नागपूर : जिल्ह्यातील 772 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यात 772 पैकी 397 ग्रामपंचायतींवर "महिला राज‘ आले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या 22ने जास्त आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गात महिलांचे आरक्षण प्रमाण जास्त आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी भगत यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रत्येक तेराही तालुक्यांतील लोकप्रतिनिधींसमोर आरक्षणाची प्रक्रिया सकाळी 11 पासून सायंकाळी 7 पर्यंत पार पाडण्यात आली. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद, महापालिका, ग्रामपंचायती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला होता. 50 टक्के महिलांच्या आरक्षणामुळे राजकीय क्षेत्रात महिलांना पुरुषांच्या बरोबरीत आणले गेले आहे. जिल्ह्यातील 772 ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीमध्येही 22 महिला अधिक आहेत.