चंद्रपूर दि.02- केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे स्वच्छ भारत अभियानाचे सुरवात करण्यात आली. या निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी अधिकारी, कर्मचा-यांनी यांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, स्वीपचे नोडल अधिकारी सुरेश वानखेडे व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महात्मा गांधीनी ज्या भारताचे स्वप्न पाहीले होते. त्यामध्ये केवळ राजनैतिक स्वातंत्र्यच नव्हते तर एक स्वच्छ व विकसीत देशाची कल्पनाही होती. महात्मा गांधीनी गुलामीतून भारत मातेला मुक्त करुन स्वातंत्र मिळवून दिले. आता भारत मातेला अस्वच्छेतून मुक्ती देवून सेवा करणे आपले आद्य कर्तव्य आहे अशी शपथ या अभियानाच्या निमित्ताने अधिकारी, कर्मचा-यांनी घेतली.
मी स्वत:पासून, माझ्या कुटूंबापासून, माझ्या गल्ली-वस्तीपासून, माझ्या गावापासून तसेच माझ्या कार्यस्थळापासून स्वच्छेतेच्या कामास सुरवात करेल व दरवर्षी त्यासाठी 100 तास म्हणजेच आठवडयातून 2 तास श्रमदान करुन स्वच्छतेच्या या संकल्पाला पूर्ण करीन असा संकल्प यावेळी करण्यात आला. त्यासोबतच 15 ऑक्टोंबर 2014 रोजी होणा-या विधानसभा निवडणूकीत आपण व आपले कुटूंबीय तसेच इतर मतदारांना मतदान करण्याकरीता प्रवृत्त करण्याची शपथही यावेळी देण्यात आली. गेल्या वर्षी 2 ऑक्टोंबरलाच जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सहा गठ्ठे पध्दत सुरु करुन स्वच्छता मोहीम राबविली होती हे विशेष.