चंद्रपूर दि.07- चंद्रपूर विधानसभा निवडणूक सुरळीत पारपाडण्यासाठी 87 पथक गठीत करण्यात आले असून यात 21 फिरते पथक, 23 स्थिर सर्व्ह्रेक्षण पथक, 29 व्हिडीओ सर्वेलन्स पथक, 8 व्हिडीओ पाहणी पथक व 6 राजकीय पक्ष उमेदवाराचे खर्च तपासणी पथकाचा समावेश आहे. जिल्हयात एकूण 61 लाख 90 हजाराची रक्कम जप्त करण्यात आली असून 4 दारुचे दुकाने सिल करण्यात आली आहे. तर 5 दुकानांना निलंबीत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
जिल्हयातील सहाही विधानसभा मतदार संघात 37 मतदान केंद्र संवेदनशिल म्हणून घोषित करण्यात आले असून या ठिकाणी सुक्ष्म निरीक्षक नेमण्यात आले आहेत. जिल्हयातील 55 टक्के मतदारांना वोटर स्लीपचे वितरण करण्यात आले आहे. ज्यांना वोटर स्लीप मिळाली नाही अशा मतदारांसाठी 12 ऑक्टोंबर रोजी विशेष मोहिमेअंतर्गत मतदान केंद्र अधिकारी मतदान केंद्रावर उपस्थित राहतील त्यावेळी मतदारांनी वोटर स्लीप प्राप्त करुन घ्यावी असे जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दामोधर नान्हे व नोडल ऑफिसर खर्च संतोष कंदेवार यावेळी उपस्थित होते.
जिल्हयातील 1962 मतदान केंद्रापैकी राजूरा-18, चंद्रपूर-10, बल्लारपूर-03 व वरोरा-06 असे एकूण 37 मतदान केंद्र संवेदनशिल मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकीची तयारी प्रशासनाने पूर्ण केली असून जिल्हयात 92.26 टक्के मतदारांना फोटो ओळखपत्र देण्यात आले आहे. यावेळी गैरहजर, स्थलांतरीत व मृत मतदाराची वेगळयाने नोंद घेण्याच्या सूचना आयोगाने दिल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले. जिल्हयात एकूण 17 लाख 59 हजार 146 मतदार आहेत. 27 सप्टेंबर 2014 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या पुरवणी यादीमध्ये 8 हजार 253 मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
निवडणूकीच्या कर्तव्यावर 9834 अधिकारी-कर्मचारी व 4500 पोलीस अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून या सर्वांना टपाली मत पत्रिका देण्यात आल्या आहेत. मतदान पथकांना मतदान केंद्रावर पोहचविणे व परत आणने याकरीता 184 एसटी बस, 50 मिनीबस, 400 जिप व 20 ट्रकची व्यवस्था करण्यात आली असून आवश्यकतेप्रमाणे खाजगी वाहने सुध्दा भाडे तत्वावर घेण्यात येणार असल्याचे म्हैसेकर यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या टोल फ्रि क्रमांकावर 200 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या सोडविण्यात आल्या आहेत. कमी मतदान झालेले ग्रामीण भागातील 197 तर शहरी भागातील 103 मतदान केंद्रावर जनजागृती मोहिम राबविण्यात आली आहे. त्यासाठी 6 मोबाईल मतदार सहायता केंद्र सुरु केल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले. यासोबतच सहाही मतदार संघात कलापथकाव्दारे मतदार जागृती मोहिम राबविणे सुरु आहे. आदर्श मतदान केंद्र तयार करण्याच्या सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिका-यांना देण्यात आल्याचे सांगितले.