिल्ह्यात पूरजन्यस्थितीनिर्माण झाल्यानंतर त्यातून सावरत नाही तोच विषाणूजन्य तापासह डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावरआढळले आहेत . डेंग्यूची संख्या १२५ च्या घरात असून त्यात गोंडपिंपरी तालुक्यातील धामणगावयेथे ७४ , ब्रह्मपुरी तालुक्यातील चिचखेडा येथे ३१ तर धानोलीपोहा येथील ६ रुग् ‍ णांचा समावेशआहे . यातील सर्वांचे नमुने तपासले असून ते पॉझिटिव्ह असल्याची माहिती सूत्रांनी दिली .जिल्ह्यातील ४२७ गावे डासांच्या उत्पत्तीसाठी संवेदनशील असून तेथे स्वच्छता व जनजागृती केलीजात आहे . दरम्यान , डेंग्यूसंदर्भातील रक्त तपासणीसाठी कीट आली असून आता चंद्रपुरातच हीतपासणी केली जाणार आहे .
चंद्रपुरातील एका खासगी रुग् ‍ णालयात सुलभा खुरगे या डेंग्यूच्या रुग् ‍ णाला २० ऑगस्टला भरतीकरण्यात आले . गुरुवारी तब्येत सुधारल्यानंतर डिस्चार्ज दिल्याची माहिती रुग् ‍ णालयाचे डॉ .शंकरराव अंदनकर यांनी दिली . 

जिल्ह्यात डेंग्यूचे रुग् ‍ ण आढळले असून विषाणूजन्य रुग्णांची संख् ‍ या मोठी आहे .
यासाठी  आरोग्य यंत्रणा सतर्क आहे .
- डॉ . ए . ए . आठल्ये , जिल्हा आरोग्य अधिकारी

Wednesday, August 28, 2013

विद्यार्थ्यांसमोर वैद्यकीय प्रवेशाचा गंभीर प्रश्‍न

विद्यार्थ्यांसमोर वैद्यकीय प्रवेशाचा गंभीर प्रश्‍न


बल्लारपूर - मूळच्या महाराष्ट्रात असणा-ऱ्या परंतु बारावीचे शिक्षण इतर राज्यांतून पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसमोर वैद्यकीय प्रवेशाचा गंभीर प्रश्‍न उभा ठाकला आहे. या विद्यार्थ्यांना स्थानिक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या 85 कोट्यातून लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने या मोठा बिकट प्रश्‍न निर्माण झाला आहे.

गेल्या शैक्षणिक सत्रात वैद्यकीय प्रवेशासाठी सामायिक पूर्व परीक्षा (नीट) घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने "नीट'चा निर्णय अयोग्य असल्याचे म्हटले आहे. तथापि, प्रकिया पूर्ण झाल्याने यावर्षी याच परीक्षेच्या आधारे वैद्यकीय प्रवेश दिला जाणार आहे. "नीट'च्या निकषानुसार ज्या राज्यात महाविद्यालय असेल, त्या राज्यातील विद्यार्थ्यांना 85 टक्के स्थान देण्यात येणार आहे. इतर राज्यातील प्रवेशपात्र 15 टक्के विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. मात्र, स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरून सध्या गोंधळ उडाला आहे. बारावीचा अभ्यासक्रम बाहेर राज्यातून पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना इतर राज्यातील विद्यार्थी समजण्यात येईल आणि केवळ 15 टक्के कोट्याचा लाभ देण्यात येईल, अशी भूमिका परिषदेने घेतली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. विदर्भातील अनेक मुले अकरावी किंवा बारावीसाठी आंध्र प्रदेशात जातात. पूर्व परीक्षेची तयारी आणि राहण्याची सोय असल्याने अनेकजण हा पर्याय निवडतात. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. काहींच्या मते ज्या राज्यातून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ते राज्य त्या विद्यार्थ्यांचे रहिवासी राज्य आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. वैद्यकीय परिषदेच्या मते "नीट'साठी ज्या राज्यातील परीक्षा मंडळातून परीक्षा उत्तीर्ण दिली. ते राज्य प्रवेशासाठी मूळ राज्य म्हणून गृहीत धरण्यात येत आहे.
सोने @ 32 हजार 450 रुपये

सोने @ 32 हजार 450 रुपये


डॉलरच्या तुलनेच रुपयाची घसरण आणि सोने-चांदीवरील आयात शुल्कात वाढ केल्याने दोन्ही धातूच्या किमतीत मंगळवारी तेजी आली. उपराजधानीत सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 1010 रुपयांनी झळाळून 32 हजार 450 रुपये झाले. तर चांदी 2 हजार 900 रुपयांच्या तेजीसह 56 हजार 700 रुपये किलो झाली आहे.

डॉलर आणि पॉंडसमोर लोटांगण घेणाऱ्या रुपयामुळे या मौल्यवान धातूंना चकाकी आल्याचे सराफा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसांत दोन्ही धातूचे दर घसरण्याची शक्‍यता कमी आहे. डॉलर सत्तर रुपयांवर गेल्यास सोन्याचे दर 37 हजारापर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. चांदी 65 हजारांचा आकडा पार करण्याची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे. देशात सोन्याची टंचाई नसून तसा अपप्रचार करण्यात येत आहे. काही साठेबाजांनी सोन्याची साठवणूक केल्याने कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही काही व्यापारी करू लागले आहेत.

चार महिन्यांनंतर सोन्याने गाठलेली ही उच्चांकी पातळी आहे. स्टॉकिस्टस आमि ज्वेलर्सकडून मागणी कमी असली, तरी डॉलरचे दर वाढल्याने दोन्ही धातूमध्ये अचानक तेजी आली आहे. सोन्याची आयात कमी करण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांमुळे सोन्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांत सोने 6 हजार 550 रुपयांनी, तर चांदी पाच हजार रुपयांनी वधारली आहे. रुपयांला मजबुती देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत असली, तरी त्याचा फारसा फायदा होणार नाही. उलट मौल्यवान धातू आणखी महाग होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
विदर्भाच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांनी निवडणुका लढाव्या

विदर्भाच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांनी निवडणुका लढाव्या

नागपूर - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विदर्भ स्वतंत्र राज्यासाठी सक्षम नसल्याचे सूतोवाच केले होते. परंतु, विदर्भ जर सक्षम नसेल, तर उर्वरित महाराष्ट्रदेखील सक्षम नाही. त्यामुळे आता येथील सर्व राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका विदर्भाच्या मुद्द्यावर लढाव्यात, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केले.
आंबेडकर यांनी सांगितले की, राज्याला प्राप्त होणारे सर्व उत्पन्न नोकरदारांचे पगार व बाजारातून घेतलेले कर्ज यावरच खर्च केला जात आहे. विविध योजनांचा निधी त्या-त्या "हेड' खाली खर्च न करता शासनाचे कर्ज भागविण्यासाठी केला जात आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी विदर्भाबाबत जे निकष लावले तेच निकष महाराष्ट्रासाठी का नाही, असा प्रश्‍न उपस्थित करून आंबेडकरांनी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावरही तोफ डागली. स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनात भाजप आमच्यासोबत होता. मुळात तेदेखील विदर्भाच्या बाजूने नाहीत. भाजप विदर्भाच्या बाजूने असतील, तर लोकसभेत येणाऱ्या तेलंगणाच्या विधेयकात त्यांनी "तेलंगणा ऍण्ड विदर्भ' अशी दुरुस्ती सुचवावी आणि त्यानंतर मतदानासाठी विधेयक टाकावे. तेव्हाच खऱ्या अर्थाने "दूध का दूध और पानी का पानी' दिसून येईल. भाजपने अशी दुरुस्ती न सुचवविल्यास त्यांचा पाठिंबा हा स्वतंत्र विदर्भासाठी केवळ "नाटक' होते असे समजू. देशाच्या प्रगतीसाठी लहान राज्यांशिवाय दुसरा पर्याय नाही, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Tuesday, August 27, 2013

नाथाचे शिवकुंड झाले अनाथ

नाथाचे शिवकुंड झाले अनाथ

प्रशांत विघ्नेश्‍वर/मंगळवार, २७ ऑगस्ट २0१३
चंद्रपूर- जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या जिल्ह्यत पाषाण युगापासून आधुनिक युगापर्यंतचे पुरावे आढळतात. हे पुरावे स्मारक स्वरूपात असून यात मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, परमार, नागवंशी, गोंड, मुगलकालीन स्मारकांचा समावेश आहे. चंद्रपूरच्या स्वर्णिम इतिहासात अनेक सुवर्ण पाने आहेत. यातील अनेक पाने गळू लागली आहेत. त्यातीलच एक पान म्हणून शहराच्या मध्यभागी असलेल्या गोंडकालीन अंचलेश्‍वर मंदिराकडे बघितले जाते. येथील भोलेनाथाचे शिवकुंड आता अनाथ झाले आहे. विशेष म्हणजे, याच मंदिराच्या निर्मितीनंतर गोंड राजांनी आपली राजधानी बल्लारशाह (बल्लारपूर) हून चंद्रपूरला (चांदा) स्थानांतरित केली होती. याला ५00 वर्षांचा कालावधी लोटलेला असून सध्या चंद्रपूरचे पंचशताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे अचंलेश्‍वर मंदिराचा केदारनाथ होतोय. अंचलेश्‍वर मंदिराची निर्मिती दहाव्या शतकात गोंडराजे खांडक्या बल्लाळशाह यांनी केली. तेव्हापासून चंद्रपूरला गोंडराजांची राजधानी म्हटले जाऊ लागले. इ.स. १४७२ मध्ये बल्लाळशाहने राजगादी सांभाळल्यानंतर चर्मरोगी बळावला. प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून राजे बल्लाळशाह स्वच्छ हवेच्या ठिकाणी शिकारीला जात असत. 
भाजीपाल्यांचे भाव वधारले

भाजीपाल्यांचे भाव वधारले

चंद्रपूर: उत्पादन निम्म्यावर आल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहे. कांदा तर पुन्हा गृहिणींना रडवित असून भाजीपाला खरेदी करणे सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर झाले आहे. भाजीपाल्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. अर्धेअधिक उत्पादन घटले आहे. त्यामुळे स्थानिक वाड्यांमधून बाजारात भाजीपाल्यांची आवक कमी झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून भाजीपाल्यांचे भाव वधारले आहे. 
ठोक भाजीमार्केटमध्ये वांगे ४0 रुपये किलो, फुल कोबी ६0 रू किलो, परवळ ८0 रु., शिमला मिरची ८0 रु., तोंडले ५0 रु., पान कोबी ४0 रु., बिन्स शेंगा ८0 रु., चवळी शेंगा ६0 रु., शेवग्याच्या शेंगा ८0 रु., कोथिंबीर १00 रू., अद्रक १८0 रु., पालक ८0 रु., मेथी ६0 रु., मिरची १00 रुपये किलो याप्रमाणे विकले जात होते. आजच्या बाजारात केवळ टमाटर आणि बटाटेच केवळ २0 रुपये किलो होते. भाजीपाल्यांच्या या किमती ठोक बाजारात एवढय़ा आहेत. चिल्लर मार्केट व दारांवर तर ८0 आणि १00 रुपयांच्या आत काहीच मिळत नाही. मागील दीड महिन्यांपासून भाजीपाल्यांच्या किमती वधारलेल्याच आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे बजेटच बिघडले आहे.
लाकूड चोरीप्रकरणी तिघांना अटक

लाकूड चोरीप्रकरणी तिघांना अटक

बल्लारपूर: येथील वनविकास महामंडळाच्या डेपोतून चोरी केलेले लाकूड बल्लारपूर पोलिसांनी काल (दि. २५ ) रात्री बसस्थानक परिसरात पकडले. या लाकडाची किंमत ४६ हजार ११२ रुपये असल्याचे सांगण्यात येते.
चोरीच्या आरोपात तिघांना अटक केली असून त्यांची नावे सूरज किशोर आवळे, विजयराज कांबळे (दोघेही रा.मौलाना आजाद वार्ड, बल्लारपूर) आणि संजय गुड्ड शिवपाल सिंह गौर (रा. लालपेठ कालरी चंद्रपूर) अशी आहेत. या तिघांनी मिळून येथील वनविकास महामंडळाच्या डेपोत असलेले लाकूड दोन दिवसांपूर्वी चोरले आणि ते चंद्रपूरला नेऊन त्याची कटाई केली. कटाई केलेले लाकूड टेम्पोने बल्लारपूरला आणत असताना नाकाबंदीवर असलेले वाहतूक निरीक्षक नामदेव काळे व त्यांचे सहकारी आर.आर. ठाकूर, जनार्दन ठाकूर यांनी टेम्पोला (एम.एच.३४ एबी ५७५५) पकडले. टेम्पो आणि लाकूड असा दोन लाख किंमतीचा माल जप्त केला आहे. वनविकास महामंडळाच्या अधिकार्‍यांना डेपोतून लाकूड चोरी गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात आज तक्रार केली. यावरुन या तिघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पंजाबराव मडावी करीत आहेत.
 सिमावर्ती भागातील २१ मराठी शाळा बंद करण्याचा घाट

सिमावर्ती भागातील २१ मराठी शाळा बंद करण्याचा घाट

चंद्रपूर-  आंध्रप्रदेश राज्यातील सिमावर्ती भागातील २१ मराठी शाळा बंद करण्याचा घाट आंध्रप्रदेश सरकारने घातला आहे. चार मराठी शाळा दोन वर्षांपूर्वीच बंद झाल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या सिमेलागून असलेल्या आदिलाबाद जिल्ह्यात मोठय़ा संख्येने मराठी भाषिक वास्तव्याला आहेत. त्यांना आपल्या मातृभाषेत शिक्षण घेता यावे, यासाठी या भागात मराठी शाळा उघडण्यात आल्या. मात्र येथील मराठी शाळांना आता अखेरची घरघर लागली आहे. आंध्रप्रदेश सरकारची मराठीविषयाची अनास्थाच याला कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. 
या भागात २५ प्राथमिक, आठ माध्यमिक व तीन कनिष्ठ मराठी महाविद्यालये आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थी संख्याही मोठी आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हेतुपुरस्सर मराठी शिक्षकांची भरती केली जात नसल्याने या शाळा आता ओस पडू लागल्या आहेत, तर दुसरीकडे नवीन तेलगू शाळांना मान्यता देऊन मराठी विद्यार्थ्यांना तेलगू शाळांत प्रवेश घेण्याची सक्ती केली जात आहे. यामुळे मराठी भाषेतील शिक्षणाची गोडी असूनही मराठी भाषिक विद्यार्थी व त्यांच्या पालकांची तेथे गळचेपी होत आहे. यातील काही शाळा जीर्णावस्थेत उभ्या आहेत. त्याची डागडुजीही केली जात नसल्याने शाळांची अतिशय दुरवस्था झाली आहे. महाराष्ट्र व आंध्र प्रदेशाच्या सिमावर्ती भागातील खोगदूर, बेला, मांगरुड, कोब्बई, भेदोडा, दहेगाव, टाकळी, जुनोनी, आदिलाबाद, सोनखास येथील शाळांत मराठी शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने विद्यार्जनात अडचणी येत आहेत.
या पार्श्‍वभूमीवर काही दिवसांपूर्वी आदिलाबादेतील जिल्हा परिषदेसमोर मराठी शिक्षकांनी मोठे आंदोलन केले होते. मात्र आंदोलनादरम्यान केवळ पोकळ आश्‍वासनाशिवाय शिक्षकांच्या पदरी काहीही पडले नाही. शाळेच्या तुकड्यांमध्ये पूर्ण पटसंख्या असताना या शाळांकडे दुर्लक्ष करून तेलगू भाषेचे प्राबल्य वाढविण्यासाठी मराठी भाषेची गळचेपी केली, आरोप यामुळे होऊ लागला आहे.
एकीकडे महाराष्ट्र या मराठी भाषिकांच्या प्रदेशात विद्यार्थी मिळत नसल्याने मराठी शाळा बंद होत आहेत, तर दुसरीकडे तेलगू भाषिक आंध्रप्रदेशात विद्यार्थ्यांची पटसंख्या मराठीची अस्मिता टिकवून ठेऊन आहे.
आंध्रप्रदेशातील मराठी शाळांवर होणारा अन्याय महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारसमोर आणून दूर करावा, अशी मागणी आहे. 

मराठी शिक्षकांची पदोन्नती होत नसल्याने हे शिक्षक तेलगू शाळांतच शिकविणे पसंद करीत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे मराठी शाळा बंद होण्यामागे मराठी माणसांचीही अनास्था कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.