नाशिक:
शेतीमधून मिळणारे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही हे बघून त्यांनी पतीसमोर शेतीव्यवसायाबरोबर जोडधंदा करण्याची कल्पना मांडली. इतकेच नव्हे तर त्यासाठी कष्ट करण्याची तयारीही दाखविली. पतीनेही त्यांच्या कल्पनेचे आनंदाने स्वागत केले आणि सुरू झाला पोल्ट्री व्यवसाय. सुरुवातीला छोट्या प्रमाणावर असलेल्या व्यवसायाने आता मोठे रूप धारण केले असून, आज त्यांची वार्षिक उलाढाल किमान ८ ते ९ लाख रुपये इतकी आहे. ही यशोगाथा आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी येथील मनीषा भाऊसाहेब जाधव यांची.
भाऊसाहेब जाधव हे शेती करतात. शेतीमधून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने पतीची ओढाताण होते, हे त्यांची पत्नी मनीषा यांच्या लक्षात आले. त्यासाठी शेतीला जोड व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले.. विचारमंथनानंतर कुक्कुटपालन व्यवसाय करण्याचा निर्णय झाला आणि १९९६ साली प्राथमिक स्तरावर त्यास सुरुवात केली.
विविध ठिकाणी भेटी देऊन व्यवसायाची सखोल माहिती घेतली. मनीषा यांनी शासनाच्या पशुसंवर्धन केंद्राच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतले. सुरुवातीस जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ३ लाख रुपयांचे कर्ज घेत एकूण सुमारे ४ लाख रुपयांची गुंतवणूक करून ३१०० चौरस फूट जागेत शेड उभारले. सुरुवातीला २००० बॉयलर कोंबड्यांचे संगोपन करण्यास सुरुवात केली. कोंबड्यांचे चांगले संगोपन करून त्यांची विक्री केली असता त्यांना चांगले उत्पन्न मिळाले.
पोल्ट्रीफीडकमी दिवसात जास्त नफा आधी वापरून बघा मग विश्वास करा |
पहिल्या प्रयत्नाला आलेल्या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर व्यवसायाचा व्याप वाढविण्यास सुरुवात केली; मात्र २००२ मध्ये अचानक आर्थिक मंदीमध्ये अडकले. त्यावेळी त्यांनी १ रुपया किलोने कोंबड्यांची विक्री केली होती. त्यावेळी अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती; परंतु त्यांनी हार मानली नाही. कुटुंबाने दिलेला मानसिक आधार, इतर नातेवाईक व व्यापारी वर्गाने केलेली आर्थिक मदत या जोरावर मनीषा पुन्हा उभ्या राहिल्या, पुन्हा जोमाने व्यवसाय सुरू केला. आज मनीषा जाधव यांनी २०,००० चौरस मीटर जागेमध्ये आणखी ४ शेड उभे करून २० हजार कोंबड्यांचे संगोपन करत आहेत.
पोल्ट्रीफीडकमी दिवसात जास्त नफा आधी वापरून बघा मग विश्वास करा |
कोंबड्यांसाठी लागणारे खाद्य घरी बनवण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करून त्यासाठी लागणारे यंत्र खरेदी केले आहे. घरच्या कोंबड्यांसाठी लागणारे खाद्य पुरवून आता त्या नाशिक शहर, मुंबई, ठाणे तसेच गुजरात येथेही कोंबडी खाद्य विक्रीसाठी पाठवतात. त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे ८ ते ९ लाख रुपये इतके आहे. कोंबडी खताचीसुद्धा त्या विक्री करतात. पुढील काही दिवसात शेडची संख्या वाढवून सुमारे एक लाख कोंबड्यांचे संगोपन करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या कुक्कुटपालन व्यवसायामुळे स्थानिक बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. कुक्कुटपालन व्यवसायाकडे सकारात्मकतेने पाहिले तर खरोखरच हा फायद्याचा शेतीपूरक व्यवसाय असल्याचे मनीषा जाधव सांगतात.
पोल्ट्रीफीडकमी दिवसात जास्त नफा आधी वापरून बघा मग विश्वास करा |
सेवा:सदर वृत्त हे लोकमत वृत्तपत्रातून घेण्यात आले आहे.लोकमत -आकाश गायखे (नाशिक)