সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, March 11, 2015

पायात पेन धरून सोडविले पेपर

सावनेर,   : दहावी, बारावीची परीक्षा म्हटली की शहरातील मुलांचे काय कोडकौतुक होते. अंगारे, धुपारे, संतुलित आहार, तज्ज्ञांचे मागदर्शन, मनमर्जी सांभाळणे, पालकांची सुटी... ही यादी कितीही मोठी होऊ शकते. अशा लाडावलेल्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम पारशिवनी मार्गावरील कोथुर्णा येथील जयनारायण सेवते याच्या शिकण्याच्या जिद्दीने केले आहे. आत्यंतिक गरिबी, आईचा मृत्यू, वडिलांचा अपघात यामुळे ओढवलेल्या परिस्थितीमुळे उगवणारा प्रत्येकच दिवस त्याची परीक्षा घेत असतो. नुकतीच त्याची इयत्ता बारावीची वाणिज्य शाखेची परीक्षा संपली. त्यात या पठ्ठ्याने पायाच्या बोटांत पेन धरून पेपर सोडविले....अगदी सामान्य मुलांच्या वेगाने.

जन्मतःच हात नसलेल्या जयनारायणच्या संघर्षाचा प्रवास लहानपणापासून सुरू झाला आणि त्याचा कुठलाही बाऊ न करता तो परिस्थितीशी झगडतो आहे. हात नसल्यामुळे सर्व कामे पायांनीच करावी लागतात. लिहिण्याचाही प्रश्‍न होताच. मात्र, बालपणापासून तो हाताची कामे पायाने करायला शिकला. जेवणे, चहा पिणे यापासून ते मोबाईलवर बोलण्यासाठी तो पायाचाच आधार घेतो. आठवीपर्यंतचे त्याचे शिक्षण कोथुर्णा येथेच झाले. नववीपासूनचे शिक्षण त्याने नागपुरातील शासकीय वसतिगृहात राहून झाले. इयत्ता बारावीची परीक्षा त्याने सदरच्या तिडके महाविद्यालयातून दिली. सोमवारीच त्याचा शेवटचा पेपर होता. या परीक्षेसाठी लेखनीकाची मदत न घेता पायानेच पेपर सोडवले. विशेष म्हणजे, अपंगांना वेळेची सवलत असूनही अन्य विद्यार्थ्यांपेक्षा कमी वेळात पेपर सोडवून सगळ्यांनाच चकित केले.
वयाच्या आठव्या वर्षी शेतात मजुरीसाठी गेलेली आई वनिता हिचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. त्यानंतर पाच वर्षांनी वडील धनराज सेवते यांना कार अपघातात पाय गमवावा लागला. कसेबसे पडेल ते काम, मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या त्याच्या कुटुंबात दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. मोठी बहीण दुर्गा हिने आठव्या वर्गात असतानाच शाळा सोडली. मजुरी करून ती पैसे कमावू लागली. भाऊ महेंद्र याला वयाच्या सोळाव्या वर्षी अर्धांगवायूचा झटका आला. लहान बहीण रूपाली ही कोथुर्णा येथील शाळेत आठव्या वर्गात शिकत आहे.
आईच्या मृत्यूनंतर शासनाकडून मिळालेल्या एक लाखाच्या मदतीतून 20 हजार रुपये उपचारावर खर्च झाले.
स्वत:चे घर वा शेती नाही. इंदिरा आवास योजनेअंतर्गत मिळालेल्या शासकीय घरात या कुटुंबाचे वास्तव्य आहे. जयनारायणला शिक्षणाची आवड आहे. त्याच्या घरातील देवघरात अनेक देवतांचे फोटो आहे. त्यातील एखादा तरी देव संकटकाळी धावत येईल, असा त्याला विश्‍वास आहे. दहावीच्या परीक्षेत त्याने लेखनीकाची मदत घेतली होती. त्यात टक्‍के कमी मिळाल्यामुळे त्याने बारावीचे पेपर स्वतःच सोडविण्याचा निर्णय घेतला. शिक्षण पूर्ण करून बॅंकेत नोकरी करण्याची त्याची इच्छा आहे.

संपर्क : जयनारायण सेवते- 8180900396

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.