चंद्रपूर दि.08- मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 50 टक्क्यापेक्षा जास्त विक्री वाढलेल्या जिल्हयातील 17 दारु दुकानांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. दुकानदारांकडून उत्तर आल्यानंतर ते तपासून पुढील कारवाई केल्या जाणार आहे.
सध्या विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता सुरु असून आचारंसहिते दरम्यान दारुच्या विक्रीवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सुचना निवडणूक आयोगाच्या आहेत. त्यानुसार 12 सप्टेंबर 2014 ते 6 ऑक्टोंबर 2014 दरम्यान दारुबंदी कायदयान्वये एकूण 93 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 46 व्यक्तींना अटक करण्यात आली असून 1 लाख 38 हजार 275 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात देशी-विदेशी, ताडी, हातभट्टी, मोहा सडवा व मोहफुल रसायनाचा समावेश आहे.
17 दारु दुकांनाना नोटीस दिल्यानंतर त्यांचे उत्तर काय येते हे तपासून त्यांचेवर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क एस.सी.मनपीया यांनी सांगितले.