সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, May 02, 2011

ताडोबात जिप्सींना "नो-एंट्री'

चंद्रपूर - ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांना "ताडोबादर्शन' घडविणाऱ्या विनापरवाना जिप्सी आज (ता. 1)पासून बंद करण्यात येणार आहेत. केवळ परिवहन विभागाची अधिकृत कागदपत्रे असलेली खासगी वाहने आणि टुरिस्ट परवाना असलेल्या भाडेतत्त्वावरील वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
देशभर ख्याती असलेल्या ताडोबातील पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाघांसाठी देशात प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात राज्यासह विदेशांतील पर्यटक येत असतात. दिवसभरात सुमारे 60 वाहनांतून जवळपास 300 पर्यटकांची गर्दी होत असते. त्यांना जंगलभ्रमंती सोयीची व्हावी म्हणून येथे 40 टुरिस्ट जिप्सी आहेत. स्थानिक आणि बाहेरच्या काही लोकांनी जिप्सी खरेदी करून आपला व्यवसाय सुरू केला आहे. यात आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथून नऊ ते 10 जिप्सी येथे आल्या आहेत. मात्र, त्यांच्याकडे कोणताही पर्यटन परवाना नाही. परप्रांतांतून आलेल्या वाहनांची हस्तांतरण कागदपत्रे तयार करण्यात आलेली नाहीत. परिवहन खात्याचे नूतनीकरण झालेले प्रमाणपत्र त्यांच्याकडे नाही. 40 पैकी 36 जिप्सी खुल्या आहेत. विनापरवाना चालणाऱ्या याच वाहनांमुळे शासनाचा महसूलही बुडाला आहे. येथे चालविण्यात येणाऱ्या सारस, सारई आणि ताडोबा रिसॉर्ट यांच्याकडेही जिप्सी आहेत. मात्र, त्यांच्याकडेही परिवहन खात्याचे पत्र नसल्याचे समजते. यासंदर्भात उपपरिवहन अधिकाऱ्यांनी दोनदा छापे घातले होते. मात्र, छाप्याची आधीच चुणूक लागत असल्याने जिप्सीमालक आणि चालक सापडलेले नाही. परजिल्ह्यातील आणि आंध्रातील जिप्सीमालक इंटरनेटच्या माध्यमातून आधीच पर्यटकांची नोंदणी करून घेतात. त्यामुळे स्थानिक जिप्सीमालकांना पर्यटकच भेटत नव्हते. खासगी वाहनांनी येणाऱ्या पर्यटकांना जिप्सीचालकांच्या मनोपल्लीचा फटका बसू लागला.

यासंदर्भात अनेकदा वृत्त प्रकाशित झाले. मात्र, अधिकाऱ्यांनी थातूरमातूर कारवाई केली. दरम्यान, मागील आठवड्यात खासदार हंसराज अहीर यांना जिप्सीचालकांची मनोपल्ली डोळ्याने बघता आली. खासदारांच्या कार्यकर्त्यांचे जिप्सी संघटनेच्या लिपिकासोबत बाचाबाचीचे प्रकरण गाजले. अगदी हीच बाब हेरून खासदारांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यामुळे आता जिप्सीचालकांच्या व्यवसायावर गदा आली आहे. एक मेपासून विनापरवाना जिप्सी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी वाहनांनी जाताना चालकाजवळ परवाना, वाहनाची संपूर्ण कागदपत्रे जवळ असणे आवश्‍यक आहे. शिवाय भाडेतत्त्वावरील वाहनांना टुरिस्ट परवाना असणे बंधनकारक करण्यात आले आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर आता उपविभागीय परिवहन खात्याचे अधिकारी तैनात करण्यात येणार असून, ते कागदपत्रांची तपासणी करतील.
ताडोबातील गाइड करणार धरणे
चंद्रपूर - गाइड शुल्क शंभराहून दोनशे रुपये करण्यात यावे आणि अन्य मागण्यांना घेऊन ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील गाइड धरणे आंदोलन करणार आहेत. येत्या तीन मे रोजी ताडोबा-अंधारी वनसंरक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

वन्यपशू, पक्षी यांचे संवर्धन आणि संगोपन करण्यासाठी आरक्षित ठेवलेल्या राष्ट्रीय उद्यानात प्राण्यांना त्रास न होऊ देता पर्यटकांना सुरक्षितरीत्या फिरविण्याचे काम गाइड करीत आहेत. मात्र, वाढत्या महागाईमुळे 100 रुपये दिवसभरात अपुरे पडतात. त्यामुळे सर्व गाइडला अंशकालीन शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन एक हजार रुपये मानधन देण्यात यावे. गाइड शुल्क शंभराहून दोनशे रुपये करण्यात यावे, भविष्य निर्वाह निधीसह निवृत्तियोजना लागू करण्यात यावी, गाइडला ओळखपत्र, टोपी बुटांसह गणवेश देण्यात यावा, आदी मागण्या करण्यात येणार आहेत. वनसंरक्षक कार्यालयासमोर दुपारी बारा ते तीनपर्यंत धरणे देण्यात येणार असून, आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ वनकामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहीवडे करणार आहेत.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.