
चंद्रपूरसह राज्यातील सहा वैद्यकीय महाविद्यालयांची एमसीआयने परवानगी नाकारली होती. त्यामुळे प्रकाश इटनकर, रामदास वाग्दरकर यांनी सर्व त्रुटी पूर्ण केल्यानंतरही केवळ श्रेयापोटी भाजप सरकारने चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी नाकारली असल्याचा आरोप करीत नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नागपूर खंडपीठाने एका आठवड्यात चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून 100 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते.
या निर्णयाविरोधात एमसीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 15 जुलैला सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाच्या आदेशाला कायम ठेवत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी दिली असल्याचे पत्र आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे एमसीआयचे संपूर्ण प्रयत्न निष्फळ ठरले. त्यामुळे केंद्र सरकारला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भातील आदेश जारी करावा लागला.