एकनाथराव खडसे
मुंबई : राज्यातील मद्य निर्माण करणाऱ्या निर्माण्यांकडून मिळणारे अनुज्ञप्ती शुल्क आकारण्याची पध्दत सध्या उत्पादनाच्या टप्प्यावर आहे. या पध्दतीत मद्याचे कमी उत्पादन करणाऱ्या व्यक्तीस जास्त अनुज्ञप्ती शुल्क व जास्त मद्य उत्पादन करणाऱ्या व्यक्तीस फारच कमी प्रमाणात अनुज्ञप्ती शुल्क आकारण्यात येते. परीणामी लहान उद्योजकांचे नुकसान होत होते. त्यामुळे या पध्दतीत बदल करुन आता मद्य निर्माता तो उत्पादित करीत असलेल्या प्रत्येक बॉक्स मागे अनुज्ञप्ती शुल्क आकारण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे जास्त मद्य उत्पादन करणाऱ्या निर्मात्यास सध्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात शुल्क भरावे लागेल. तर, कमी उत्पादन करणाऱ्या मद्य उत्पादकास कमी शुल्क भरावे लागेल. यामुळे महसुलामध्ये वाढ होईल, अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज मंत्रालयात दिली.
खडसे यावेळी म्हणाले की, नवीन पध्दती अवलंबिल्यानंतर विदेशी मद्य उत्पादकाच्या शुल्कामध्ये रु. 12 (बारा) आणि रु.9 (नऊ) तसेच देशी मद्य उत्पादकाच्या शुल्कामध्ये रु.10(दहा) व रु.7(सात) असे दोन टप्पे करण्यात आलेले आहेत. यापुढे विदेशी मद्याची निर्मिती करणाऱ्या निर्माण्यांसाठी अनुज्ञप्तीच्या नुतनीकरणाकरीता किमान 25(पंचवीस) लाख रुपये तर, देशी मद्य उत्पादक निर्माण्यांसाठी 20(वीस) लाख रुपये दर राहणार आहे. ग्रामीण भागातील एफएल-3 अनुज्ञप्तीसाठी अर्थात परमिट रुम साठी किमान शुल्क 50(पन्नास) हजार रुपये एवढे ठेवण्यात आले आहे.
समारंभासाठी तात्पुरती अनुज्ञप्ती शुल्क खडसे पुढे म्हणाले की, शहरात तसेच ग्रामीण भागात विविध समारंभासाठी मद्य विक्री करावयाची असल्यास तात्पुरती क्लब अनुज्ञप्ती देण्यासाठीचे शुल्क 13,000 (तेरा हजार) रुपयांपेक्षा जास्त होते. यामध्ये आता सुसूत्रता आणण्यात आली असून, 20 लाख पेक्षा कमी लोकवस्ती असलेल्या शहरात 100 व्यक्तींच्या समारंभासाठी 7,000 (सात हजार) रुपये व त्यापेक्षा जास्त लोक असल्यास 10,000 (दहा हजार) रुपये अनुज्ञप्ती शुल्क आकारण्यात येणार आहे. तर 20 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात 100 लोकांच्या समारंभासाठी मद्य विक्री अनुज्ञप्तीचे शुल्क 10,000 (दहा हजार) रुपये व त्यापेक्षा जास्त लोक असल्यास 15,000 (पंधरा हजार) रुपये आकारण्यात येणार आहे. नवीन बदलामुळे उत्पादन शुल्कापोटी मिळणाऱ्या महसुलात वाढ होऊन तो 650 कोटी पर्यंत मिळण्याची शक्यता आहे, असे खडसे यांनी शेवटी सांगितले.