সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, May 01, 2013

24 हजार 700 लोकांना रोजगार मिळणार


 महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
चंद्रपूर दि.01 -   जिल्हयात 33 मोठे उद्योग असून या उद्योगात 5 हजार 119 कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आहे. या उद्योगात 7 हजार 700 लोकांना रोजगार उपलब्ध झाला असून 99  मोठे व मध्यम उद्योग जिल्हयात येवू घातले आहेत त्याव्दारे 3 लाख 7 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून 24 हजार 700 लोकांना रोजगार मिळणार असल्याचे  पालकमंत्री संजय देवतळे यांनी सांगितले.

 जिल्हयात विविध विभागाच्या वतीने विकासाची कामे मोठया प्रमाणात होत असून या पुढेही सर्व सामान्यांच्या विकासासाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय देवतळे यांनी केले.   सुवर्ण जयंती राजस्व अभियानाअंतर्गत जिल्हयातील 1836 गावातील 4 लाख 85 हजार सातबाराचे संगणकीकरण करण्याचे काम  महसूल विभागाने केले असून ही मोठी उपलब्धी असल्याचे गौरोदगार त्यांनी महाराष्ट्र दिनी जिल्हा वाशियांना संबोधित करतांना काढले.
जिल्हा पोलीस मैदान येथे झालेल्या मुख्य शासकीय समारोहात पालकमंत्री संजय देतवळे यांनी  ध्वजारोहण केले.   या कार्यक्रमास जिल्हाधिकारी विजय वाघमारे, माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटुदखे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत डहाळकर, मनपा आयुक्त प्रकाश बोखड, उपविभागीय अधिकारी आशुतोष सलील, निवासी उपजिल्हाधिकारी पी.डी.बडकेलवार  व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हयात सुवर्ण जयंती राजस्व अभियान अतिशय प्रभावीपणे राबविल्या जात असून नागरीकांना लागणारे विविध दाखले वितरणासाठी जिल्हयात 294 शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात 44 हजार 685 दाखले वितरीत करण्यात  आले असून  762 फेरफार अदालतीच्या माध्यमातून 11 हजार 627 फेरफार वाटप करण्यात आल्याचे देवतळे म्हणाले.
  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्हयात यशस्वीपणे राबविण्यात येत असून   चंद्रपूर जिल्हा राज्यात तीस-या क्रमांकावर आहे.  गेल्या वर्षभरात 6 हजार मजूरांना 100 दिवस रोजगार मिळवून देण्यात आला आहे.  या योजनेवर 89 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून 39 लाख मनुष्य दिवस निर्मिती झाली आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गावमोहिमेत जिल्हयातील एकूण 106 गावांना पुरस्कार प्राप्त झाला असून  2 कोटी 58 लाख रुपयांचा पुरस्कार निधी वितरीत करण्यात आला आहे.  जिल्हयातील जास्तीत जास्त गावांनी  महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेत सहभागी होवून आपले गाव तंटामुक्त करावे असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
शासन गोरगरीब जनतेच्या पाठीशी सातत्याने राहत आले असून झोपडपट्टीधारकांना हक्काचे पट्टे देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.  याचा लाभ आपल्या जिल्हयातील सर्व घोषित झोपडपट्टीधारकांना होणार आहे.  चंद्रपूर शहरात या योजनेचा शुभारंभ घुटकाळा तलाव झोपडपट्टी येथून सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली असून अतिक्रमण नियमानुकूल होणार आहे असे देवतळे म्हणाले.
चंद्रपूर येथे वैद्यकिय महाविद्यालय व्हावे अशी अनेक दिवसापासून मागणी होती.  ही मागणी शासनाने पूर्ण केली असून वैद्यकिय महाविद्यालयासाठी बल्लारपूर बायपास रोडवर पागलबाबा मंदिराजवळ 25 एकर जागा देण्यात आल्याचे देवतळे यांनी भाषणात सांगितले.
 सन 2009 मध्ये पर्यावरण व वन मंत्रालयामार्फत 88 औद्योगिक क्षेत्रातील पर्यावरणविषयक बाबींचे सर्वेक्षण करण्यात आले.  सर्वेक्षण अहवालानुसार चंद्रपूर जिल्हा अतिप्रदूषित म्हणून घोषित केला आहे.  त्यानुषंगाने चंद्रपूर जिल्हयातील औद्योगिक क्षेत्रातील वायूप्रदूषण व जलप्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.
 अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी याना हक्काचे वन जमिनीचे पट्टे देण्यासाठीची प्रक्रिया सुरु असून जिल्हा समितीने 3 हजार 176 दावे मान्य केले आहेत.  भूमिअभिलेख कार्यालयाने 2230 दाव्यांची मोजणी पूर्ण केली असून 1171 प्रकरणांची  क प्रत निर्गमित  केली आहे. जिल्हा समितीने मंजूर केलेल्या सर्व दाव्यांना नियमानुकूल करण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरु असल्याचे पालकमंत्री देवतळे म्हणाले. विविध विभागात उत्कृष्ट कार्य करणा-या अधिकारी कर्मचा-यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी परिक्षाविधीन पोलीस अधिकारी एस.चैतण्य यांचे नेतृत्वातील परेडने उपस्थित मान्यवरांना सलामी  दिली. उपस्थितांचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी पी.डी.बडकेलवार यांनी मानले.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.