সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, February 06, 2012

वैभवी 'चांद्या'ची आनंददायी सफर


वैभवी 'चांद्या'ची आनंददायी सफर
पंधराव्या शतकात चंद्रपूर येथे गोंड राजांचे साम्राज्य होते. त्यामुळे या शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथे प्राचीन आणि गोंडकालीन वास्तू आजही आहेत. महाकाली मंदिर, अंचलेश्‍वर मंदिर, एकवीरा मंदिर आहे. परकोटाला चार द्वार असून, जटपुरा, पठाणपुरा, बिनबा आणि अंचलेश्‍वर अशी त्यांची नावे आहेत. शहरात गोंडकालीन वास्तूंमध्ये राजा वीरशहा आणि राणी हिराईची समाधी प्रसिद्ध आहे. वाकाटककालीन वास्तूही येथे आहेत. महाकाली मंदिरामुळे चंद्रपूरची ख्याती सर्वदूर असून, स्थानिक भाविकांसह आंध्र प्रदेश, मराठवाड्यातील लोक श्रद्धेपोटी येथे येत असतात. प्राचीन काळी चांदा नावाने ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहराची पंचशताब्दी साजरी होते आहे. या परिसरातील भटकंती आनंददायी ठरू शकते.







ताडोबा

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प 625 चौरस किलोमीटरच्या विशाल क्षेत्रात पसरले आहे. मोहुर्ली, कोळसा आणि ताडोबा हे त्याचे तीन विभाग. या प्रकल्पात 35 ते 40 पट्टेदार वाघ असल्याचे सांगितले जाते. बिबटे 55 च्या घरात आहेत. याशिवाय अस्वल, चितळ, गवे, रानकुत्री, रानडुकरे, मोर, भेकर, मगर यांच्यासह अनेक प्रजातींचे प्राणी येथे बघायला मिळतात. पर्यटनाच्या दृष्टीने किंवा व्याघ्रदर्शनासाठी महाराष्ट्रात आदर्श असा ताडोबा प्रकल्प आहे. इथले जंगल बांबूचे आहे आणि भूभाग समतल आहे. यामुळे व्याघ्रदर्शन आणि जंगलातील सफारी सहजपणे करता येते. या प्रकल्पांतर्गत रस्ते तयार करण्यात आले असून, ते थेट व्याघ्रस्थळापर्यंत पर्यटकांना नेऊन सोडतात. घनदाट अरण्य आणि समृद्ध प्राणी विश्‍व कोणत्याही पर्यटकांना अत्युच्च आनंद देणारे असेच आहेत.



जायचे कसे?

ताडोबाच्या तीनही विभागांत स्वतंत्रपणे जावे लागते. ताडोबा क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी चिमूरपासून दहा किलोमीटर अंतरावर खातोडा द्वार आहे आणि दुसरे मोहुर्ली येथे प्रवेशद्वार आहे. नागपूरहून येणाऱ्या पर्यटकांना चिमूरमार्गे जायचे असल्यास आधी चिमूर आणि नंतर खातोडा, असा प्रवास करावा लागेल. नागपूरवरून हे अंतर जवळपास 130 किलोमीटर आहे, तर मोहुर्लीला जाण्यासाठी चंद्रपूरहून जावे लागते. हे अंतर सुमारे 170 किलोमीटरचे आहे. चंद्रपूरवरून मोहुर्ली 22 किलोमीटर आहे, तर कोळसा क्षेत्रात जाण्यासाठी चंद्रपूरवरूनच चिचपल्लीमार्गे झरी येथे जावे लागते. हे अंतर जवळपास नागपूरवरून 185 किलोमीटर आहे. चंद्रपूरवरून हे 40 किलोमीटर आहे.



जाण्याच्या वेळा

या प्रकल्पात जाण्यासाठी ठराविक वेळा निश्‍चित केल्या आहेत. सकाळी सहा ते 11 आणि दुपारी दोन ते सहा, अशा या वेळा आहेत. या वेळेपूर्वी किमान अर्धा तास प्रवेशद्वाराजवळ पोचल्यास पर्यटकांना उर्वरित सोपस्कार करता येतात. अलीकडे प्रवेशासाठी आरक्षणाची व्यवस्था पद्धत सुरू करण्यात आली आहे. पर्यटकांनी निराशा टाळण्यासाठी हे आरक्षण करणे गरजेचे आहे. पर्यटकांची वाढती संख्या बघितल्यास आता वेळेवर प्रवेश करणे कठीण झाले आहे.



त्यामुळे ताडोबा क्षेत्र संचालकांच्या चंद्रपुरातील मूल मार्गावरील कार्यालयातून हे आरक्षण केल्यास सोपे जाते. ताडोबा फिरण्यासाठी वैयक्तिक वाहने किंवा भाड्याच्या जिप्सी आवश्‍यक आहेत. ज्या पर्यटकांकडे स्वत:ची चारचाकी वाहने आहेत, अशांना जिप्सी करण्याची गरज नाही; मात्र ज्यांना उघड्या जिप्सीतून सफारीचा आनंद घ्यायचा आहे, असे पर्यटक प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या जिप्सी भाड्याने घेऊ शकतात.



बाबांचे आनंदवन

थोर समाजसेवक दिवंगत बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांच्या श्रमातून फुललेले आनंदवन हे पर्यटनस्थळ नसले, तरी प्रेरणास्थळ मात्र नक्की आहे. कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी बाबा आणि ताईंनी जे श्रम घेतले, आयुष्य झिजविले, त्याचे सार्थक म्हणजे आनंदवन होय. आनंदवन हे नागपूर -चंद्रपूर मार्गावर वरोरापासून एक किलोमीटर अंतरावर वसले आहे. नागपूरपासून हे अंतर सुमारे 110 किलोमीटर आहे. महारोगी सेवा समितीच्या वतीने येथे कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न सुरू आहे. रोगमुक्त झालेल्या रुग्णांकडून विविध प्रकारच्या वस्तूंची निर्मिती येथे केली जाते. येथे अंध, अपंग, मूकबधिर यांनाही आसरा देऊन शिक्षण आणि रोजगाराचे धडे दिले जात आहेत. हा प्रकल्प नागपूर मार्गावर असल्याने वाहतुकीची सुविधा आहे. शालेय सहली, कार्यशाळेसाठी स्थानिक नागरिक येथे भेट देतात. येथे विदेशी पर्यटकांची संख्या मोठी आहे. येणाऱ्या मान्यवरांची राहण्याची व्यवस्था येथे करण्यात येते. चंद्रपूरपासून आनंदवनचे अंतर 45 किलोमीटर आहे.



भांदकनगरी अर्थात भद्रावती

नागपूर-चंद्रपूर मार्गावर भद्रावती शहर आहे. पूर्वीची भांदकनगरी प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंनी प्रसिद्ध आहे. गवराळा येथे गणेश मंदिर, प्राचीन नागवंशाचे भद्रनाग मंदिर, जैनधर्मीयांचे पार्श्‍वनाथ मंदिर, विजासन लेणी येथे आहेत. हिंदू, जैन आणि बौद्ध धर्माचे हे आध्यात्मिक अधिष्ठान असल्याने पर्यटकांची संख्या मोठी असते. रेल्वे आणि बसगाड्यांची सोय असल्याने बाहेरील पर्यटकही येथे भेटी देतात. नागपूर येथून हे अंतर 128 आहे. चंद्रपूरपासून भद्रावती 25 किलोमीटरवर आहे.



रामदेगी

आनंदवन प्रकल्पाच्या समोरून चिमूरकडे जाणाऱ्या मार्गावर ताडोबा अभयारण्याच्या कुशीत रामदेगी हे निसर्गरम्य आणि धार्मिक स्थळ आहे. या परिसरात डोंगराळ पहाडाच्या पायथ्याशी शिवमंदिर आहे. या ठिकाणी पौराणिक काळात प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासकाळात विसावा घेतल्याची आख्यायिका आहे. हा परिसर संपूर्ण निसर्गाने नटला असून, प्राण्यांची वर्दळ असते. दरवर्षी मार्गशीर्ष, पौष महिन्यात रविवार, सोमवार आणि महाशिवरात्रीला यात्रा भरते. या वेळी येथे भाविक मोठ्या संख्येने येतात. येथे जाण्यासाठी प्रवासाची विशेष सुविधा नाही. शिवाय निवास आणि भोजनालयाचीही सुविधा नसल्याने दूरच्या पर्यटकांना ये-जा करण्यासाठी गैरसोय होते.चंद्रपूरवरून हे अंतर 80 किलोमीटर आहे.



अड्याळ टेकडी

नागभीड-ब्रह्मपुरी मार्गावर अड्याळ टेकडी आहे. येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ज्येष्ठ शिष्य तुकारामदादा गीताचार्य यांचा आश्रम आहे. येथे ग्रामसुधारणा, ग्रामस्वच्छता आणि गावाचे नैतिक अधिकार, यावर समाजप्रबोधन केले जाते. अड्याळ टेकडी चंद्रपूरपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी ब्रह्मपुरी किंवा नागभीड येथूनही बसगाड्या आहेत.



सोमनाथ प्रकल्प

बाबा आमटे यांनी आनंदवनानंतर उभारलेला प्रकल्प म्हणजे सोमनाथ. येथे जाण्यासाठी मूल-मारोडा येथून जावे लागते. बसगाड्यांची विशेष सुविधा नाही. परिसरातील स्थानिक नागरिक खासगी वाहनांनी ये-जा करतात. येथे नैसर्गिक झरा असून, सदैव पाणी खळखळत असते. शेजारी शिवमंदिर असून, भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी असते. सोमनाथ प्रकल्पात विविध प्रकारचे कृषी उत्पादन प्रायोगिक तत्त्वावर घेतले जाते. येथे बाहेरच्या पर्यटकांची ये-जा असते. पूर्वी येथे प्राणिसंग्रहालय होते. वाघ, बिबट, मगर, अस्वल पाहण्यासाठी खासकरून जिल्ह्यातील नागरिक जायचे. आता येथे प्राणी नाहीत. चंद्रपूरवरून सोमनाथचे अंतर 55 किलोमीटर आहे.



घोडाझरी, सात बहिणींचा डोंगर

नागभीडपासून पाच किलोमीटर अंतरावर चंद्रपूर मार्गावर घोडाझरी प्रकल्प आहे. इंग्रजकालीन या तलाव परिसरात पर्यटकांसाठी बगीचा, पाण्याचे कारंजे, बोटिंग, बेटावर प्रकाशझोताचे मनोरे उभारण्यात आले आहेत. सुटीच्या दिवसांत येथे पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. लहान मुलांसाठी चिल्ड्रेन पार्क, जलक्रीडा, निवासाची सुविधा, उपाहारगृह असल्याने उन्हाळ्यातही नागरिक येतात. याच प्रकल्पापासून जवळच सात बहिणींचा डोंगर आहे. डोंगरावर जाण्यासाठी तीन किलोमीटर चढून जावे लागते. डोंगराच्या चहूबाजूंनी निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. चंद्रपूरवरून 90 किलोमीटर आहे.



माणिकगड

गडचांदूरपासून दीड-दोन किलोमीटर अंतरावर माणिकगड पहाड आहे. येथे गोंडकालीन किल्ला असून, पायथ्याशी पुरातन विष्णू मंदिर आहे. माणिकगड पहाडावर कोलाम जमातीचे अस्तित्व आढळून येते. या पहाडावर गुंफा आणि अंमलनाला आहे. घनदाट वनराईने नटलेला हिरवा निसर्ग येथे सदैव खेळत असतो. येथे जाण्यासाठी कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे पर्यटकांना येथे जाणे गैरसोयीचे ठरते. राजुरामार्गे चंद्रपूरवरून जाण्यासाठी 85 किलोमीटरचे अंतर कापावे लागते.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.