সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, March 29, 2015

घाटावरचा वाळूमाफिया

नागपूर -जिल्ह्यात एकूण 89 वाळूघाट आहेत. यातील 49 घाटांचे लिलाव 30 सप्टेंबर 2015पर्यंतच्या मुदतीसाठी करण्यात आले. जिल्ह्यातील कन्हान, कोलार, सूर, पेंच नद्यांच्या पात्रातून वाळूचा उपसा होतो. मात्र, सर्वच वाळूघाटांवरून परवाना नसतानाही माफियांकडून बिनदिक्कतपणे वाळूची चोरी होत आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. त्यासाठी प्रत्येकाचे हप्तेदेखील माफियांनी ठरविले आहेत. तहसीलदारांपासून तर तलाठ्यापर्यंत आणि पोलिसांपासून तर वाहतूक विभागापर्यंत हे हप्ते व्यवस्थित पोहोचविले जातात. वाळूघाटांवरून वाहन पकडल्याची कारवाई होताना दिसत नाही. एखादे वाहन पकडले तरी त्यांच्यावर क्षुल्लक कारवाई करून सोडून दिले जाते. जिल्हा प्रशासन मात्र वाळूघाटांवर नियंत्रण असल्याचा पोकळ दावा करते. वाळूची चोरी पूर्णपणे बंद असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. त्यानंतरही पोलिसांनी जप्त केलेल्या ट्रक, ट्रॅक्‍टरच्या कारवाईमुळे वाळूची चोरी सुरू असल्याचा पुरावाच आहे. रात्रीच्या वेळी वाळूची तस्करी करतात. एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यास त्यांच्या पथकावर हल्लाही केला जातो. वाळूमाफियात आपापसांत स्पर्धा निर्माण होऊन हाणामारी, गोळीबारीच्या घटना घडत आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने वाळूचे उत्खनन करताना काही नियम ठरवून दिले आहेत. 0.75 ते 1 मीटरपर्यंतच वाळूचे उत्खनन करण्याचे बंधन आहे. परंतु, या नियमांचे कोणीही पालन करीत नाहीत. तीन-चार मीटरपर्यंत उत्खनन करून मोठमोठे खड्डे केले जातात. त्याचेही शासनाला देणेघेणे नाही. मात्र, या खड्ड्यांमुळे पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांचा बुडून मृत्यू होतो.

वाळू घाट
सावनेर तालुका
खैरी ढोलगाव, इसापूर, बावनगाव, वाकी, गोसेवाडी, करजघाट, डोहणघाट, वाकोडी, रामडोंगरी, बडेगाव, रोहणा, दहेगाव, कोच्छी, वलनी, नंदापूर, टेंभूरडोह.

कामठी तालुका
बिना, वारेगाव, नेरी, उनगाव, चिकना, भानेवाडा.

ैमौदा तालुका
किरणापूर, मौदा चिकनघाट, महालगाव, पिंपळगाव, वढणा, पानमारा, कोटगाव.

पारशिवणी तालुका
पालोरा, पिपळा, साहोली, सिंगारदीप, जुनी कामठी, घाटरोहणा, वाघोडा, तामसवाडी, इटगाव, येसंबा, नयाकुंड, पारडी नवीन, सिहोरा, बखारी.

कुही तालुका
आवरमारा, चिचघाट.
--------------------
अधिकारी, राजकीय नेत्यांची मिलीभगत
धानला परिसरात वाळूचोरीचा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. अधिकारी सर्वसामान्य नागरिकांवर थातूरमातूर कारवाई करून खूपकाही केल्याचा आव आणतात. परंतु, मुळात खरे वाळूमाफिया अधिकारी व राजकीय नेतेच असल्याचे दिसून येते. तालुक्‍यात अधिकारी व राजकीय नेत्यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी सुरू आहे. यात बड्या राजकीय नेत्यांचा समावेश आहे. ठेकेदारीचा हा गोरखधंदा अप्रत्यक्षरीत्या सुरू असून, अधिकाऱ्यांना यातील वाटा पोहोचविला जातो. तालुक्‍यात रस्त्याचे काम, शासकीय इमारतीचे बांधकाम, आमदार-खासदार यांच्या फंडातील कामात वापरण्यात येणारी वाळू बहुतेक चोरीचीच असते. याबाबत सुज्ञ नागरिकांनी अधिकाऱ्यांना फोनवर काही माहिती देण्याचा प्रयत्न केल्यास फोन करणाऱ्यांना उलटसुलट प्रश्‍न केले जातात. त्यामुळे नागरिकांनी तक्रार करणे बंद केले आहे. सततच्या वाळू उत्खननामुळे तालुक्‍यात अनेक नद्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक वाईट घटनाही या ठिकाणी घडल्या आहेत. अवैध वाळूचोरी करणाऱ्या सर्वसामान्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो. परंतु, दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या राजकीय नेत्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. अनेक नेत्यांच्या घरी वाळू पोहोचविण्याचे काम राजरोस सुरू आहे. या प्रकरणात अनेक मोठे अधिकारी गुंतले असून, त्यांच्यावर कारवाई करेल कोण, हाच मोठा प्रश्‍न आहे.
......................
रात्री, पहाटेच्या वेळी उत्खनन
खापरखेडा परिसरातील कन्हान नदीपात्रातील साहोली वाळूघाटावरून मागील अनेक दिवसांपासून अवैधरीत्या वाळू उत्खनन सुरू आहे. रात्री व पहाटेच्या वेळी उत्खनन केले जाते. यामुळे शासनाचे लाखोंचे नुकसान होत आहे. वाळूघाटांच्या अवैध धंद्यावरून वाळूतस्कारांचे आपसांत खटके उडत असतात. अवैध वाळू व्यवसायासंबंधी काही वर्षांपूर्वी मित्रानेच एका नामांकित मित्राची धारदार शस्त्राने हत्या केली होती. वाळूचोरीवरून अनेक लहान-मोठ्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. रात्री आणि पहाटेच्या सुमारास वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जाते.
.....
तस्करांचे मनोबल वाढले
वाळूची सर्रास तस्करी सुरू असताना संबंधित विभागाकडून तस्करांना इत्थंभूत माहिती पुरविली जाते. त्यामुळे तस्करांचे मनोबल वाढले आहे. सारा प्रकार "तेरी भी चूप मेरी भी चूप' असा सुरू आहे. परंतु, यामुळे शासनाचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळू उत्खननावर कुणाचाही वचक राहिलेला नाही. पोलिस आणि महसूल विभागातील घरभेदींमुळे वाळू माफियांचे फावते.
....
सारेकाही मिळून मिसळून
साहोली वाळूघाटावरून ट्रक निघाले की, ट्रकमालक अथवा त्यांचे प्रतिनिधी भ्रमणध्वनीद्वारे क्षणाक्षणाला त्यांना माहिती देत असतात. घर बांधण्यासाठी कन्हान नदीच्या वाळूला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने साहोली घाटावरून मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जाते. वाळूचोरीशी संबंधित जवळपास सर्वच विभागांत तस्कारांचे हस्तक असल्यामुळे त्यांचे फावते. कोणत्या दिवशी धाड पडणार, कोण येणार आहेत, याची सारी माहिती माफियांना मिळते कशी, हा संशोधनाचा विषय आहे.
-----------------
बांधकामाला अवैध वाळू
वाळूमाफियांचा ब्राह्मणी आणि कळमेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू आहे. नागपूर शहरापासून जवळ तसेच औद्योगिक क्षेत्र, मोठमोठी महाविद्यालये या परिसरात आहेत. त्यामुळे बांधकामाच्या व्यवसायला सुगीचे दिवस आले आहेत. याचाच फायदा घेऊन वाळूमाफियांच्या टोळ्या येथे सक्रिय झाल्या आहेत. या रस्त्याने रात्रीच्या वेळी ओव्हरलोड ट्रकची वाहतूक सुरू असल्याचे दिसून येते. पोलिस ठाण्यासमोरून जाणारे ट्रक कसे काय दिसत नाहीत, हा प्रश्‍न पडतो.
.......
बायपास मार्ग बनला डम्पिंग यार्ड
कळमेश्वर-सावनेर बायपास रोडचे काम अपूर्ण आहे. या मार्गाला वाळूमाफियांनी डम्पिंग यार्ड बनविले आहे. येथे जागोजागी शेकडो ब्रास वाळू जमा केली जाते. हे ठिकाण तहसील कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. वाळूचा सर्वांत मोठा साठा घोराड-उबाळी रोडवरील सेंट थॉमस शाळेच्या बाजूच्या पडिक शेतात केला जातो. या अवैध साठ्याची कोणतीही शहानिशा किंवा जप्ती महसूल विभाग करीत नसल्यामुळे संबंधित खात्याचे माफियांसोबत आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय घेण्यास जागा आहे.
..................
नदीपात्रातून बनविले पांदण रस्ते
सावनेर तालुक्‍यातही वाळूचोरी वाढली आहे. घाटांचा लिलाव झालेला नसताना माफियांकडून बिनधास्तपणे वाळूची चोरी होत आहे. शासनाचे कोट्यवधींचे नुकसान होत असताना महसूल विभाग मात्र झोपेत आहे. वाळूचोरीसाठी माफियांनी कन्हान नदीपात्रालगतच्या शेतातून पांदण रस्ते बनविले आहे. मुख्य मार्ग सोडून पांदण रस्त्याने वाळूची वाहतूक केली जाते. घाटाचा लिलाव झाला नसला तरी माफियांकडून मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन सुरूच आहे.
........
आरटीओचाही सहभाग
जवळपास सर्वच वाळूघाटांमध्ये माफिया सक्रिय आहेत. अवैध वाहतुकीत वाळूमाफियांवर आरटीओचा वरदहस्त असतो. ट्रॅफिक पोलिसांसोबत असलेल्या ऋणानुबंधामुळे माफियांचे हौसले बुलंद आहेत. सावनेर तालुक्‍यातील वाळूघाटावरून खुलेआम वाळूचोरी होते. हीच वाळू दुप्पट किमतीत विकली जाते.
.....
अधिकारी-माफियांमध्ये हाणामारी
वाळू नदीघाटाचा कंत्राट घेऊनही माफिया वाळूचा प्रामाणिकपणे उपसा करीत नाही. कन्हान नदीकाठावर वसलेल्या गावांमध्ये गाव विकासाकरिता शासकीय निधीतून रस्ते बांधकाम व नाली बांधकामास मंजुरी दिली जाते. या कामात अवैध वाळूचा वापर केला जातो. सहा महिन्यांपूर्वी वलनी येथे महसूल विभाग अधिकारी आणि अवैध माफियांमध्ये हाणामारी झाली होती. तरीही वाळूचोरीचे प्रमाण कमी झाले नाही. मागील हिवाळी अधिवेशनात सावनेरचे तहसीलदार रवींद्र माने यांच्यावर वाळूचोरीवरून निलंबनाची कारवाई करण्यात आली. तहसीलदार माने पुन्हा रुजू होऊन वाळूमाफियांवर कशाप्रकारे अंकुश लावतात याकडे वाळूमाफियांचे लक्ष लागले होते. परंतु, महसूल विभागाकडून कारवाईच करण्यात आली नाही. सावनेर तालुक्‍यातील खापा, वलनी, सावली गावाजवळील घाटामधून मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन केले जाते.
......
न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष
कन्हान क्षेत्रातील शिवरा, जुनी कामठी व घाट रोहणा या तीन घाटांचा लिलाव जानेवारी महिन्यात करण्यात आला. परंतु, घाटावरून नियमबाह्यरीत्या वाळूउपसा सुरू आहे. न्यायालयाचे आदेशानुसर सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत वाळू उपसा करता येतो. परंतु, रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळूउपसा सुरू आहे. एवढेच नव्हे, तर पोकलाइन मशीनद्वारे 4 ते 5 फूट किंवा त्यापेक्षा अधिक उपसा केला जातो. शिवरा, घाटरोहणा, जुनी कामठी येथे दोन-दोन पोकलाइन मशीनद्वारे वाळूउपसा सुरू आहे. नियमांना तिलांजली देत हा सारा प्रकार सुरू आहे. पोलिस, पटवारी, महसूल अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे.
............
पुढाऱ्यांच्या नावे धाक
मौदा पोलिस व महसूल विभागाच्या डोळेझाकपणामुळे तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरू आहे. कन्हान, सांड व सूर नदीपात्रातील वाळूची दिवसाढवळ्या चोरी होत आहे. राजकीय पुढाऱ्यांची भीती दाखवून माफियांकडून रात्रभर वाळूची वाहतूक केली जाते. तालुक्‍यातील माथनी, केसलापूर, वळना, चिकना, रहाडी, नानादेवी, मोहखेडी घाटावरून राजरोसपणे वाळूची वाहतूक सुरू आहे.
....
200 च्या वर ट्रॅक्‍टरचा वापर
ैमौदा तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात वाळूचोरी सुरू आहे. दरररोज 200 च्या वर ट्रकांमधून वाळूची वाहतूक होते. या अवैध वाहतुकीची पूर्वकल्पना पोलिस, बीट जमादार, ठाणेदार, तलाठी, कोतवाल व तहसीलदारांना असते. परंतु, कुणावरही कारवाई केली जात नाही. तहसीलदारांकडे तक्रार केल्यास रिकाम्या ट्रकवर कारवाई केली जाते.
.....
चोरट्यांची हिंमत वाढली
वाढत्या वाळूचोरीबद्दल पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई केली जात नाही. त्यामुळे चोरट्यांची हिंमत वाढली आहे. मौद्यात अनेक वाळूचोरटे, ट्रकमालकांकडून पोलिस 3,200 रुपये दंड वसूल करून स्वत:चीच पाठ थोपटून घेतात. कागदोपत्री कारवाई करून स्वत:ला व पर्यायाने वाळूचोरट्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार पोलिस व महसूल विभागातील अधिकारी करीत आहेत.
................................
चौधरी ब्रदर्सचा वचक
कर्तबगार अधिकाऱ्यांच्या बाबतीत मौदा तालुका नेहमीच कमनशिबी ठरला. परंतु, 2006-07 मध्ये मौद्याचे तहसीलदार सुभाष चौधरी व पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चौधरी यास अपवाद ठरले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात तालुक्‍यातील अवैध धंद्यांना लगाम लावला. पुरुषोत्तम चौधरी यांनी अवैध दारूविक्री, जुगारअड्डे, कोंबडबाजार कायम बंद केले. तर तहसीलदार सुभाष चौधरी यांनी अवैध गौण खनिज उत्खनन, वाळूचोरी, रेशनिंगमधील काळाबाजार यावर अंकुश लावला. "तत्काळ तक्रार- तत्काळ कारवाई' असे त्यांच्या कामाचे सूत्र होते. शहरातील अतिक्रमण काढण्याची हिंमत सुभाष चौधरी यांनी दाखविली. परंतु, त्यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. वाळूचोरी कारवाईदरम्यान त्यांच्या अंगावर ट्रक चढविण्यात आला. परंतु, यात ते वाचले. काही दिवसांनंतर वाळूमाफियांनी कटकारस्थान रचून त्यांना ऍट्रॉसिटी कायद्यात अडकविले. त्यातून ते निर्दोष सुटले. परंतु, सततच्या मानसिक छळामुळे त्यांनी स्वत:ची बदली करवून घेतली.

धमकी देऊन पळविले ट्रक
भिवापूर-उमरेड मार्गावर पोलिस आणि महसूल प्रशासनाने वाळूचोरीविरुद्ध कारवाई सुरू केली होती. रस्त्यावरील एका धाब्याजवळ तीन ट्रक चौकशीसाठी थांबवून ठेवण्यात आले. तिथे बंदोबस्तासाठी दोन पोलिस होते. मात्र, माफियांनी त्यांना न जुमानता त्यांच्या डोळ्यांदेखत ट्रक पळविले. कारवाईची माहिती होताच चालकांनी वाहनातील वाळू रस्त्यावर टाकून पोबारा केला. त्याची तपासणी महसूल कर्मचारी विराज वासेकर हे करीत होते. मात्र, माफियांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला.
.....
कन्हानजवळील वाळूघाटावर आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून गोळीबार आणि तलवारबाजी झाली. ही घटना जिल्ह्यासाठी दुर्दैवी आहे. वाळूमाफियांचे सातत्याने वर्चस्व वाढत असल्याचे या घटनेवरून दिसून येते. परंतु, जिल्हा प्रशासन आता त्यांची गय करणार नाही. थेट गुन्हे दाखल करून त्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येईल. प्रत्येक वाळूघाटावर पोलिस चौकी तयार करण्यात येणार असून, नाकाबंदी केली जाईल. जेणेकरून वाळूचोरीला पायबंद बसेल. वाळूमाफियांकडून अधिकाऱ्यांवरही हल्ले होत आहे. त्याचाही आम्ही बंदोबस्त करीत आहोत.
- अभिषेक कृष्णा
जिल्हाधिकारी

अवैध वाळू वाहतुकीवर प्रतिबंध लावण्याचे काम महसूल विभागाचे आहे. पोलिस विभागाला त्यांच्या क्षेत्रातील अनेक कामे असतात. त्यामुळे वाळूचोरीवर निर्बंधासाठी महसूल विभागाने काहीतरी ठोस उपाययोजना करावी.
-बी. एम. गायगोले, पोलिस निरीक्षक, मौदा
....................... 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.