वृत्तविश्लेषण
देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा
लोकसभेत जी भाजपची लाट होती, ती विधानसभेत येणार नाही, असे राजकीय जाणकारांसह ग्रामस्थदेखील बोलून दाखवित होते. मात्र, साऱ्यांचे गणित चुकवून ग्रामीण जिल्ह्यात यंदा नवे राजकीय समीकरण तयार झाले. जुण्याजाणत्या उमेदवारांना धूळ चारून नवख्यांनी दिवाळीपूर्वीचे राजकीय कुस्ती जिंकली. पहिल्यांदाच विधानसभेची पायरी चढणाऱ्या या नवख्या आमदारांसमोर आता आश्वासनपूर्तीचे आव्हान आहे.
हिंगणा विधानसभेत भाजपचे विजय घोडमारे यांची तिकीट कापून समीर मेघे यांना उमेदवारी देण्यात आली. माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचा राजकीय वारसा समीर यांना लाभला आहे. मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असलेले मुरब्बी नेते रमेशचंद्र बंग यांच्याशी थेट लढत देण्यात टिकतील काय, अशी भीती अनेकांना होती. मात्र, नवख्या समीर मेघेंनी 84 हजारांवर मते घेऊन भाजपसह मेघे घराण्याची ताकद दाखवून दिली.
काटोल मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल देशमुख हे चारदा आमदार झाले. सलग 20 वर्षे त्यांनी मंत्री म्हणूनही मंत्रिमंडळात काम केले. त्यानंतरही भाजपचे उमेदवार डॉ. आशीष देशमुख यांच्यासमोर पराभव पत्कारावा लागला. या मतदारसंघात आजवर राष्ट्रवादीशिवाय अन्य मोठा पक्ष नव्हता. येथे शिवसेनेचे वर्चस्व असतानाही भाजपला मिळालेली मते परिवर्तनाची नांदीच म्हणावी.
रामटेक मतदारसंघात शिवसेना किंवा कॉंग्रेसशिवाय दुसऱ्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊच शकत नाही, हा भ्रम भाजपच्या डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या विजयाने मोडीत काढला. रामटेक म्हणजे शिवसेनेचा गड समजला जायचा. याच लोकसभा मतदारसंघातून सेनेच्या तिकिटावर सुबोध मोहिते निवडून आले होते. मात्र, हा गड आता भाजपच्या ताब्यात गेला आहे. रेड्डी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण जनतेच्या अडीअडचणी समजून समाजसेवा सुरू केली होती. त्याचे फळ यानिमित्ताने हाती पडले.
जिल्ह्यातील सावनेर, कामठी आणि उमरेड या तिन्ही मतदारसंघांत जुन्यांना संधी देण्यात आली. सावनेर वगळता जिल्ह्यातील सर्व पाचही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आली आहेत. राज्यात सत्ता स्थापन होत असल्याने सर्व भाजप आमदारांच्या आशा बळावल्या आहेत, तर ग्रामस्थ नवख्यांकडून विकासाच्या आश्वासनपूर्तीच्या अपेक्षेत आहेत.
बावनकुळेंना लालदिव्याची शक्यता?
कामठी मतदारसंघातून विजयाची हॅटट्रीक करून तिसऱ्यांदा आमदार झालेले चंद्रशेखर बावनकुळे यांना लालदिवा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या 25 वर्षांपासून राजकारणात असलेले बावनकुळे यांनी जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा प्रवास केला आहे. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि आता प्रदेश सचिव पदावर कार्यरत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जवळचे ते असून, त्यांनी बांधकाम खात्याच्या मंत्रिपदासाठी इच्छा बोलून दाखविल्याची माहिती सूत्रांनी दिली.