अप्पर मुख्य सचिव व शिक्षण आयुक्तांना विमाशिसंघाचे निवेदन
नागपूर / अरूण कराळे:कमी पटसंख्येमुळे व्यपगत झालेली पायाभूत पदे पटसंख्या वाढल्यास १०० टक्के अनुदान तत्वावर मंजूर करण्यात यावीत अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष एस.जी. बरडे यांनी शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव व शिक्षण आयुक्तांकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
आर.टी.ई. नुसार विद्यार्थी संख्या ग्रुहीत धरून पदनिश्चीतीचे निकष बदलत गेल्यामुळे सन २०१५-१६, २०१६-१७, २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात राज्यातील अनेक शाळांमधील शिक्षक पदांची संख्या अचानक कमी झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त झाले. इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल गेल्यामुळे मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पायाभूत पदे कमी झाली असल्याचे विमाशिचे अध्यक्ष एस.जी. बरडे यांनी शासनास पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे. संचमान्यतेत विद्यार्थी संख्या असतांना अनेक कारणाने ती संख्या विद्यार्थी पोर्टलवर भरल्या न गेल्यामुळे संचमान्यतेत पदे कमी दाखविण्यात आल्याची राज्यात अनेक उदाहरणेही आहेत. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या आंदोलनातून व बैठकांमधून पटसंख्या असताना पदे नाकारण्यात आल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले असल्याचे विमाशि संघाने शासनास पाठविलेल्या निवेदनात नमूद आहे.
त्यामुळे वेगवेगळ्या कारणाने व्यपगत करण्यात आलेली ही पायाभूत पदे सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात विद्यार्थी संख्या असल्यास १०० टक्के अनुदान तत्वावर मंजूर करण्यात यावी अशी मागणी विमाशिसंघाने शासनास पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे शिक्षण संचालक व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनाही पाठविण्यात आली आहे.