चंद्रपूर, ता.३०: जिल्हयातील तीन नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसला एक, तर भाजपला दोन ठिकाणी सत्ता मिळाली.
सावली नगरपंचायतीच्या निवडणुकीत १० जागा जिंकून काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. तेथे राष्ट्रवादीला ५, तर बसपा व अपक्षास प्रत्येकी एक जागा मिळाली होती. पोंभुर्ण्यात भाजपने १० जागा जिंकून सर्वांना चीत केले होते.चिमूर नगरपंचायतीत भाजपला ६ जागेवर विजय संपादन करता आला होता. काँग्रेसला ५ , शिवसेना २ तर अपक्षांना ४ जागा मिळाल्या होत्या.
या तिन्ही नगरपंचायतींच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक आज पार पडली. त्यात सावली नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या रजनी भडके विजयी झाल्या. उपाध्यक्षपदी विलास यासलवार निवडून आले. येथे ब्रम्हपुरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेसने हा विजय मिळविला. चिमूर नगरपंचायतीत आ.किर्तीकुमार भांगडिया यांनी पूर्ण बहुमत नसतानाही सत्ता मिळवून दाखवली. तेथे भाजपच्या शिल्पा राचलवार विजयी झाल्या. उपाध्यक्षपदी तुषार शिंदे विराजमान झाले. पोंभुर्णा नगर पंचायतीत भाजपचे गजानन गोरंटीवार ११ मते घेऊन विजयी झाले, तर ईश्वर नैताम यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.