সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, October 07, 2014

मातब्बर उमेदवारांत पंचरंगी लढत


यंदा नवरात्री, गांधी जयंती, दसरा, धम्मचक्र प्रवर्तन दिन, बकरी ईद अशा पंचरंगी सणांमुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. यातच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. त्यामुळे आगामी 15 दिवस हा धूमशान राहील. यंदा आघाडी आणि युतीची मैत्री तुटल्याने सर्वच पक्षाचे उमेदवार स्वतंत्रपणे किल्ला लढवित असल्याने नागपूर ग्रामीण जिल्ह्यात पंचरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले. नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर, रामटेक, उमरेड, हिंगणा व कामठी विधानसभेत कोणाला फटका बसेल आणि कोण विजयाचे फटाके फोडणार, हे अद्याप सांगणे कठिण झाले आहे.
काटोल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांना घरातीलच उमेदवार आव्हान देत आहे. भाजपचे उमेदवार असलेले आशीष देशमुख हे त्यांचे पुतणे आहेत. याशिवाय कॉंग्रेसचे दिनेश ठाकरे, शिवसेनेचे राजेंद्र हरणे ताकदीने मैदानात आहेत. महायुती तुटल्याने आशिष देशमुख यांना काटोल मतदारसंघातून लढण्याची संधी मिळाली. पण, ते काकांपुढे तग धरतील काय, हे बघण्यासारखे आहे.
कामठी मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार चंद्रशेखर बावनकुळे रिंगणात असून, त्यांना खरी अडचण आहे ती कॉंग्रेसचे राजेंद्र मुळक यांची. याशिवाय शिवसेनेचे तापेश्‍वर वैद्य यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघात तिहेरी लढत होईल. राष्ट्रवादीचे डॉ. महेंद्र लोधी यांना मिळणाऱ्या मतांवर विजयाचे गणीत ठरेल. बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या सुलेखा कुंभारे यांनी भाजपाला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपाचे पारडे अधिक जड झाले आहे. मात्र, मुळक यांच्या उमेदवारीमुळे तुल्यबळ लढत होईल.
रामटेकमधून गेल्या चार विधानसभेत विजयाची माळ खेचून गड कायम राखणारे शिवसेनेचे आशीष जयस्वाल यांना यंदा चांगलेच आव्हान आहे. कॉंग्रेसचे सुबोध मोहिते पुन्हा एकदा या मतदारसंघातून भाग्य आजमावित असून, राष्ट्रवादीचे डॉ. अमोल देशमुख, भाजपचे डी. मल्लिकार्जुन रेड्डी, मनसेचे योगेश वाडीभस्मे यांच्या दावेदारीमुळे चित्र अनिश्‍चित झाले आहे. या तिघांचे आशीष जयस्वाल यांना आव्हान आहे. मागील निवडणुकीत गोंडवाना गणतंत्र पक्षाकडून रेड्डी लढले होते. तेव्हा त्यांना चांगली मते मिळाली. त्यामुळे हा गड सेना कायम राखेल काय, हे बघण्यासारखे आहे.
सावनेरमध्ये भाजपचे उमेदवार सोनबा मुसळे यांचा अर्ज अपात्र झाल्याने कॉंग्रेसचे सुनील केदार यांच्यासमोरील मोठी खिंड दूर झाली. सुनील केदारांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादीचे किशोर चौधरी, बसपाचे सुरेश डोंगरे, मनसेचे प्रमोद ढोले व शिवसेनेचे विनोद जीवतोडे यांच्यामुळे फार परिणाम होईल, असे चित्र नाही.
हिंगणा मतदारसंघात यावेळी विद्यमान आमदार विजय घोडमारे यांची तिकिट कापून समीर मेघे यांना संधी देण्यात आली. शिवाय माजी मंत्री रमेशचंद्र बंग हेसुद्धा येथील तगडे उमेदवार आहेत. त्यामुळे निकालाचे भाकित वर्तविणे अवघड झाले आहे.
रमेश बंग यांनी आधीपासूनच मतदार संघाची बांधणी केली. त्यांच्या नेटवर्कमुळे मोठा परिणाम होऊ शकतो. भाजपचे समीर मेघे, कॉंग्रेसच्या कुंदा राऊत, शिवसेनेचे प्रकाश जाधव, मनसेचे किशोर सरायकर यांच्यामुळे चुरस वाढली आहे.
उमरेड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुधीर पारवे यांच्यासमोर प्रचंड आव्हान आहे. कॉंग्रेसचे संजय मेश्राम, शिवसेनेचे जगन्नाथ अभ्यंकर, मनसेचे राजेश कांबळे व बसपचे रूक्षराज बन्सोड यांनी चुरस वाढविली आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. कॉंग्रेसने संजय मेश्राम यांना संधी दिल्याने दलित समाजात उत्साह आहे. त्यामुळे या निवडणुकीत उमरेडमधून कोणाचे भाग्य उजळेल याकडे लक्ष लागले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.