সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, May 28, 2011

ताडोबा-अंधारी

देशातल्या एकूण 39 टायगर रिझर्वपैकी ताडोबा-अंधारी हा महाराष्ट्रातला एक व्याघ्रप्रकल्प. ताडोबामध्येही यंदा वाघांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रानं ‘टायगर कॅपिटल’चा किताब यंदा मध्यप्रदेशकडून हिरावून घेतलाय. त्यामुळे केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी नागपूरला ‘टायगर कॅपिटल’ म्हणून विकसित करण्याचं आश्वासन दिलंय. इथं आसपास 60हून अधिक गावं आहेत. लोकसंख्या वाढतेय आणि जंगलाचं क्षेत्रफळ कमी होतंय. इथले टायगर कॉरिडोर अवैध कोळसा खाणींमुळे आधीच धोक्यात आलेत. पण या सर्वावर मात करून ताडोबा-अंधारी टायगर रिझर्वची परिस्थिती येत्या काळात अधिक सुधारलेली असेल, अशी आशा करायला हरकत नाही.




लांबलचक, अफाट पसरलेला अथांग ‘इराई डोह’ थेट मोहर्लीपर्यंत सोबत करतो. जंगलाकडे जाणा-या वाटेची दिशा दाखवली की जणू तो निश्चित होतो. विदर्भातल्या उन्हाळ्याला आता मनानं केव्हाच मागे टाकलेलं असतं आणि मन आता पुढल्या रानभुलीसाठी तयार झालेलं असतं. जंगलात बसलेला तारू देव आपल्यावर प्रसन्न व्हावा आणि मनासारखे प्राणी दिसावेत ही आपली प्रार्थना एव्हाना त्याच्यापर्यंत पोहोचलेली असते. पहिल्याच टप्प्यात तेलिया डोहावर मगर दाखवण्यासाठी म्हणून गाडी विसाव्याला उभी राहते. उन्हामध्ये तेलिया डोहाच्या चमचमत्या पाण्याकडे पाहता पाहता कधीतरी तंद्री लागते आणि क्वचित मृगजळासारखे भासही होतात. डोहाच्या पलिकडल्या मातकट हिरवळीवर वाघ चालतोय असाही भास होऊ लागतो. बरेचदा तो खरादेखील ठरतो. तेलियाच्या रस्त्यावर आधी लागणाऱ्या चिंचघाटातून जातानाही बाजूच्या काटेरी जाळीतून कोणीतरी समांतर चालत आपल्यावर नजर ठेवून असल्याचं जाणवतं आणि अकस्मात त्या माणिक डोळ्यांचा मालक, बिबटय़ा वाघ आपल्यासमोरच झेप घेऊन रस्ता क्रॉस करतो.
थोडी जिप्सी पुढं न्यावी तर काळीभोर केसाळ अस्वल (स्लोथ बेअर) मादी मोहाची फुलं हुंगत हुंगत येताना दिसते. आपल्याला पाहिल्यामुळे झाडावर चढण्याचा बेत तिने वरकरणी तरी रद्द केलेला असतो. पुढल्या वळणावरच्या टाक्यावर भेकराची मादी तहानेनं इतकी व्याकुळ झालेली असते की, जिप्सी पुढय़ात येऊन थांबली तरी ती दुर्लक्ष करते आणि चटचट पाणी पीत राहते. इतक्या सा-या जंगलजादूनंतर ताडोबाच्या रानाची झिंग चढू लागलेली असते. त्यात भर गाइडनं चाखायला दिलेल्या मोहाची फुलं नि टेंभूर्ली फळांची!
नुकतीच व्याघ्र गणनेची आकडेवारी हातात पडली होती. वनांचं क्षेत्रफळ कमी झालेलं असलं तरी वाघांची संख्या वाढलेली असल्यामुळे राज्यातल्या या दुस-या मोठय़ा व्याघ्र प्रकल्पात जाताना हुरूप होताच. सध्याच्या गणनेनुसार ताडोबा,अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या 60वर गेल्याचं अधिका-यांनी सांगितलं.
खातोडा गेटवरून एकावेळी 27-28 गाडय़ा आत सोडल्या जातात. अरण्याचा खूपसा भाग अजून ‘माणसाळलेला’ नाही आणि हेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं मोठं आकर्षण आहे. प्राणी हमखास दिसतील अशी अपेक्षा न बाळगता गेलो तर ताडोबा अभयारण्यासारखा दुसरा खजिना नाही.. प्राणी पाहण्यासाठी धीर आणि संयम हवाच. आम्हीही बराच पेशन्स गाठीशी बांधून होतो. काटेझरीत एका भल्याथोरल्या नर वाघानं आम्हाला मनसोक्त दर्शन दिलं. तिथं वाघ बसल्याची बातमी सकाळीच लागल्यानं सा-यांनीच तिकडे जिप्सी वळवल्या. समोर 20-25 गाडय़ा असताना हा वाघ आरामात जाळीत वामकुक्षी घेत होता. त्याच्या विश्रांतीत फारसा व्यत्यय न आणता त्याला रामराम करावा लागला.
जंगलात असंच चालतं. धावत्या जिप्सीतून नजरेला अनेक आकार दिसत असतात. जाळीमागे कोणीतरी नक्कीच दडलंय असे भास होत राहतात. आमच्यासमोर हिरव्यापिवळ्या जाळीमधून बिबटय़ा अवतरला, तो क्षणही असाच भासमयी! पण त्याची ऐटबाज सावध टप्प्याटप्प्याची चाल पाहून आम्ही भानावर आलो. दिवसा फारसा दृष्टीला न पडणारा बिबटय़ा दिसला, त्या वेळी वाघ दिसण्यापेक्षाही जास्त आनंद झाला. ताडोबाच्या सफरीत तीन वाघ पाहून झाले असल्यामुळे बिबटय़ा हा सर्वस्वी अनपेक्षित बोनस होता! मात्र बिबटय़ा दिसल्याचा आनंद आम्ही ताडोबाहून परतल्याच्या दुस-याच दिवशी आलेल्या एका बातमीनं हिरावून घेतला. अष्टभुजा गावाजवळ बिबटय़ाच्या एका तहानलेल्या सहा महिन्याच्या बच्च्याला गावक-यांनी अमानुष रीतीनं मारलं. पण या परिसरात अशा घटना नव्या नाहीत असं आमच्याबरोबर असलेल्या आणि ‘वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया’मध्ये फील्ड ऑफिसर असणा-या आदित्य जोशीनं सांगितलं. त्याच्या मते अशा प्राण्यांना पकडून त्यांना सुखरूप त्यांच्या निवासात सोडण्यासाठी वनरक्षकांसोबत प्रशिक्षित लोकांचीही गरज आहे.
ताडोबा-अंधारी टायगर रिझर्वमध्ये आज वाघांची संख्या 69च्या आसपास आहे. ज्यात 25-28 बछडे आहेत. पण वाघाखेरीज इथं पक्षीनिरीक्षणही अप्रतिम होतं. पक्षीप्रेमींसाठी तर ताडोबा अभयारण्य म्हणजे तीर्थस्थानच. चेन्जेबल हॉक-इगल , क्रेस्टेडर्सपट इगल, इंडियन रोलर (नीलकंठ) , इंडियन पिटा, व्हाइट ब्रेस्टेड किंगफिशर, ग्रीन पिजन, इंडियन ग्रेहोर्नबील, जंगलफाउल असे नानाविध पक्षीआढळतात. किंगफिशर, रिव्हर लॅप्विंग, व्हाइट हेरॉन, र्सपट ईगल, रॉकेट टेल्ड ड्रँगो, फ्लेमबॅक वूडपेकर, व्हाइट शोल्डर्ड काइट, ग्रीन पिजन अशा कित्येक मनमोहक रंगांच्या पक्ष्यांची इथं मांदियाळी आहे. त्याशिवाय मगर, गवे, हरणं, नीलगाय, सांबर, रानटी कुत्रे, साळिंदर, चंदेरी पाठीचे अस्वल अशा प्राण्यांचेही हे आश्रयस्थान. डिकेमाली, बेहडा, हिरडा, बेलफळ, अर्जुन अशा अनेक वनौषधी या रानात आहेत. नुसतं अरण्यात जरी भटकायचं म्हटलं तरी आठवडा पुरत नाही. अशाच मोठय़ा भटकंतीनंतर आपोआपच इथल्या टेंभूर्लीच्या झाडाकडे जाणाऱ्या वाटा आपल्याला पाठ होतात आणि डोक्यावरून उडालेला पक्षी नीलकंठ होता की सोनेरी पाठीचा सुतार हे ओळखण्यासाठी गाईडची गरज भासत नाही. ताडोबाच्या जंगलाचा तारू देव आपल्याला एव्हाना प्रसन्न झालेला असतो!

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.