आयुष्यात माणूस म्हणून जगण्यासाठी धडपड
गोविल मेहरकुरे
चंद्रपूर : नकळत हातून चूक झाली; होत्याचे नव्हते झाले. नशिबी बंदिवानाचे जिणे आले. क्रोधातून घडलेल्या कृत्याच्या पश्चातापाचे भोग भोगताना पुढील आयुष्यात माणूस म्हणून जगण्यासाठी धडपड सुरू आहे. या धडपडीला विधायकतेचा आधार मिळावा, यासाठी कारागृहातील एका बंदिवानाने दुसऱ्या बंदिवानांना इंग्रजीचे धडे देणे सुरू केले आहे.
जिल्हा कारागृहात ए. बी. नक्कलवार सध्या शिक्षा भोगत आहे. राजुरा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ते 15 वर्षे शिक्षक होते. नक्कलवार यांना एका मुलीच्या विनयभंगाच्या आरोपाखाली शिक्षा सुनावली आहे. कारागृहात असताना कारागृह निरीक्षक जाधव यांना त्यांच्या भूतकाळाविषयी माहिती मिळाली. ते इंग्रजी विषय शाळेत शिकवीत असल्याचे कळले. त्यानंतर बुद्धपौर्णिमेचा दिवस साधून नक्कलवार यांनी इतर कैद्यांना इंग्रजीचे धडे देण्यास सुरुवात केली. कैद्यांकडून मिळालेल्या प्रतिसादाने खूश होत नक्कलवार यांनी स्वत: तीस वह्या आणि पेन बंदिवानांना दिल्या. तब्बल 15 कैदी सध्या इंग्रजीचे धडे गिरवीत आहेत. खून, दरोडा, अत्याचार यासारख्या गुन्ह्यांमधील आरोपींचा यात समावेश आहे. हे सर्व कच्चे कैदी आहेत. रोज सकाळी नऊ वाजता कारागृहातील ग्रंथालयामध्ये इंग्रजीचे वर्ग ते घेतात. त्यांना गृहपाठदेखील देण्यात येतो. कारागृहातील कामे आटोपून कैदी आपला गृहपाठ पूर्ण करतात. इंग्रजी प्रशिक्षणामुळे येथून सुटल्यानंतर समाजात वावरताना आत्मविश्वास येईल, असे या कैद्यांना वाटत आहे. अशा उपक्रमामुळे कैद्यांची नकारात्मक मानसिकता दूर होण्यास मदत होते, असे कारागृह शिक्षक ललित मुंडे यांनी सांगितले. न्यायालयाचे आदेश इंग्रजी भाषेतच निघतात. इंग्रजी भाषेचा उपयोग कच्च्या कैद्यांना त्यांच्यावरील आरोपांची स्थिती समजून घेण्यास सोईस्कर होते, असे कारागृह अधीक्षक जी. के. महल्ले यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.