সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, February 01, 2019

वाडीत शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे

अपुरी वाहतूक पोलीस यंत्रणा महामार्ग ओलांडताना विद्यार्थ्याची तारेवरची कसरत
वाहतूक पोलीस वाहन कार्यवाहीत मग्न
वाडी(नागपूर )/अरूण कराळे:

एमआयडीसी वाहतूक शाखेतर्फे हिंगणा,एमआयडीसी,वाडी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील नागपूर ते अमरावती परिसरातील वाहतूक व्यवस्था सांभाळणाऱ्या वाहतूक पोलीसांची संख्या क्षेत्रफळाच्या मानाने अपुरी असून वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक वाहतूक शाखेचे पोलीस वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कार्यवाही करण्यात गुंतले असल्याने वाडी परिसरातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमंडली आहे . गेल्या कित्येक वर्षापासून वाहतूक असलेली पोलिसांची जबाबदारी स्थानिक कंट्रोल वाडी स्थित जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुले स्वरक्षणार्थ शाळेत येण्या-जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग शिक्षकांच्या मदतीने पार करीत असल्याने शहरातील विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे झाली आहे.जणूकाही वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी शिक्षक व मुलांवर असल्याचे विदारक चित्र शहरात दिसून येत आहे .पर्याप्त पोलीस यंत्रणा नसल्याने चिमुकल्यांना स्वतःच ट्राफिक थांबवून राष्ट्रीय महामार्ग जीव मुठीत घेऊन ओलांडावा लागतो.

यासंदर्भात केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांनी वाहतूक विभागाला शाळा परिसराला लागून असलेल्या कंट्रोल वाडी ,सब्जी मंडी या चौकात वाहतूक पोलिसांची वारंवार मागणी करूनही वाहतूक विभागाला या समस्येशी काहीही सोयर सुतक नसल्यासारखे तर स्थानिक नगर परिषदेला या समस्येशी घेणेदेणे नाही असे वागत असल्याने आजपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने दररोज संबंधित शाळेतील शिक्षकांना वाहतूक पोलिसांचीही भूमिका वठवावी लागत आहे.

नागपुर ते अमरावती कडे या राष्ट्रीय महामार्गांने,वाहन चालविण्याचा परवाना नसलेले, कागदपत्रे न ठेवता वाहन चालविणे,बिना हेल्मेट,चुकीच्या दिशेनी वाहन चालविणे,नो सिग्नल मध्ये रस्ता पार करणे,मद्यपान करून वाहन चालविणे व इतर वाहतूक नियमाचे उल्लंघन होऊ नये यासाठी एमआयडीसी वाहतूक शाखेचे पोलीस कर्तव्य बजावीत असले तरी विद्यार्थ्यांच्या जीवितहानीचा प्रश्न ऐरणीवर टाकता येईल काय?हा प्रश्न जनसामान्यांच्या मनात पडला असून रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करीत वाहतूक नियमाचे धडे गिरविणाऱ्या वाहतूक विभागाच्या वरिष्ठांनी याबाबत दखल घेऊ नये,किंवा नगर परिषदेला ही जवलनंत समस्या लक्षात येऊ नये.हे जनसामान्यांना न पटण्यासारखे आहे.दुसरीकडे अपुऱ्या पोलीस बळाचा फायदा घेत वाहतूक नियमाचे पालन न करणारे मनमर्जीप्रमाणे वाहने चालवीत कार्यवाहिच्या भितीपोटी पोलिसांची नजर चुकवीत वाहने भरधाव वेगाने चालवीत असल्याने अनेकदा अपघातही झाले आहेत.

वाहतूक शाखेचे डीसीपी यांना वाडी केंद्राचे केंद्रप्रमुख शरद भांडारकर यांनी एक वर्षांपूर्वी निवेदन देऊन शाळेच्या वेळात वाहतूक पोलिसांची व्यवस्था करण्याची विनंती केली होती.परंतू या समस्येचा गांभीर्याने विचार केला नसल्याचे निदर्शनास आले आहे.वाडी शहरात मोठ्या प्रमाणात ट्रांसपोर्ट व्यवसाय असल्याने मोठ्या प्रमाणात हलक्या/जड वाहनांची दिवसेंदिवस संख्या वाढत असून त्याप्रमाणात वाहतुकीबाबत नियोजन नसल्याने सतत वर्दळ असते.ट्रांसपोर्टर मध्ये येणाऱ्या व जाणाऱ्या मालाची उचल करण्यासाठी शहरात दररोज हजारो वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने सामान्य पादचाऱ्यांना विशेषतः विद्यार्थी,महिला व वृध्दांना रस्ता पार करणे धोक्याचे झाले आहे.पार्किंग व्यवस्थेकडे अपुऱ्या पोलीस बळामुळे पोलिसांचे दुर्लक्ष असून आठवा मैल ते वाडी नाका नंबर १० या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला जड वाहनाच्या रांगा नजरेस पडते.या वाहनधारकांकडून वसुली केल्या जात असल्याची माहिती पुढे आली आहे.वाडी शहरात आठवा मैल,नवनीत नगर,भारत अपार्टमेंट चौक,पुलिस स्टेशन चौक,दत्तवाडी चौक,पटेल वाइन शॉप कॉर्नर ,खड़गाव रोड टर्निंग,एमआईडीसी टी पॉइंट,काटोल बाईपास,कंट्रोलवाडी , वाडी नाका नंबर १० चौक असून या भागात वाहतूक पोलिसांची संख्या अपुरी असल्याने वाहतूक पोलीस ठराविक भागातच कार्यवाही करतांना दिसतात. हिंगणा,वाडी,एमआयडीसी या परिसराचा विचार करता ५० कर्मचारी असलेली वाहतूक विभाग तेवढ्या तत्त्परतेनी कर्तव्य सांभाळूच शकत नाही.याची कल्पना असतानाही या समस्याकडे दुर्लक्ष होत आहे.

संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच स्थानिक नगर परिषद प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून शासनदरबारी हा प्रश्न उपस्थित करून पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून कोलमंडलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा निर्माण झालेला प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी जोर पकडत आहे.अन्यथा स्वतःची सुरक्षा करणारे चिमुकले प्रशासनाच्या व वाहतूक विभागाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्यास मागे राहणार नाही.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.