काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, August 27, 2013

 सिमावर्ती भागातील २१ मराठी शाळा बंद करण्याचा घाट

सिमावर्ती भागातील २१ मराठी शाळा बंद करण्याचा घाट

चंद्रपूर-  आंध्रप्रदेश राज्यातील सिमावर्ती भागातील २१ मराठी शाळा बंद करण्याचा घाट आंध्रप्रदेश सरकारने घातला आहे. चार मराठी शाळा दोन वर्षांपूर्वीच बंद झाल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या सिमेलागून असलेल्या आदिलाबाद जिल्ह्यात मोठय़ा संख्येने मराठी भाषिक वास्तव्याला आहेत. त्यांना आपल्या मातृभाषेत शिक्षण घेता यावे, यासाठी या भागात मराठी शाळा उघडण्यात आल्या. मात्र येथील मराठी शाळांना आता अखेरची घरघर लागली आहे. आंध्रप्रदेश सरकारची मराठीविषयाची अनास्थाच याला कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. 
या भागात २५ प्राथमिक, आठ माध्यमिक व तीन कनिष्ठ मराठी महाविद्यालये आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थी संख्याही मोठी आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हेतुपुरस्सर मराठी शिक्षकांची भरती केली जात नसल्याने या शाळा आता ओस पडू लागल्या आहेत, तर दुसरीकडे नवीन तेलगू शाळांना मान्यता देऊन मराठी विद्यार्थ्यांना तेलगू शाळांत प्रवेश घेण्याची सक्ती केली जात आहे. यामुळे मराठी भाषेतील शिक्षणाची गोडी असूनही मराठी भाषिक विद्यार्थी व त्यांच्या पालकांची तेथे गळचेपी होत आहे. यातील काही शाळा जीर्णावस्थेत उभ्या आहेत. त्याची डागडुजीही केली जात नसल्याने शाळांची अतिशय दुरवस्था झाली आहे. महाराष्ट्र व आंध्र प्रदेशाच्या सिमावर्ती भागातील खोगदूर, बेला, मांगरुड, कोब्बई, भेदोडा, दहेगाव, टाकळी, जुनोनी, आदिलाबाद, सोनखास येथील शाळांत मराठी शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने विद्यार्जनात अडचणी येत आहेत.
या पार्श्‍वभूमीवर काही दिवसांपूर्वी आदिलाबादेतील जिल्हा परिषदेसमोर मराठी शिक्षकांनी मोठे आंदोलन केले होते. मात्र आंदोलनादरम्यान केवळ पोकळ आश्‍वासनाशिवाय शिक्षकांच्या पदरी काहीही पडले नाही. शाळेच्या तुकड्यांमध्ये पूर्ण पटसंख्या असताना या शाळांकडे दुर्लक्ष करून तेलगू भाषेचे प्राबल्य वाढविण्यासाठी मराठी भाषेची गळचेपी केली, आरोप यामुळे होऊ लागला आहे.
एकीकडे महाराष्ट्र या मराठी भाषिकांच्या प्रदेशात विद्यार्थी मिळत नसल्याने मराठी शाळा बंद होत आहेत, तर दुसरीकडे तेलगू भाषिक आंध्रप्रदेशात विद्यार्थ्यांची पटसंख्या मराठीची अस्मिता टिकवून ठेऊन आहे.
आंध्रप्रदेशातील मराठी शाळांवर होणारा अन्याय महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारसमोर आणून दूर करावा, अशी मागणी आहे. 

मराठी शिक्षकांची पदोन्नती होत नसल्याने हे शिक्षक तेलगू शाळांतच शिकविणे पसंद करीत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे मराठी शाळा बंद होण्यामागे मराठी माणसांचीही अनास्था कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.
दहा हजार चंद्रपूरकरांना "ताप'

दहा हजार चंद्रपूरकरांना "ताप'

चंद्रपूर - पूरपरिस्थितीतून सावरत असलेल्या चंद्रपूरकरांना आता संसर्गजन्य आजारांना सामोरे जावे लागत आहे. जवळपास चार हजार 40 नागरिकांना या आजाराची लागण झाल्याचे महानगरपालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आले. मात्र, हा आकडा दहा हजारांच्या घरात आहे, अशी शक्‍यता आहे. 
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चंद्रपूर शहराला जवळपास तीनदा पुराचा विळखा बसला. अर्धे शहर पाण्याखाली गेले होते. नदीकाठावरील हजारो घरांत पाणी घुसले. पूर ओसरल्यानंतर पुराचे पाणी शिरलेल्या वस्त्यांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले. पाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनही जागोजागी फुटल्याने दूषित पाणीपुरवठा शहरात सुरू होता. पुरानंतर मनपाने हाती घेतलेली स्वच्छता मोहीमही फारशी परिणामकारक ठरली नाही. त्याचा परिणाम आता संसर्गजन्य आजारांमध्ये दिसून येत आहे. काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, आता साचलेले पाणी, घाण आणि हवामानातील बदल यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत.
पूरस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर होणाऱ्या आजारांच्या सर्वेक्षणाचे काम मनपाच्या आरोग्य विभागाने 18 जुलैपासून हाती घेतले होते. पुराचा फटका बसलेल्या वस्त्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. जुलै महिन्यांत 73 हजार 942 जणांची तपासणी केली. तेव्हा 768 जणांना विषाणूजन्य आजारांची लागण झाल्याचे दिसून आले. या रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. शहरातील नदीकाठावरील अनेक वस्त्यांत पाणी शिरले होते. अनेकांनी समाजमंदिर, महानगरपालिका शाळा, मंगल कार्यालयात आसरा घेतला होता. तेव्हाही सर्वेक्षणाचे काम चंद्रपूर शहरात सुरू होते. 22 ऑगस्टला हे काम पूर्ण झाले. त्यात एक हजार 972 जणांना विषाणूजन्य आजारांची लागण झाली होती. अतिसाराचे 465 रुग्ण पाहणीत आढळून आले. ज्वराने फणफणत असलेले दोन हजार 20 रुग्ण आढळून आले. या सर्वच रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.

Monday, August 26, 2013

संयुक्त महाराष्ट्रात विदर्भाचा विकास

संयुक्त महाराष्ट्रात विदर्भाचा विकास

विदर्भावर कोणताही अन्याय झालेला नाही. या भागाचा विकास करण्यासाठी वेगळ्या विदर्भाची गरज नाही. संयुक्त महाराष्ट्रातील विदर्भाचा विकास होऊ शकतो अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

मोतीराम साखरे शिक्षण प्रसारक मंडळातर्फे संचालित यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलात यशवंतराव चव्हाणांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, मंत्री अनिल देशमुख, डॉ. विजय गावित, मनोहर नाईक, बबनराव पाचपुते, आमदार प्रकाश डाहाके, आमदार संदीप बाजोरिया, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड, सुभाष ठाकरे, चंद्रकांत ठाकरे यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, विदर्भाचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादीजवळ दूरदृष्टी आहे. नागरिकांचा विश्वास तेवढा गरजेचा आहे. सिलिंग कायदा करण्यासाठी राज्य सरकारला मसुदा मिळाला आहे. पण हा कायदा राज्यात होऊ दिला जाणार नाही. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यापुढे राज्यसभेतून प्रतिनिधित्व करतील. २००९ च्या निवडणुकीत सुभाष ठाकरे यांना निवडणुकीचे तिकीट न देऊन आपल्या हातून चूक घडल्याबद्दल पवारांनी दिलगिरी व्यक्त केली. आगामी निवडणुकीत ही चूक सुधारली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून दिलासा मिळावा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून दिलासा मिळावा

चंद्रपूर - पूर आणि अतिवृष्टीने हजारो शेतकरी उघड्यावर आल्याने त्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून दिलासा मिळावा अशी मागणी होत आहे. पीककर्जाच्या व्याजदरात किमान एक टक्का सवलत आणि शासनाची नुकसानभरपाई कर्जात वळती न करण्याचा जिल्हा बॅंकेने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. उद्या वार्षिक सभा होत असल्याने संचालक मंडळ शेतकऱ्यांच्या हिताचे काय निर्णय घेतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

जिल्हाभरातील सुमारे दोन लाख हेक्‍टरचे पीक उद्‌ध्वस्त झाले आहे. सध्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. शासनाने नुकसानभरपाई देऊ केली असली, तरी तोकडी आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेने शेतकरी हिताच्या मुख्य उद्देशाला जागत दिलासा देणारे निर्णय घ्यावे, अशी मागणी होत आहे. उद्या जिल्हा बॅंकेची वार्षिक सभा होत असल्याचे यात दिलासा देणारे निर्णय व्हावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. जिल्हा बॅंकेने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना तसेच उत्तराखंड येथील पीडितांसाठी लाखोंची मदत केली आहे. जिल्ह्यातील सध्याची स्थितीही याहून वेगळी नाही. त्यामुळे जिल्हा बॅंकेकडून मदत अपेक्षित मानली जात आहे. सध्या सात टक्के व्याजदराने पीककर्ज दिले जाते. वेळेवर भरल्यास शासन यातील चार टक्के वाटा उचलते. उर्वरित तीन टक्‍क्‍यांपैकी किमान एक टक्का व्याजदरात चालू वर्षासाठी सवलत दिल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या जिल्हाबॅंक फायद्यात असल्याने हा भार सहजपणे पेलला जाऊ शकतो, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पूर्णपणे शेती उद्‌ध्वस्त झालेल्यांला दोन टक्के सवलत दिली, तरीही बॅंक ती सहन करू शकेल, इतकी सक्षम असल्याने हा निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत दिली जाणार असून, ती जिल्हा बॅंकेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम कर्जवसुलीसाठी वळती करू नये, अशीही मागणी होत आहे. विशेष म्हणजे, शासनानेही या आशयाच्या सूचना दिल्या आहेत.
गडचिरोली जिल्हा निर्मितीला  30 वर्षे पूर्ण

गडचिरोली जिल्हा निर्मितीला 30 वर्षे पूर्ण

गडचिरोली - जिल्हा निर्मितीला आज 30 वर्षे पूर्ण झालीत; मात्र विकास कासवगतीने सुरू आहे. दुर्गम भागांत नक्षल चळवळीमुळे दळणवळणाची साधने पोहोचली नाहीत. येथे लोह, खनिज, सिमेंट, हिरे यांसोबतच भरपूर वनौषधी आहेत. शासनाने जिल्हा विकास प्राधिकरणाला मंजुरी दिली. त्यामुळे आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे; पण त्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी समन्वयातून काम करण्याची गरज आहे. 

जिल्ह्यात अनेक निसर्गरम्य स्थळे, नद्यांचे संगम व ऐतिहासिक, धार्मिक स्थळे आहेत; परंतु दळणवळणाअभावी पर्यटनास वाव मिळाला नाही. मार्कंडेश्‍वर देवस्थान, चपराळा मंदिर, अभयारण्य, ग्लोरी ऑफ आलापल्ली फॉरेस्ट, भामरागड आदींचा समावेश आहे. येथील सागवान लाकूड देशभरात प्रसिद्ध आहे. येथील बांबू अतिशय लवचिक आहे. बांबूपासून विविध वस्तू तयार करण्यात येतात; मात्र उद्योग आणि पर्यटनस्थळांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्याचा थेट परिणाम जिल्हा विकासावर झाला आहे. सुरजागड प्रकल्पाला गती मिळत असतानाच माओवाद्यांनी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांची हत्या केली. त्यामुळे औद्योगिकीकरणाला मोठा धक्का बसला आहे. 

साक्षरतेत जिल्हा मागे 
10 लाख 71 हजार 795 लोकसंख्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पाच लाख 42 हजार 809 पुरुष व पाच लाख 28 हजार 982 महिला आहेत. येथे मुलींच्या जन्मदराचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. सहा लाख 74 हजार 955 साक्षरतेचे प्रमाण असून, त्यापैकी तीन लाख 88 हजार 208 पुरुष आणि दोन लाख 86 हजार 747 महिला साक्षर आहेत. मात्र, अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे दुर्गम भागांत शिक्षणाविषयी जनजागृतीची आवश्‍यकता आहे. 

धान उत्पादकांकडे दुर्लक्ष 
जिल्ह्यात ओलिताखालील क्षेत्र 54,944 हेक्‍टर इतके आहे. त्यापैकी 51,619 हेक्‍टर क्षेत्र तलाव, कालवे व बोड्या इत्यादी साधनांनी ओलीत केले जाते. 32.95 हेक्‍टर क्षेत्र विहिरींच्या पाण्याखाली आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 1968 व राज्य शासनाचे 21 असे 1989 तलाव आहेत. मागील वर्षी 4,744 विहिरी होत्या. जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प नाही. रेगडी येथील दिना हा एकमेव मध्यम प्रकल्प आहे. जिल्ह्यात भात हे मुख्य पीक आहे. 93.32 क्षेत्र या पिकाखाली आहे. याशिवाय मका, सोयाबीन, कापूस त्यानंतर उरलेल्या क्षेत्रात मिरची, रब्बी, ज्वारी, तीळ, भाजीपाला आदी पिके घेतली जाते; मात्र सिंचनाअभावी शेतकऱ्यांना अनेकदा दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागतो. कापसाप्रमाणेच धानाला हमी भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही, असे बोलले जाते. 

महिलांना रोजगार 
उद्योगविरहित जिल्ह्यात मोठे उद्योग नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराची समस्या भेडसावत आहे. जिल्ह्यात वनविभागातर्फे अनेक गावांमध्ये उदबत्ती प्रकल्प सुरू केल्याने हजारो महिलांना गावातच बारमाही रोजगार उपलब्ध झाला आहे. 

गोंडवाना आशेचा किरण 
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात शिक्षणाचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे शासनाने येथे स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना केली. या माध्यमातून येथील मुलांना व्यावसायिक शिक्षणासोबतच उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे; मात्र गावा-गावात इंटरनेट सुविधा तसेच दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची उपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

आदिवासींना हवे विकासाचे व्हिजन 
जिल्ह्यात आदिवासींची मोठी संख्या आहे. त्यांच्या विकासासाठी दरवर्षी आदिवासी विकास विभाग कोट्यवधी रुपये खर्च करतो; मात्र योजनांची अंमलबजावणी पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. आदिवासींसाठी योग्य नियोजन व व्यवस्थापनाचा मेळ असणाऱ्या दीर्घकालीन (लॉंगटर्म) योजना, प्रकल्पावर भर दिला गेला तरच छोट्या योजनांवर होणारा निधीचा अपव्यय टाळता येईल. जिल्ह्यात तेंदूपत्ता, बांबू, टोळ, मोह आदी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. येथे वनावर आधारित व्यवसाय सुरू केल्यास आदिवासी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. 

रेल्वे, सिंचन व उद्योगांची गरज 
जिल्ह्यात सुरजागड, देवलमारी, वैरागड येथे मोठे उद्योग सुरू करण्याची संधी आहे; मात्र सरकारचे याकडे दुर्लक्ष होत आहे. बेरोजगारांना कामे मिळत नसल्याने विकासात फारसा बदल झाला नाही. 14 हजार 412 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर वसलेल्या जिल्ह्यात दरवर्षी 1200 ते 1500 मिमी सरासरी पाऊस पडतो. येथे बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत; मात्र सिंचन प्रकल्प रखडल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दळणवळणाअभावी दुर्गम भागात आरोग्य, शिक्षण व कुपोषणासारख्या समस्या निर्माण झालेल्या आहेत.

Sunday, August 25, 2013

महानगरपालिकेतर्फे केतन बच्चुवार याचा सत्कार

महानगरपालिकेतर्फे केतन बच्चुवार याचा सत्कार


चंद्रपूर : विद्यार्थीदशेतच सादर केलेल्या शोधप्रबंधामुळे नासा सारख्या जागतिक अवकाश संशोधन संस्थेने दखल घेतल्याबद्दल २८ ऑगस्ट रोजी केतन बच्चूवार याचा महानगरपालिकेच्या महापौर संगीता अमृतकर यांच्या हस्ते मानपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे.
दुर्गापूर येथील वेकोलिचे अभियंता श्रीकांत बच्चुवार यांचा मुलगा असलेला केतन याने वरंगलच्या एनआयटीतून बी.टेक.चे शिक्षण घेत असतानाच 'कॉम्प्युटर व्हीजन इमेज प्रोसेसिंग' या विषयावर आठ शोधप्रबंध सादर केले. त्यातील एका प्रबंधाची नासाने दखल घेतली. हा प्रबंध नासाच्या ग्रंथालयात अभ्यासासाठी ठेवण्यात आला आहे. केतनचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण दुर्गापूरच्या सेंट मेरीजमध्ये तर, बारावीचे शिक्षण हैदराबादच्या नारायणा विद्यालयात झाले. बी.टेक. करत असतानाच 'कॉम्प्युटर व्हीजन इमेज प्रोसेसिंग' या विषयावर केतनने आठ शोधप्रबंध सादर केले. यात दूर अंतरावरून उच्च दर्जाचे छायाचित्र घेणे, एखाद्या फोटोवर केलेली खोडतोड शोधण्यासाठी डिजीटल फारॅन्सीक, हस्तलिखित शब्द संगणकीयकृत करण्यासाठी इमेज सेग्मेंटेशन या प्रबंधांचा समावेश आहे. 
केतनला 'मास्टर इन अल्पायईड मॅथेमॅटीक्स टू कॉम्प्युटर व्हीजन' या अभ्यासक्रमासाठी फ्रान्स शासनाने शिष्यवृत्ती दिली आहे. शोधप्रबंधामुळे सरळ द्वितीय वर्षात प्रवेश मिळाला असून, केतन हा वर्षभराच्या अभ्यासासाठी ३१ ऑगस्ट रोजी पॅरिसला रवाना होईल.
महाराष्ट्राची राजधानी नागपुरात हलवा

महाराष्ट्राची राजधानी नागपुरात हलवा

नागपूर हे महाराष्ट्र राज्याचे उपराजधानीचे शहर आहे व राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर हे भारतातील तेरावे मोठे नागरी क्षेत्र (urban conglomeration) आहे. नागपूर महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर, नागपूर जिल्हा व राज्याच्या नागपूर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपुरास 'संत्रानगरी' असेही संबोधतात कारण शहरातील संत्री प्रसिद्ध आहेत व संत्र्याची मोठी बाजारपेठ येथे आहे. विदर्भाची वारंवार होणारी उपेक्षा, इतर भागांच्या तुलनेत होणार असंतुलित विकास थांबवायचा असेल तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईहून नागपुरात हलवा,अशी मागणी आहे. .

नागपूरचा सर्वप्रथम उल्लेख १०व्या शतकातील ताम्रपटावर आढळतो. हा ताम्रपट देवळी (वर्धा) येथे मिळाला असून तो इ.स. ९४०चा आहे. छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडचा गोंड राजा बख्त बुलंद शहा याने १७०२ साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली. देवगड राज्यात त्या काळी नागपूर, सिवनी, बालाघाट, बैतूल आणि होशंगाबाद यांचा समावेश होत असे. बख्त बुलंद शहानंतर त्याचा मुलगा राजा चांद सुलतान देवगडच्या गादीवर आला. त्याने १७०६ साली त्याची राजधानी नागपुरास हलवली. त्याने जवळजवळ ३३ वर्षे राज्य करून नागपूर शहर भरभराटीस आणले.राजा चांद सुलतान याच्या मॄत्यूनंतर नागपूरवर भोसल्यांचे राज्य आले.इ.स.१७४२ मधे रघूजीराजे भोसले नागपूरच्या गादीवर आरूढ झाले.इ.स. १८१७ मधे सीताबर्डीच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव करून ब्रिटिशांनी नागपूरचा ताबा घेतला. इ.स.१८६१ मध्ये नागपूर सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरारची राजधानी करण्यात आली.

इ.स.१८६७ मध्ये नागपूरहून मुंबई शहरापर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीने रेलमार्ग विकसित केला आणि पहिली आगगाडी १८६७ मध्येच नागपूरहून निघाली. टाटा समूहाने देशातील पहिला कापड उद्योग याच शहरात सुरू केला.त्याच एम्प्रेस व मॉडेल मिल होत. भारतीय स्वातंत्र्य युद्धातदेखील शहराने महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात कॉँग्रेसची दोन अधिवेशने नागपुरात झाली व असहकार आंदोलन नागपूरच्या १९२०च्या अधिवेशनापासून सुरू झाले. स्वातंत्र्यानंतर सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरार भारतातील एक प्रांत बनला. १९५० साली मध्य प्रदेश राज्याची निर्मिती झाली व नागपूरला या राज्याची राजधानी होण्याचा मान मिळाला. १९५६च्या राज्य पुनर्रचना आयोगाने नागपूरसह वर्‍हाड(बेरार) बॉम्बे(मुंबई) प्रान्त राज्यात घातला. कालांतराने मे १, इ.स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व वर्‍हाड (विदर्भ)नव्या राज्यात आला. एके काळी देशाच्या भौगोलिक सुरक्षिततेच्या दृष्टीने नागपूरला भारताची राजधानी करण्याचाही प्रस्ताव होता. आज, नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते. १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमध्ये येऊन आपल्या लाखो अनुयायांबरोबर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

हे शहर महाराष्ट्राची उपराजधानी असल्यामुळे सुमारे दोन आठवडे चालणारे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठदेखील येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचे जन्मस्थान व मुख्यालय येथेच आहे.
नागपुरात अनेक राष्ट्रीय स्तराच्या सरकारी वैज्ञानिक संस्था आहेत- नॅशनल एनवायरन्मेंटल इंजिनियरिंग अँन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट (NEERI), सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च (CICR), नॅशनल रिसर्च सेंटर फॉर सायट्रस, नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल-सर्वे ऍण्ड लॅंड-यूज प्लॅनिंग, जवाहरलाल नेहरू नॅशनल अल्युमिनियम रिसर्च अँन्ड डेवलपमेंट सेंटर, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंडियाज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, चीफ कंट्रोलर ऑफ एक्सप्लोसि‍व्ह्वज ऑफ द पेट्रोलियम अँन्ड एक्सप्लोसिव्ह्ज सेफ्टी ऑर्गनायझेशन, साउथ सेंट्रल झोन कल्चरल सेंटर व भारतीय हवामान खात्याचे विभागीय मुख्यालय.
भारतीय सैन्याच्या दृष्टीने नागपूर महत्त्वाचे आहे. भारतीय वायुदलाच्या निर्वहन (maintenance) विभागाचे मुख्यालय नागपूरात असून दारुगोळा कारखाना, स्टाफ कॉलेज या संस्थादेखील शहरात आहेत. नागपूरजवळीलकामठी (Kamptee) हे उपनगर भारतीय सैन्याने रेजिमेंटल सेंटर ऑफ इंडियन आर्मीज ब्रिगेडसाठी स्थापन केलेली लष्करी संस्था(कॅंटोन्मेंट बोर्ड) आहे. या लष्कर हद्दीत नॅशनल कॅडेट कॉर्प्स ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूल, इन्स्टिट्यूट ऑफ मिलिटरी लॉ व इतर अनेक लष्करी संस्था आहेत. त्याचबरोबर नागपूरचे राष्ट्रीय नागरी संरक्षण महाविद्यालय भारत व परदेशातील विद्यार्थांना नागरी-रक्षण व आपत्कालीन व्यवस्थापनाचे शिक्षण देते. शहरात भारतीय वायुदलाच्या आय.एल-७६ या वाहतूक विमानांचा तळ(गजराज) आहे. नागपूरच्या भौगोलिक स्थानामुळे देशांतर्गत सर्व अंतराचे मोजमाप येथील सिव्हिल लाइन्स या भागात असलेल्या शून्य मैलाच्या दगडापासून (zero milestone) केले जाते.

शून्य मैलाचा दगड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या जगातल्या सगळ्यात मोठ्या संस्थेचे मुख्यालय नागपूर येथे डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार ह्यांनी १९२५ साली प्रस्थापित केले. मोहन मधुकर भागवतसध्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहेत. पेशाने हे पशुवैद्य आहेत.

हल्ली नागपूरचा विकास माहिती व तंत्रज्ञान विभागात जोर पकडत आहे. वी. आर. सी. ई टेलीफोन एक्स्चेंज ला लागून एस टी पी आय ची स्थापना झाली असून तिथे बऱ्याच कंपनीनी आपल्या शाखा उघडल्या आहेत. त्यात प्रामुख्याने पर्सिसटेंट चा समावेश आहे.

मराठी ही नागपुरातील सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मराठीची वऱ्हाडी बोलीभाषा विदर्भातील इतर भागांप्रमाणे येथेदेखील बोलली जाते. हिंदी भाषाइंग्रजी या शहरातील इतर भाषा आहेत. इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्या २,१२९,५०० इतकी होती.

नुकतेच नागपूरला भारतातील सर्वांत स्वच्छ व (बंगळूर नंतरचे) दुसरे सर्वांत हिरवे शहर असल्याचा मान मिळाला आहे. नागपूरमध्ये जागेच्या किंमती अजूनतरी मर्यादेत आहेत. पण रामदासपेठ व सिव्हिल लाइन्स परिसरातल्या जागांचे भाव मात्र खूप जास्त आहेत. नागपूर महानगरपालिका पुरेसे पाणी पुरवते त्यामुळे येथे पाणीटंचाई नाही परंतु राज्यातील वीजटंचाईमुळे येथे भारनियमन होते. शहरात वर्षभरात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. पोद्दारेश्वर राम मंदिर रामनवमीला भव्य शोभायात्रा आयोजित करते.सन २०१० हे या शोभायात्रेचे ३८वे वर्ष आहे.तसेच पश्चिम नागपूरात रामनगर येथूनही एक शोभायात्रा निघते.ती सन १९७६ साली सुरू झाली.उर्वरित भारताप्रमाणेच दिवाळी, होळी, दसरा हे सण जल्लोषात साजरे केले जातात. गणेशोत्सवदुर्गापूजा हे सण अनेक दिवस चालतात. ईद, गुरुनानक जयंती, महावीर जयंतीमोहर्रम हे सणदेखील साजरे होतात.'मारबत व बडग्या' हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच आहे. पुर्वी, बांकाबाई हिने ईंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणून बांकाबाईच्या, कागद व बांस वापरुन केलेल्या पुतळयाची तान्हा पोळ्याच्या दिवशी (पोळ्याचा दुसरा दिवस)मिरवणुक काढण्यात येते व मग त्याचे दहन होते.तिच्या नवऱ्याच्या पुतळ्याला बडग्या म्हणतात. सार्वजनिक उत्सवादरम्यान मानवी वाघ हा देखील एक प्रकार येथे बघावयास मिळतो.
देशाच्या नकाशावरील नागपूरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता देशाच्या पर्यायी राजधानीचा मान नागपूरला द्यावा अशी मागणी करून मुत्तेमवार यांनी खळबळ उडवली होती. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा चर्चेला आला असताना नागपूरला राज्याची राजधानी करण्याची मागणी करत आता त्यांनी थेट केंद्र सरकार व पंतप्रधानांचे याकडे लक्ष वेधले. राजकीय,ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मध्यभारताच्या राजधानीचा नागपूरचा दर्जा होता. १९६० मध्ये महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राजधानीचा दर्जा गमावणारे हे एकमेव शहर आहे. मात्र, त्यावेळी या शहराचे महत्त्व व दर्जा कमी होणार नाही आणि राज्याच्या अन्य भागाप्रमाणेच वागणूक मिळेल, अशी ग्वाही तत्कालीन सरकारने दिली होती. पण, गेल्या ५३ वर्षांत नागपूर, विदर्भाची उपेक्षाच झाली. विकासदर कमालीचा घटला. १९६० नंतर राजधानी झालेले भोपाळ, बंगळुरू, हैदराबाद, तिरुअनंतपुरम ही शहरे झपाट्याने पुढे निघून गेलीत. एक तपापूर्वी राजधानी झालेले रायपूरसुध्दा आज संपन्न झाले. या शहराने सर्व बाबतीत नागपूरला मागे टाकले, अशी व्यथाही त्यांनी मांडली.

राज्याची राजधानी नागपुरात स्थानांतरित केल्यास विदर्भ विकासाला चालना मिळेल आणि मुंबईवरील भार हलका होईल. या भागातील नागरिकांना राजधानी जवळ होईल. सुशासन, तक्रार व समस्यांची त्वरित दखल घेणे तसेच, स्थानिक समस्यांवर उपाय करणे सुकर होईल, असा विश्वासही खासदार मुत्तेमवार यांनी व्यक्त केला.

Friday, August 23, 2013

प्रिया तुमराम विद्यापीठातून  प्रथम

प्रिया तुमराम विद्यापीठातून प्रथम

चंद्रपूर- डा. विनायक तुमराम यांची कन्या प्रिया तुमराम हि नागपूर विद्यापीठातून एमएसस्सी भौतिकशास्त्र या विषयात प्रथम आली. तिला एक हजार गुणांपैकी ७३४ गुण मिळाले. ती नागप्रूर विद्यापीठाच्या क्यम्पस मध्ये शिकत आहे.

Wednesday, August 21, 2013

नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा निषेध

नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा निषेध

चंद्रपूर : पुरोगामी विचारवंत तथा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची आज सकाळी पुण्यात अज्ञात माथेफिरूंनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचे पडसाद चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातही उमटले.
येथील जटपुरा गेट परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ विविधस्तरातील सामाजिक कार्यकर्ते एकत्र आलेत. 'डॉ.नरेंद्र दाभोळकर अमर रहे' अशा घोषणा देत या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतातून कठोर शब्दात निषेध नोंदविला. डॉ.दाभोळकरांच्या मारेकर्‍यांना हुडकून काढून त्यांना फासावर लटकवा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन विरोधी कायदा पारित करावा, या मागणीसाठी डॉ.दाभोळकरांचा लढा सुरू होता. त्यागाचे आयुष्य जगणार्‍या या माणसाचे जाणे सर्वांसाठी वेदनादायी आहे. त्यांच्या मागणीप्रमाणे शासनाने अंधश्रद्धा विरोधी बिल पास करावे. त्यांना तीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे मनोगत यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. सभेला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोर पोतनवार, किशोर जामदार, नगरसेवक तथा चंद्रपूर सोशल अकॅडमीचे सचिव संजय वैद्य, प्रा.सुरेश चोपणे, प्रा.सुरेश दुधपचारे, इको-प्रोचे बंडू धोतरे, माकपचे जिल्हा सचिव राजेश पिंजरकर, पुरोगामी महिला समितीच्या मालती सगणे, सूर्यकांत खनके, अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप अडकीने, जिल्हा सचिव धनंजय तावाडे यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण ७२टक्के

जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण ७२टक्के

प्राथमिक जनगणना सार : मुलींच्या जन्मदरात वाढ

चंद्रपूर : २0११ च्या जनगणनेच्या राज्य प्राथमिक जनगणना सार नुसार चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख ४ हजार ३0७ एवढी आहे. एकूण लोकसंख्येपैकी १५ लाख ७८ हजार ६१५ नागरिक साक्षर असून साक्षरतेचे प्रमाण ७२ टक्के एवढे आहे. या सार नुसार जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे.
२0११ च्याजनगणनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यात एकूण पाच लाख ३६ हजार ६८६ कुटुंब असून तीन लाख ५६ हजार २२८ ग्रामीण तर एक लाख ८0 हजार ४५८ कुटुंब शहरी भागात राहणारे आहेत. २0११ च्या जनगणनेच्या राज्य प्राथमिक जनगणना सार नुसार जिल्ह्याची लोकसंख्या २२लाख चार हजार ३0७ एवढी असून ११लाख २३ हजार ८३४ पुरुष तर १0 लाख ८0 हजार ४७३ महिला आहेत. एकूण लोकसंख्येपैकी १४ लाख २८ हजार ९२९ नागरिक ग्रामीण तर सात लाख ७५ हजार ३७८ शहरी भागात राहतात.

मुलीच्या जन्मदरात चंद्रपूर जिल्हा राज्यात दुसरा तर आहेच. परंतु ज्या चार जिल्ह्यात २00१च्या जनगणेपेक्षा २0११ च्याजनगणनेत बाललिंग दरात वाढ दर्शविणारा आहे. जिल्ह्यात शून्य ते सहा वयोगटातील बालकांची संख्या दोन लाख ३१ हजार ३१६ असून एक लाख १८ हजार ४७१मुले तर एक लाख १२ हजार ८४५ मुली आहेत. यामध्ये एक लाख ५४ हजार ४६५ ग्रामीण भागात राहणारे तर ७८ हजार ८५१ शहरी भागात राहणारे आहेत.
२0११ च्या जनगणना करताना देशात राहणारे अनुसूचित जाती व जमातीची गणना करण्यात आली असून चंद्रपूर जिल्ह्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या तीन लाख ४८ हजार ३६५ असून यामध्ये एक लाख ७६ हजार ८९८ पुरुष तर एक लाख ७१ हजार ४६७ महिला आहेत. अनुसूचित जातीच्या एकूण लोकसंख्येपैकी एक लाख ८७ हजार ६४३ नागरिक ग्रामीण भागात तर एक लाख ६0 हजार ७२२ नागरिक शहरी भागात राहतात.
जिल्ह्यात ३लाख ८९ हजार ४४१ एवढीलोकसंख्या अनुसूचित जमातीची असून यामध्ये एक लाख ९६ हजार ७५३ पुरुष तर एक लाख ९२हजार ६८८ महिला आहेत. अनुसूचित जमातीच्या एकूण लोकसंख्येपैकी तीन लाख २३ हजार ७९६ नागरिक ग्रामीण भागात राहत असून ६५ हजार ६४५ नागरिक शहरी भागात राहतात. प्राथमिक जनगणनेनुसार जिल्ह्यात एक लाख ९२ हजार ५६८ नागरिक पूर्णवेळ शेतकरी आहेत. त्यात एक लाख २५ हजार ५१७ पुरुष तर ६७ हजार ५१ महिलांची संख्या आहे. तर शेतमजुरांची संख्या तीन लाख तीन हजार ५७ एवढी असून यामध्ये १लाख ५८ हजार २५१ पुरुष तर एकलाख ४४ हजार ८0६ महिला आहेत. पूर्णवेळ कामगार असणार्‍याची संख्या आठ लाख चार हजार ४३३ असून यामध्ये पाच लाख ३६ हजार ७५२ पुरुष तर दोन लाख ६७ हजार ६८१महिलांचा समावेश आहे. पाच लाख ८१हजार २१0 कामगार ग्रामीण भागात राहणारे आहेत. 
 चंद्रपूर जिल्ह्यात एकूण लोकसंख्येपैकी १५ लाख ७८ हजार ६१५ नागरिक साक्षर असून यामध्ये ८ लाख ७२हजार ५६५ पुरुष तर ७ लाख ६ हजार ५0 महिला आहेत. ग्रामीण भागातील साक्षर नागरिकांची संख्या९ लाख ६२हजार ३९४ तर शहरी भागातील ६लाख १६ हजार २२१ नागरिक साक्षर आहेत. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येचा विचार केल्यास साक्षरतेचे प्रमाण ७२टक्के एवढे आहे.  
आशा वर्करचा मृत्यू विष प्राशनाने

आशा वर्करचा मृत्यू विष प्राशनाने

नागभीड : सायगाटा येथील आशा वर्कर वंदना रत्नाकर पाटील या महिलेचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून या अहवालात तिचा मृत्यू विषाने झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाचे पोलिसांसमोर आणखीच मोठे आव्हान निर्माण झाले आहे. 

नागभीड - ब्रह्मपुरी राज्य महामार्गाच्या अगदी कडेला मेंढा (किरमिटी) गावाजवळ सायगाटा (ब्रह्मपुरी) येथील वंदना रत्नाकर पाटील या ४0 वर्षीय महिलेचा विवस्त्र व संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला होता. या प्रकाराने संपूर्ण तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. मृतदेहाची एकंदर अवस्था लक्षात घेता वंदनावर आधी अत्याचार करुन नंतर तिची हत्या करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त होत होता. पोलिसांनीही त्याच दिशेने तपास सुरू केला होता.

काल (दि. १९) येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने वंदनाचे शवविच्छेदन केले. नागभीड पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली. त्यावेळी वंदनाचा मोबाईल मिळाला. घटनास्थळी विषाच्या बाटलीचा शोध घेतला, पण ती घटनास्थळी दिसून आली नाही. अपर जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली व तपासाच्या दृष्टीने येथील ठाणेदार सुरेश ढोबळे यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
‘प्रकाश आमटे-द रियल हिरो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘प्रकाश आमटे-द रियल हिरो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील आदिवासीं साठी झटणार्‍या डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आधारित ‘प्रकाश आमटे-द रियल हिरो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हेमलकसात डॉ. प्रकाश आमटे यांनी फुलवलेले नंदनवन पाहण्याची संधी जगभरातल्या प्रेक्षकांना या चित्रपटाद्वारे मिळणार आहे.
‘हेमलकसा’ अतिशय दुर्गम प्रदेश जिथं वीज, रस्ते या सारख्या पायाभूत सुविधांचाही वणवा पण याच दुर्गम भागात आदिवासीं आणि वन्य प्राण्यांसाठी नंदनवन फुलवणार्‍या डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी मंदा आमटे यांचा जीवनपट या सिनेमातून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.
डॉ. प्रकाश आमटे द रियल हिरो मराठी चित्रपट । Dr. Prakash Amte The Real Hero Marathi Movie
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या दिग्दर्शिका समृध्दी पोरे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नक्षलवादी तसेच हिंस्त्र प्राण्यांशी सामना करत रोज नवनवीन आव्हानं पेलणार्‍या प्रकाश आमटे याचं समाज कार्य जगापर्यंत पोहचवण्याचा उद्देश या चित्रपट निर्मिती मागे आहे असं समृध्दी पोरं यांनी सांगितलं. या चित्रपटाची निर्मिती एकाच वेळी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषेतून करण्यात येत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण हेमलकसा इथं सुरू असून १४० तंत्रज्ञान आणि कलाकारांची टीम हेमलकसा इथं दाखल झाली आहे.डॉ. मोहन आगाशे, नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी यासारखे मातब्बर कलाकार या चित्रपटात आहेत. डॉ. मोहन आगाशे हे बाबा आमटे यांची व्यक्ती रेखा साकारत आहे. नाना पाटेकर यांनी तर चित्रीकरणाआधीच २० दिवस हेमलकसात आपला तळ ठोकला. आपण साकारत असलेल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी नानांनी तिथले राहणीमान, स्थानिक भाषा यांचा अभ्यास केला. त्याबरोबरच प्राण्यांना हाताळण्याचा सराव ही केला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तर आपल्या लहान मूलीला घेऊन चित्रकरणासाठी हेमलकसात दाखल झाली आहे. हेमलकसात प्रकाश आमटे आणि त्यांच्या परिवारासोबत व्यतीत घालवलेला वेळ हा लाईफ टाईम अनुभव असल्याची भावना कलाकार व्यक्त करत आहेत.

चित्रपटात वास्तविकपणा येण्यासाठी प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी यांनी सुरवातीच्या काळात ज्या वस्तूंनी संसार थाटला त्याच वस्तू चित्रकरणा दरम्यान वापरण्यात आल्या आहेत. शिवाय या भागातील माडिया, गोंड या २०० आदिवासींना चित्रीकरणात सामावून घेण्यात आलं आहे. प्रचंड थंडी, हिंस्त्र श्वापदं आणि दुपारी ४ नंतर पडणारा अंधार या समस्यांशी सामना करत या सिनेमाची टीम हेमलकसात सिनेमा साकारतेय. संपुर्ण टीमला गमबूट वापरण्याच्या सूचना ही प्रकाश आमटे यांच्याकडून देण्यात आल्या होत्या. अवघ्या ४० ते ४५ दिवसांत मराठी आणि हिंदी या भाषेत हा चित्रपट पुर्ण करण्याचं आव्हान या सिनेमाच्या कलाकार आणि तंत्रज्ञांनी स्वीकारलं आहे.

Tuesday, August 20, 2013

हत्येचा चंद्रपुरात निषेध

हत्येचा चंद्रपुरात निषेध

चंद्रपूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज सकाळी सव्वा 7च्या सुमाराला अज्ञात हल्लेखोरांनी खून केला. पुण्यामध्ये ओंकारेश्वर पुलावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. त्यातल्या दोन गोळ्या दाभोलकरांना लागल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या  घटनेचा येथील जटपुरा गेट परिसरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. यावेळी पि. एम जाधव, प्रदीप अडकीने, सुर्यकांत खनके, हिराचंद्र बोरकुटे उपस्थित होते.