সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, June 23, 2010

लग्नासाठी झाली महागाईतही लाखोंची उलाढाल

सकाळ वृत्तसेवा

Wednesday, June 23, 2010 AT 12:30 AM (IST)

Tags: marriage, dearness, chandrapur, vidarbha

चंद्रपूर - यंदा महागाई आहे म्हणून खर्च जपून करावा लागणार, असे प्रत्येकजण म्हणत होता. मात्र, वर-वधूपित्यांनी लाखोंची उलाढाल करीत लग्नाचा बार उडविला. गतवर्षी दिवाळीपासून सुरू झालेले विवाहसोहळे पावसाळ्यातही सुरूच असल्याने जिकडे-तिकडे ढोल-ताशे आणि सनईचा आवाज येत आहे. त्यामुळेच बाजारातील सोने, साड्या, कपडे, भांडी, खाद्यपदार्थ, फर्निचर, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आदी वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.



यावर्षी महागाईने कमाल केली. सोन्याचे दर आकाशाला भिडले होते. धान्य, भांडीकुंडी, खाद्यपदार्थ, मंगलकार्यालयाचे भाडे सगळ्यातच चढती होती. असे असतानादेखील वधूपित्यांनी हार न मानता विवाहसोहळे थाटात पार पाडले. विवाह हा एक पवित्र संस्कार मानण्यात येतो. विवाहाने दोन मनेच नव्हेतर दोन कुटुंबांचे मीलन होते. परंतु, सध्या विवाह म्हणजे प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. त्यासाठी सोन्याचे दागिने, चांदीची भांडी, उंची वस्त्रे, फर्निचर, जेवण्यासाठी थाट मांडण्यात येतो. अमाप पैसा खर्च करून प्रतिष्ठेचे दर्शन घडविण्याची चढाओढच विवाहसोहळ्यात दिसून येते. पाहुण्यांना मिष्टान्नाची मेजवानी, मानपान आदी सोपस्कारही न चुकता होताना दिसते. वधूच्या साड्या, नवरदेवाचे कपडे, संसारोपयोगी भांडी, पूजेचे साहित्य, पंखे, कपाट, वॉशिंग मशिन, फ्रीज, सोफासेट, डायनिंग, ड्रेसिंग टेबल आदी वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. लग्नात लाडू, चिवडा, चकली, करंजा, चंपाकली, अनारसे असे फराळाचे पदार्थ कुणी घरी केले, तर काहींनी बाजारातून विकत आणले. रुखवंताचाही थाट चांगला व्हावा म्हणून अनेकांनी तयार पदार्थांची मागणी केली. पोस्टर, फ्रेम, फ्लॉवर पॉट, वॉलपीस अशा शोभिवंत वस्तूही रेडिमेड आणून रुखवंतात ठेवल्या होत्या. त्यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल झाली. एकूणच लग्नाच्या सोहळ्यात किमान खर्च एक लाख होता.



यंदा शहरातील मंगलकार्यालये बुकिंग होती. यात प्रामुख्याने कन्यका परमेश्‍वर मंदिर, गुजराथी भवन, साईकृपा मंगल, श्री मंगल कार्यालय, बुरडकर सभागृह, राधिका सभागृह, आंबेडकर सभागृह, जोडदेऊळ, पाचदेऊळ, संताजी सभागृहाची यंदा मागणी होती. मुहूर्त साधण्यासाठी शहरातील मंगलकार्यालये यंदा हाऊसफुल होती. शहरात जवळपास 20 मंगलकार्यालये आहेत. सायंकाळचे विवाह प्रामुख्याने मोकळ्या हिरवळीवर लॉनमध्येच झाले. त्याचे भाडे किमान पाच ते 25 हजारांपर्यंत होते. यंदा अक्षय मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयेला अनेकांनी रमेशीगाठी बांधल्या. जुलैपर्यंत काही मुहूर्त आहेत. आता पावसाळा लागल्याने विवाह मुहूर्त संपत आले आहेत. अखेरच्या मुहूर्तावर लग्नकार्य उरकून घेण्याची घाई दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्यातील काही लग्नासाठी आतापासूनच बुकिंग झालेले दिसते.



लग्नाचा खर्च किमान कमाल

सभागृह- पाच हजार......25 हजार

सोन्याचे दागिने- 25 हजार........एक लाख

वधूच्या साड्या, वस्त्रे- पाच हजार ... 25 हजार

नवरदेव कपडे, अन्य सामान- सहा हजार .... 30 हजार

मानपान, अहेर- 10 हजार ... 50 हजार

प्रापंचिक वस्तू- 20 हजार .... 50 हजार

जेवणावळ- 20 हजार .... 45 हजार

मेकअप, मेहंदी- 500 रुपये .... पाच हजार

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.