সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, June 16, 2010

अखेर मॉन्सूनपूर्व पाऊस बरसला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, June 15, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: rain, mansoon, chandrapur

चंद्रपूर - विजांची रोषणाई, ढगांचा गडगडाट, ढोलताशांचा आवाज अन्‌ सुसाट वाऱ्यातून निघणाऱ्या संगीतमैफलीत मॉन्सूनच्या पहिल्या पावसाचे आज (ता. 13) मध्यरात्री जोरदार आगमन झाले. या पावसामुळे तहानलेली जमीन तृप्त झाली; आणि मातीचा सुगंध सर्वत्र दरवळला. जिल्ह्यात एकूण 645. 5 मिलीमीटर पाऊस झाला. ब्रह्मपुरीत तो सर्वाधिक 80 मिलीमीटर; तर सर्वांत कमी पावसाची नोंद राजुरा येथे 14.2 मिलीमीटर झाली.

जिल्ह्यातील जीवनमान शेती आणि त्यावरील पूरक व्यवसायांवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण केवळ खरीप पिकांवरच अवलंबून आहे. त्यामुळे याच हंगामावर जास्त जोर असतो. गेल्या दोन वर्षांत दुष्काळी परिस्थिती आणि किडींच्या प्रादुर्भावात खरीप हंगाम पूर्णतः बुडाला होता. यंदातरी निसर्ग साथ देईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. हवामान खात्याने 10 ते 15 जूनदरम्यान जिल्ह्यात पाऊस येईल, असा अंदाज वर्तविला होता. या अंदाजानुसार शेवटच्या दिवसांत मॉन्सून बरसल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मृगनक्षत्र लागून आठवडा झाल्यानंतर मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास सुसाट वारे वाहू लागले व आकाशात ढगांची गर्दी सुरू झाली. विजांच्या कडकडाटासह मॉन्सूनने हजेरी लावली. नागभीड येथे मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरवात झाली. शेतीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी सकाळीसच शेतीकडे धाव घेतली. सिंदेवाही, ब्रह्मपुरी, मूल तालुक्‍यातही पहाटे दोनच्यादरम्यान पावसाने हजेरी लावली. सावली, पोंभूर्णा, गोंडपिंपरी या पट्ट्यात तीनला दमदार पाऊस झाला. चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, कोरपना, भद्रावती या तालुक्‍यांत तीनपासून सकाळी सातपर्यंत पाऊस सुरूच होता. जिल्ह्यात सर्वत्र शेतीयोग्य दमदार पाऊस झाला. मात्र, वरोरा तालुक्‍याला रिमझिम सरींवरच समाधान मानावे लागले. मूल येथे अडीचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. हा पाऊस सकाळी सातपर्यंत सुरूच होता. चिमूर येथे दोनच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. जिल्ह्यात एकूण 645. 5 मिलीमीटर पाऊस झाला. त्याची सरासरी 40.3 मिलीमीटर आहे. 1 ते 14 जूनपर्यंत आलेल्या पावसाची सरासरी 43.3 मिलीमीटर आहे


अंदाज फोल; मॉन्सूनची हुलकावणी
सकाळ वृत्तसेवा
Monday, June 14, 2010 AT 12:30 AM (IST)
Tags: monsoon, rain, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनने हजेरी लावल्यानंतर विदर्भात आज ना उद्या पाऊस येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, मॉन्सूनच्या वाऱ्यांनी सर्व अंदाज आणि अनुमान फोल ठरवत सर्वांना हुलकावणी दिली. दरम्यान, रविवारी (ता. 13) पहाटेपासून आकाशात ढगाळ वातावरण होऊन हवेत गारवा होता. दुपारी तीन वाजेनंतर सर्व ढग दिसेनासे झाले आणि पहिल्या पावसाची आशा मावळली.

जिल्ह्यात पावसाच्या हलक्‍या सरी कोसळण्याची शक्‍यता विज्ञान आणि प्रौद्योगिक विभाग, राष्ट्रीय मध्यम कालावधी हवामान अंदाज केंद्राने वर्तविल्याची माहिती पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या सिंदेवाही येथील कृषी विज्ञान व हवामान सल्ला केंद्राने होती. याशिवाय भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) ने जारी केलेल्या नकाशात गुजरात, मध्यप्रदेश आणि विदर्भात 10 ते 15 जूनदरम्यान पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली होती. मात्र, 13 जूनपर्यंत मॉन्सूनचे आगमन झालेले नाही. पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाच्या धो-धो धारा बरसत असताना; मात्र चंद्रपूर जिल्हा 42 ते 45 अंश सेल्सिअंश तापमानातच आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून कमाल तापमानात किंचित घट झाली होती. मात्र, दिवसभराचा उकाडा संपलेला नाही. रात्रीच्या वेळी सुसाट वारे वाहत असतात. मात्र, पावसाचे कोणतीही चिन्हे दिसून आलेली नाहीत. या आठवड्यात कमाल तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 28 ते 31 अंश सेल्सिअस होते. सकाळच्या वेळी आर्द्रतेचे प्रमाण 38 ते 45 टक्के, तर दुपारच्या वेळी 22 ते 29 टक्के होते. खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांनी बी-बियाणे, कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, विषाणू संवर्धके आदी आवश्‍यक सामग्रींची जुळवाजुळव सुरू केली आहे. मात्र, पाऊसच नसल्याने प्रत्यक्ष कामाला सुरवात झालेली नाही

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.