निर्मिती, साठवणुक, वितरण आणि विक्री यावर प्रतिबंध
– एकनाथराव खडसे
मुंबई दि.२० जुलै –गुटखा, पान मसाला, सुगंधी / स्वादिष्ट तंबाखु व सुपारी, अपमिश्रकेयुक्त उत्पादित चघळण्याची तंबाखु इ. पदार्थांची निर्मिती, साठवणुक, वितरण आणि विक्री करण्यावर दिनांक २० जुलै, २०१५ पासून महाराष्ट्र शासनाने एक वर्षाकरीता प्रतिबंध घातला आहे. याबाबतचे निवेदन आज राज्याचे महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत नियम ४६ अन्वये केले.
खडसे यांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर झालेल्या शास्त्रीय संशोधनावरुन हे निष्पन्न होते की, गुटखा आणि पानमसाला हे किंवा तत्सम पदार्थांचे स्वातंत्र घटक या पदार्थांचे सेवन केल्यामुळे तोंडाचा सबम्युकम फायब्रोसिस, कर्करोग, ॲक्युट हायपर मेग्नेशिया, हृदयरोग, पोटाचा कर्करोग, प्रजनन व्याधी, आतडे, श्वसनाचे रोग होतात. असे पदार्थ सेवन करणाऱ्या राज्यातील जनतेच्या आरोग्यावर आणि विशेषत: तरुण पिढीवर त्याचे प्रचंड दुष्परिणाम संभवतात. बऱ्याच वैज्ञानिक व सामाजिक संस्थांच्या अहवालांमध्ये सुध्दा तंबाखु व सुपारी सेवनामुळे घातक आजार होतात, हे नमूद केले आहे. त्यामुळे अशा पदार्थांवर बंदी आणणे ही बाब वैज्ञानिक आणि सामाजिकदृष्ट्या गरजेचे आहे.
गुटखा व पानमसाला यांच्या सेवनाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी देशातील २६ राज्यांतील आणि ५ केंद्रशासित प्रदेशातील अन्न सुरक्षा आयुक्तांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत प्रतिबंधित अंमलबजावणीचे आदेश काढले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या दिनांक १६ डिसेंबर २०१४ च्या सर्वेक्षणानुसार राज्यांनी घातलेल्या प्रतिबंधामुळे गुटख्याची उपलब्धता आणि सेवन कमी झाल्यामुळे भारतीय युवकांच्या आरोग्यावर चांगला परिणाम झाला आहे.
मागील वर्षाच्या (२०१४) आदेशाची मुदत १९ जुलै, २०१५ रोजी संपली असुन त्यामुळे पुढील एक वर्षासाठी नविन आदेश तातडीने काढणे आवश्यक होते. त्यामुळे वरीलप्रमाणे प्रतिबंध घालण्याचा निर्णय झाला आहे, असेही खडसे यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.