সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, July 17, 2015

रामदास निंगाली.... रेवस बंदरावरीऽऽऽ

रामदास निंगाली.... रेवस बंदरावरीऽऽऽ

१७ जुलै १९४७ चा तो काळाकुट्ट दिवस. रामदास बोटीला याच दिवशी जलसमाधी मिळाली. हे एक कठोर वास्तव, कठोर सत्य आहे. सारा दैवाचा खेळच म्हणावा लागेल. आजही त्या दिवसाची आठवण जरी झाली, तरी अनेकांचा काळजाचा ठोका चुकतो. जवळपास ७५०हून अधिक प्रवाशांना यात जलसमाधी मिळाली. शुक्रवारी या घटनेला ६७ वर्षे पूर्ण होत आहेत. याआधी अनेक लेखकांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून या मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पण, अलिबागच्या रोहित पाटील या गायक-संगीतकाराने आपल्या सहकार्‍यांची सोबत घेऊन सूरबद्ध केलेल्या गाण्यातून या दुर्घटनेतील प्रवाशांना भावनिक साद घालत श्रद्धांजली वाहिली आहे. हे गाणे शुक्रवारी रिलीज होत आहे.
या वास्तववादी विषयाला स्पर्श करुन गाण्याच्या माध्यमातून एक कल्पनाविश्‍व उभारण्याचा केलेला प्रयत्न येथे निश्‍चितच दिसून येतो. अंतरीच्या सतारातून सप्तसूर निनादावे, तसे मनाच्या भावनिक बंधातून उलगडलेले भाव या गाण्यातून जाणवतात. ‘रामदास निंगालीऽऽऽ रेवस बंदरावरीऽऽऽ’ हे गाणे आज एक वर्षाच्या मेहनतीने तयार झाले असून, ते रामदास बोट दुर्घटनेत जलसमाधी मिळालेल्यांना समर्पित करत असल्याचे संगीतकार रोहितने यावेळी भावनिक उद्गार काढले.
ती एक सायंकाळ. त्या दुर्दैवाच्या वणव्यात ही बोट सापडली आणि सार्‍यांचे जीवन सागरात भरकटून गेले. उद्ध्वस्त झाले. बोटीत बसून सुखाचे हिंदोळे खात असताना, अचानक दुःखाने दिलेली हुलकावणी आजही आपल्याला आठवतेच! दिवसभराची कामे आटोपून गटारी अमावास्या असल्याने कामावरुन सुट्टी घेऊन आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी आसुलेल्या मनाची तळमळ... पण, वास्तवाच्या वादळात, नियतीच्या भोवर्‍यात बोट सापडली अन् दुःखसागरात बुडाली. आणि, एका क्षणात फक्त भयाण... भेसूर भूतकाळ झाला. सागरा का हा ‘प्राण’ तळमळला? सुखसागरा, का रे दुःखाचा सागर होऊन बसलास! थकला-भागला चाकरमानी आपल्या घराच्या ओढीनं निघाला होता. पण, तो घरपर्यंत पोहोचला का?.. काळाने मध्येच त्याच्यावर घाला घातला. या दर्दभर्‍या, हृदय पिळवटून टाकणार्‍या कहाणीवर शेवट नियतीनेच विजय मिळवला.
६६ वर्षांपूर्वी घडलेल्या ‘रामदास’ या बोट दुर्घटनेच्या त्या कडवट स्मृतींना उजाळा रोहितने आपल्या गाण्याच्या माध्यमातून दिला आहे. आपला धनी आज घरला परत यावा, यासाठी पत्नी आर्ततेने त्याला हाका मारत असल्याचे काल्पनिक भाव या गाण्यातून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. आपला पती येणार म्हणून त्याची वाट पाहात समुद्रकिनारी उभी असलेली त्याची पत्नी. तिचा जीव त्याच्या भेटीसाठी कासावीस झाला आहे. पतीही वाट पाहात असलेल्या आपल्या पत्नीला टाकादेवीवर (आईवर) भरवोसा ठेवायला सांगतो. रेवस-मांडवा येथील ही टाकादेवी कोळी बांधवांचे श्रद्धास्थान आहे. तीच मला सुखरुप घरला आणेल, हा विश्‍वास तो आपल्या पत्नीला देतो. तू फक्त आपल्या पोराबाळांचा सांभाळ कर, हे सांगायलाही तो विसरत नाही. एका वादळानंतरची भयाण शांतता... तरीही तितकाच धाडसी भरवोसा या गाण्यातून पाहायला मिळतो. असे संपूर्ण चित्र रंगवण्यात आले आहे या गाण्यातून. संपूर्ण गाणे पारंपरिक कोळी भाषेचा वापर करुन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, त्या दुर्घटनेतून वाचलेल्या अलिबाग येथील बारक्याशेठ मुकादम यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे गाणे तीन कडव्यांचे झाले आहे. सुरुवातीस दोन कडव्यांचेच हे गाणे तयार करण्यात आले होते.
जुलै महिना असल्याने पावसाचे ते दिवस होते. त्या दिवशी तुफान पाऊस सुरू होता. मुंबईहून प्रवाशांना घेऊन रामदास बोट रेवसकडे निघाली. या बोटीत जवळपास हजारो प्रवासी होते. जोरदार वारे, तुफान पर्जन्यवृष्टी यामुळे ही बोट समुद्रात काशाच्या खडकाजवळ (तांदूळखाद्या) बुडाली आणि एकच हाहाकार माजला. बोटीतल्या जवळपास ७५० प्रवाशांना त्या दिवशी जलसमाधी मिळाली. ती दुर्दैवी घटना, तेव्हाच्या थरारक आठवणी ताज्या करताना रोहित आणि टीमने तयार केलेले गाणे ऐकल्यावर डोळ्यांच्या पापण्यांचा बांध फुटून नकळत अश्रूंना भरती येते. यावरून त्यावेळी काय परिस्थिती ओढावली असेल, त्या वास्तवाची कल्पना करुन आज आपल्याला फक्त अंदाज बांधता येऊ शकतो.
हे गाणे अशोक अभंगे, नवीन मोरे, विशाल अभंगे, रोहित पाटील यांच्या मदतीने लिहून तयार झाले आहे. लोणारे गावचे शिक्षक मोहन पाटील यांचेही मार्गदर्शन यासाठी झाले. एक महत्त्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते की, अशोक अभंगे या माणसाला सलामच करावासा वाटतो. कारण, हा माणूस अंध असूनही, डोळसाला लाजवील अशी त्याची किमया आहे. किमयागारच म्हणा ना! तबलावादन, गायन, गीतलेखन यामध्ये ते पारंगत आहेत. हाशिवरे हायस्कूलमध्ये संगीत शिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या मदतीनेच हे गाणे पूर्ण झाले. हा इथे प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. इतकंच नव्हे, तर या बोट दुर्घटनेतू वाचलेल्या बारक्याशेठ मुकादम यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. हे गाणे स्वतः रोहित पाटील आणि प्रज्ञा अभंगे या दोघांनी गायले असून, त्यांना कोरस म्हणून मयूर पाटील, तेजय म्हात्रे, लिनाक्षी शेडगे, पूजा म्हात्रे यांनी साथ केली आहे. संपूर्ण गाण्याचे संगीत संयोजन नवीन मोरे यांनी केले आहे. या गाण्याची सुरुवात ज्या अप्रतिम बासरीवादनाने झाली आहे, ती बासरी प्रथमेश साळुंखे यांनी वाजवली आहे. सनईवादन राजेंद्र साळुंखे, टालवादन, ढोलकी, ढोल, साईड र्‍हिदम वादनाची जबाबदारी मनीष थुमरे यांनी लीलया पेलल्याचे गाणे ऐकल्यावर आपणास लक्षात येईल. गाण्याबद्दल रोहित म्हणाला, मी आजपर्यंत सर्व प्रकारची गाणी केली. अजूनही करायची आहेत. रामदास बोटीला जलसमाधी मिळाली ही नैसर्गिक आपत्तीच होती. आणि, यावर आजपर्यंत गाणं झालं नव्हतं. ते माझ्याकडून व्हावं, आणि घराघरात पोहोचावे, यासाठी केलेला हा अल्पसा प्रयत्न आहे. म्हणूनच हा विषय निवडावा असं मला वाटलं. बोटबुडीच्या या घटनेवर गाणे करण्यासाठी आवश्यक सगळी ती माहिती मिळविण्यासाठी नवीन मोरे, विशाल अभंगे यांनीही चांगली मदत केली. आम्ही रेवस आणि अलिबाग याठिकाणी वारंवार भेटी देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली.
अलिबागमधील बारक्या मुकादम हे एकमेव जिवंत साक्षीदार आहेत या घटनेचे. ज्या-ज्या वेळी या दिवसाची आठवण होते, त्या-त्या वेळी त्यांनाही अश्रू अनावर होतात. त्यांच्याकडूनच याविषयाची अधिकाधिक माहिती मिळाली. त्यांनी दिलेल्या माहितीतून आम्ही या गाण्याचे तिसरे कडवे लिहिल्याचे रोहितने सांगितले. आज बारक्याशेठ ८६ वर्षांचे आहेत. वास्तव आणि कल्पना यात जरी जमीन-अस्मानाचा फरक असला, तरी नियतीच्या चक्रव्यूहात, वास्तवाच्या झंझावातात स्वप्नांचे मनोरे कोसळताना बारक्याशेठ यांनी पाहिलेत. आजही या गोष्टीने ते सावरलेत का? जिवंत साक्षीदार म्हणून ते नशीबवान ठरले असतीलही; पण... बारक्याशेठ आजही हसताना सोबती आणि रडताना दावेदार वाटतात या घटनेचे. त्यांच्या अश्रूंची किंमत करता येईल का? नाहीच. जरी हे आनंदाश्रू असले तरीही.
आज हे गाणे पूर्ण झाले आहे. आणि, ते जलसमाधी मिळालेल्या प्रवाशांना समर्पितही केले आहे. सागराने आपल्या कवेत या सार्‍यांना घेतले खरे; पण जे गेले त्यांच्या कुटुंबाचे जीवन अंधारमय झाले त्याचे काय? जे लोक सुखाच्या सागरावर स्वार होऊन घराकडे निघाले होते, त्यांना कुठे माहीत होते, आपल्यापुढे भला मोठा दुःखाचा डोंगर आहे तो. कसला हा नियतीचा खेळ? कुणाच्या वाट्याला येऊ नये असे दुर्दैव. का घडले असं? का कठोर झाली इतकी नियती? या कुठल्याच प्रश्‍नाचं उत्तर आजही नाही. उद्याही नसेल?

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.